मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

सूर्य उगवण्याची दिशा / सूर्य मावळण्याची दिशा

मराठी भाषेतील दिशादर्शक शब्दांकरीता बोलींमध्ये बरेच वैविध्य दिसून येते. भौगोलिकदृष्ट्या त्या प्रदेशाची रचना आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन (worldview) या दोन गोष्टींचा प्रभाव दिशादर्शक शब्दांच्या रचनेत दिसून येतो.  सूर्य खालच्या दिशेने उगवतो आणि वरच्या दिशेने मावळतो हा दृष्टीकोन सर्वेक्षणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून येतो.  सूर्य उगवण्याची दिशा या संकल्पनेसाठी खालती, खालतीकडं, खालतं, पूर्व, उगवती, उगवंत, खाल्यांग, खाल्लाकड, गंगाम्होरं, गंगेकडं, हेट्टा, हेट्या, सूर्यमुख, सूर्यमोहरी, माडेवाच्या तोंडी, सूर्यदयी, सूर्यतळ, सूर्यसंबर, खालत्याली इ. शब्दवैविध्य सापडले.  सूर्य मावळण्याची दिशा या संकल्पनेसाठी वरती, वरी, वरा,  वरतीकड, पश्चिम आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद, मावळती, वरल्यांग, राकीसम्होरं, रक्साकड, मावलत, नमतं, दिन बुडती, हातमान्गाकडे, उपराल, डोंगरमोहरी इ. शब्द इ. शब्दवैविध्य सापडले.  यापैकी ‘हेट्या’, ‘येट्या’ - ‘वरा’ हे शब्द प्रामुख्याने धुळे जिल्हा, नाशिक जिल्ह्यामधील नाशिक, सटाणा आणि सुरगणा तालुका, नंदुरबार जिल्हा, आणि जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुका या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. त्यातही अहिराणी आणि भिली या मातृभाषा असणाऱ्या भाषकांनी मुख्यतः हेट्या’, ‘येट्या’ - ‘वरा’ हे शब्द वापरले आहेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ‘पूर्व’-’पश्चिम’ आणि ‘उगवती’-’मावळती’ हे शब्द प्रामुख्याने वापरले जातात. तर केवळ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये ‘गंगाम्होरं’- ‘राकीसम्होरं’  आणि ‘गंगेकडं’- ‘रक्साकड’ हे शब्द सापडले, तर प्रामुख्याने अमरावती, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पूर्व, ‘खालती’- ‘वरती’ या शब्दांबरोबरच ‘सूर्यमुख’, ‘सूर्यमोहरी’ - ‘डोंगरमोहरी’, ‘सूर्यदयी’- ‘दिन बुडती’, ‘सूर्यतळ’ -’नमतं’, ‘सूर्यसंबर’ इ. शब्दवैविध्य आढळते.