या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. साळुता, मुडगा, झ़ाडू, ज़ाडू, केरसुणी, साऊता, मोळ, साळता, साळाती ,वाडवन, साळोता, मोल, वारवनी, झ़ारु, मउल, मोली, मयेर, मुंगाडा, वाढवन, मयेरं, झ़ाउ, मोवाळ, मोयाळा, मोया, झ़ाडनी, मयारू, मोलझ़ाडू, बोळ, मोऊळ, सारन, केरसुनी, मोवळ, झ़ाडणी, कुंच़ा, साळुती, सराटो, वाढवो, सान, सुनी, मोळा, साळू, मोळाची झ़ाडू, मोळवंडी, वाढवन, पिसोळी, सारण, मुळू, मुळी, वळवाची झ़ाडू, केरसुंडी, झ़ाळन्नी, झ़ान्नी, बहारु, बाहरी, झान्नी, झाडनी, ज़ाडनी, शिरय, केरसानी, हालता, हालती, सलाती, सलात, भारा, हाडतो, भारी, सलाते, बाहरा, शिराव, खर्हाटी, भारं, भारो, भुहारी, शिरावा, बिचारा, गोळाट्या, शिराय, शिरा, शिराई, कुचा, फडा, साळुंता, झ़ाडायची, लक्ष्मी, झ़ाडायशी, झ़ाडाची, कुच़ा, सळुता, सळोता, सळता, शिरई, वेरा, शिराव, मांगाची शिराव, शिरावी, फळा, बायरं, बायरी, कैसार, बाडी, कुची, झाडू, भाडी, हाडनी, भुतारी, बुतारी, मवाली, वाहरी, केरसुली, शाळाची झ़ाडू, मवेला, फुलझ़ारु, मयरी, सराटं, बसवरो, बासोर, मवारा, मोयडा, फुलझ़ाडू, वरवन, हातनी, झ़ाडांची, ज़ाडायची, फरकी, खरोटा, फडू, पिटभारी, केरकाढनी, केरसनी, शिंदीची झ़ाडू, सलादे, भुतारी, फरका, फडी, खरसुनी, लक्शिमी, लोटना, भाहरी, झ़ाळू, ज़ुनू, जुनू इ. यापैकी ‘साळूता’ आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे ‘साऊता’, ‘साळता’, ‘साळाती’ वगैरे शब्द कोल्हापूर आणि दक्षिण कोकण (सिंधुदुर्ग, रत्नागिरी) या पट्ट्यात आढळतात. ‘मोळ’ आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे ‘मौळ’, ‘मोल’ इ. शब्द प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सापडतात. ‘बुतारी’, ‘झाडू’ आणि तत्सम शब्द रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आढळून येतात. भौगोलिक सान्निध्यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ‘हालता’, ‘साळता’ या कोकण-कोल्हापूरकडील शब्दांबरोबर नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांत सापडणारे ‘झाडणी’, ‘केरसुनी’, ‘शिराई’, ‘बहारा’, इ. शब्ददेखील सापडतात. सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ‘केरसुणी’ आणि लातूर, उस्मानाबाद, नागपूर, जळगाव, वर्धा, नांदेड, यवतमाळ, जालना, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांत प्रामुख्याने ‘फडा’/’फळा’ हे शब्द वापरले जातात. या सर्व शब्दांपैकी ‘शिंदीची झाडू’, ‘मोलाची झाडू’ यासारखे शब्द हे ज्या प्रकारच्या वनस्पतीपासून हा झाडू तयार केला जातो त्यावरून तयार केलेले दिसतात. तर ‘झाडणी’, ‘केरकाढणी’, ‘लोटना’ यासारखे शब्द कार्यदर्शक आहेत.