मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

मुलगा-मुलगी (son-daughter)

मराठीतील ‘मुलगा’ या नातेवाचक शब्दासाठी मुलगा, पोरगा, पॉर, पोर, लेक, ल्योक, जील, मुलगो, पॉरगो, झील, पोरगं, पोऱ्या, चेडो, चोडो, भुर्गे, डिकरा, अंडोर, छोकरो, लेकुस, पोशे, पोट्ट्या, सोहरा, सोवरा असे  शब्दवैविध्य आढळले आहे. यापैकी ‘झील’/’जील’, ‘मुलगो’, ‘पॉरगो’, ‘पोरगं’, ‘पोऱ्या’, ‘चेडो’, ‘चोडो’, ‘भुर्गे’ हे शब्द प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वापरले जातात. ‘डिकरा’, ‘अंडोर’ हे शब्द धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये, ‘छोकरो’ हा शब्द जळगाव, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये, तर ‘लेकुस’, ‘पोशे’, ‘सोहरा’, ‘सोवरा’ हे शब्द पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सापडतात. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या प्रदेशात ‘पोट्ट्या’ हा शब्द सापडतो. ‘मुलगा’, ‘पोरगा’, ‘पॉर’, ‘पोर’, ‘लेक’, ‘ल्योक’ हे शब्द सर्व जिल्ह्यांमध्ये थोड्या फार प्रमाणात दिसून येतात.  मुलगी या नातेवाचक शब्दासाठी मुलगी, पोरगी, पोर, लेक, चिडू, चेडू, बाय, चेली, चेडो, पोर्ग्यो, डिकरी,  आंडेर, पोयरी, लेकीस, पोसी, पोशी, पोट्टी, सोहरी, पोरी, ल्येक, छोरी इ. शब्दवैविध्य सापडले आहे. यातील ‘चिडू’, ‘चेडू’, ‘बाय’, ‘चेली’, ‘चेडो’, ‘पोर्ग्यो’ हे शब्द प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वापरले जातात. ‘डिकरी’, ‘आंडेर’ हे शब्द धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये, तर ‘पोयरी’, ‘लेकीस’, ‘पोसी’, ‘सोहरी’, ‘पोशी’ हे शब्द मुख्यतः पालघर तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही सामाजिक समूहांमध्ये वापरले जातात. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या प्रदेशात ‘पोट्टी’ हा शब्द सापडतो. ‘मुलगी’, ‘पोरगी’, ‘पोर’, ‘लेक’, ‘पोरी’, ‘ल्येक’ इ. शब्द सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळून येतो.