मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

सासू – सासरे (mother-in-law, father-in-law)

यापूर्वी झालेल्या भाषिक सर्वेक्षणामध्ये सासू आणि सासरे (म्हणजेच नवऱ्याचे / बायकोचे आई-वडील) या नातेवाचक शब्दांसाठी बोलींमध्ये फार थोडे वैविध्य असल्याची नोंद आहे. सासू शब्दासाठी आतीबाई, आत्याबाई, आई, मामी हे वैविध्य तर सासरे या नात्यासाठी सासरे आणि मामंजी या दोनच शब्दांची नोंद आहे. वाहू हा शब्द धुळे केंद्रात सासूसाठी सापडल्याची नोंद आहे. पालघर जिल्ह्यातील काही सामाजिक समूहांमध्ये स या ध्वनीचे ह आणि ह हा ध्वनी गळून त्या ठिकाणी कुठलाच ध्वनी नसणे असे ध्वनीपरिवर्तन होण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे सासूचे हाऊ, सासरा या शब्दाचे हाहरा इ. ध्वन्यात्मक भेद आढळतात. सद्य सर्वेक्षणात सासरे या नातेवाचक शब्दाकरिता सासरा, सासरो, मामा, हारो, हाहरा, सासरास, हावरा, हावरो, मामाजी असे वैविध्य सापडले आहे. कोल्हापुरातील चंदगड तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे सासरो हा शब्द सापडला, तर पालघर जिल्ह्यात हारो, हाहरा, सासरास, हावरा, हावरो हे वैविध्य वेगवेगळ्या सामाजिक समूहांमध्ये दिसून येते. नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मामाजी हा शब्द प्रामुख्याने आढळून येतो.  सद्य सर्वेक्षणात सासू या संकल्पनेसाठी सासू, मामीजी, सासूस, आत्या, हाऊ इ. वैविध्य दिसून येते. यातील सर्वाधिक वैविध्य पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आढळते.  भारतीय विवाह व्यवस्थेमध्ये असणाऱ्या विवाहविषयक संकेतांवर या नातेवाचक शब्दांवरून प्रकर्षाने प्रकाश पडतो. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाचा कोणाशी विवाह होऊ शकतो याबाबतीत दक्षिण भारतातील राज्य आणि मध्य आणि उत्तर भारतातील राज्य यांमध्ये संकेतभेद आहे. दक्षिणेकडील बहुतांशी प्रदेशांमध्ये मामाच्या मुलीशी/मुलाशी आत्याच्या मुलाचा/मुलीचा विवाह करण्याची प्रथा आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचा प्रभाव नातेवाचक शब्दांमध्ये दिसून येतो. हे निरीक्षण ‘Kinship organization in India’ या डॉ. इरावती कर्वे यांच्या (१९६५, दुसरी आवृत्ती) मानववंशशास्त्राधारित ग्रंथातही नोंदवले आहे. त्यांनी याविषयी सविस्तर विवेचनही केले आहे. याच कारणामुळे सासूसाठी आत्या किंवा मामी तर सासऱ्यांसाठी मामा, मामंजी असे शब्दवैविध्य आढळते.