भाषेतील कालनिदर्शक संकल्पनांपैकी दिवसाचे दर्शक असणाऱ्या चालू दिवस, उलटून गेलेला दिवस आणि येणारा दिवस या संकल्पनांसाठी प्रमाण मराठीमध्ये अनुक्रमे काल, आज आणि उद्या असा तिहेरी भेद आढळून येतो. मात्र महाराष्ट्राच्या पश्चिमोत्तर आणि उत्तर दिशेकडील जिल्ह्यांना गुजराती, तसेच हिंदी भाषिक राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. तसेच या भौगोलिक प्रदेशांत विविध आदिवासी समूह बऱ्याच वर्षांपासून स्थिर झाले आहेत. हिंदी भाषेमध्ये होऊन गेलेला दिवस आणि येणारा दिवस याकरता वेगवेगळे शब्द नाहीत. येथे या संकल्पनांकरता दुहेरी भेद दिसतो. भाषा सान्निध्यामुळे वर उल्लेखलेले ठराविक जिल्हे पद्धतशीर वैविध्य दर्शवतात. चालू दिवसासाठी सर्वत्र ‘आज’ हा एकच शब्द सापडतो. येणाऱ्या दिवसासाठी प्रामुख्याने उद्या हाच शब्द आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे उद्यासोबतच ‘येतलो’ आणि ‘फाल्या’ हे शब्द आढळतात. पालघर जिल्यात ‘उद्या’, ‘उंद्या’, ‘परम’, ‘पहाय’, ‘अवतेकाल’, ‘काल’ हे शब्द सापडतात. धुळे जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि सटाणा तालुका, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, सोयगाव आणि पैठण तालुका, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि धारणी तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद आणि शेगाव तालुका या ठिकाणी ‘उद्या’ या शब्दासोबतच ‘सकाळ’, ‘सकाय’, ‘कालदी’, ‘कालदिन’, ‘काल’, ‘सकाव’, ‘हाकाल’ हे शब्दवैविध्य सापडते. हेच शब्द रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका, त्याचप्रमाणे महाड तालुका येथील कातकरी भाषकदेखील वापरतात. याबाबतीत महत्वाची नोंद अशी की वर नोंदवलेल्या भौगोलिक प्रदेशांमध्ये होऊन गेलेल्या दिवसासाठीही ‘सकाळ’, ‘सकाय’, ‘कालदी’, ‘कालदिन’, ‘काल’, ‘सकाव’, ‘कालदिस’ हे येणाऱ्या दिवसासाठी रूढ असणारे शब्दच सापडतात. अन्य जिल्ह्यांमध्ये काल हा शब्द आढळतो.