मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

खूप/जास्त (many/a lot) / कमी/थोडे (less/few)

मराठी भाषेतील परिमाणवाचक किंवा संख्यावाचक विशेषणांमध्ये गणनावाचक, आवृत्तिवाचक, अनिश्चिततावाचक असे उपप्रकार आढळतात.  अधिकत्व दाखवण्यासाठी मराठीतील बोलींमध्ये पुढील शब्दवैविध्य दिसून येते. भरपूर, जास्त, खूप, लई, बरीच, अनेक, भरमसाठ, असंख्य, मायंदाळ, मोप, पुष्कळ, जड, चिक्कार, गयरा, गहिरे, गन्या, गंज, मुतला, मुकला, सावटा, भलता, गच्च्चीस, पक्की, जाम, फार, बहु, भलती, वार्यामाप, बक्कळ, अफाट, खंडीभर, अनंत, लगीत, मोक्कार, भक्कम, अधिक, अमाप, घोन इ.   वरील शब्दांपैकी ‘भरपूर’, ‘जास्त’, ‘खूप’ हे शब्द सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात. ‘मोप’, ‘लई’ हे शब्द प्रामुख्याने कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात आढळतात. ‘गयरा’, ‘गहिरे’, ‘गन्या’, ‘गंज’, ‘मुतला’, ‘मुकला’, ‘सावटा’ हे शब्द प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सापडतात. पालघर, रायगड आणि ठाणे  जिल्ह्यांत  ‘पक्की’, ‘जाम’ आणि ‘फार’ हे शब्द प्रामुख्याने आढळतात. तर अहमदनगरमध्ये ‘मोक्कार’ आणि सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ‘बक्कळ’ हा शब्द प्रामुख्याने आढळतो. वर्धा, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये ‘पुष्कळ’ आणि ‘लागित’  तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ‘भक्कम’ हा शब्द विशेषत्वाने दिसून येतो.  तसेच वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत ‘थोडे’, ‘कमी’, ‘नकाडं’, ‘वाइच’, ‘जरासे’, ‘जिराकूच’, ‘हालका’, ‘उयला’, ‘मोजके’, ‘थुडकी’, ‘किरकोळ’, ‘शिरवा’, ‘होलीकशे’, ‘इत्तासा’, ‘किंचित’ इ. हे शब्द न्यूनत्वदर्शक आहेत. यापैकी काही विशेषणे परिमाणवाचक तर काही  गुणात्मक आहेत.