या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. अळू, आळू, येळू, तेरा, तेरी, गाटीये, तेरे, पोती, पात्रा, चिमकुरा, च़मकुरा, घाट्याची पानं, घाट्या, पाटोन्ना, पातोड्याची पानं, धोपा, पाथरा, कोचई, आहल्या पानं, आडुची पानं, पत्र्याचे झ़ाड, तेडा, देठी, गरगट, गडारा, डोडा, धोबा इ.
यापैकी ‘अळू’ हा शब्द जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये वापरला जातो. ‘तेरी’ हा शब्द रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, पालघर जिल्ह्यातील वसई या प्रदेशामध्ये आढळतो. ‘पोती’ हा शब्द केवळ बुलढाणा, धुळे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका, जळगाव या प्रदेशांमध्ये वापरला जातो. तर ‘चिमकुरा’, चमकुरा आणि तत्सम शब्द लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि अमरावती तसेच सोलापूरचा बार्शी तालुका या भागांत वापरला जातो. सातारा जिल्ह्यात ‘घाटा’, नागपूर, नांदेड, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत ‘धोपा’, ‘कोचई’ त्याचप्रमाणे पोती आणि ‘पात्रा’ हे शब्द वापरले जातात. रायगड जिल्ह्यात ‘पातोडा’, ‘तेरा’ आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ‘गरगट’ हा शब्द वापरला जातो.
अळूच्या पानापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या नावावरूनच काही ठिकाणी ही पाने ओळखली जातात असे दिसते. उदाहरणार्थ, घाट्याची पानं, पातोड्याची पानं इ.