नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष : विकार समरूपीभवन
विकार समरूपीभवन म्हणजे दोन किंवा त्याहून अधिक कारक-विभक्तींकरता एकाच प्रत्ययी रूपाचा होणारा वापर. विभक्तीप्रत्ययाचे रूप हा कारकसंबंध ठरविणारा निकष मानला गेला आहे. कॉम्री (१९९१:४४-४७) यामध्ये नोंदविल्याप्रमाणे जर एखादी विभक्ती ही स्वतंत्र प्रत्ययाने दाखविली जात असेल तरच तिला व्याकरणिक दृष्ट्या वेगळी विभक्ती म्हणून मान्यता मिळते.
मराठीच्या प्रादेशिक बोलींमध्ये दिसून येणार्या विकार समरूपीभवनाची उदाहरणे प्रामुख्याने "नॉन-कोअर" या प्रकारात समाविष्ट होतील (ब्लेक २००१:११९-१४४). कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये अश्या पद्धतीचे विकार समरूपीभवन प्रामुख्याने दिसून आले.
संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशात कर्म आणि संप्रदान या कारक संबंधांचे विकार समरूपीभवन दिसून येते. उदाहरणार्थ, ‘त्याने राधाला पाहिले’ आणि ‘आईने प्रियाला पुस्तक दिले’ या दोन्ही वाक्यातील [-ला] हा एकच प्रत्यय अनुक्रमे कर्म (राधा) आणि संप्रदान (प्रिया) या दोन्हींना चिन्हांकित करतो. याचप्रमाणे करण आणि प्रेरक या दोन्ही कारकसंबंधासाठी प्रमाण मराठीमध्ये [-ने] विभक्ती प्रत्यय वापरला जातो. परंतू मराठीच्या सर्व बोलींमध्ये अशा प्रकारचे विकार समरूपीभवन आढळले नाही. उदाहरण - पालघर जिल्ह्यातील हातेरी तालुक्यात ‘पेनाकडं चित्र काडतोय’ (तो पेनाने चित्र काढत आहे) या वाक्यात [-कडं] हा प्रत्यय करणकारकाचा दर्शक म्हणून वापरला जातो तर [-ने] हा प्रत्यय प्रेरककारकाचा दर्शक म्हणून वापरला जातो.
महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील पश्चिम भागात आढळलेल्या विकार समरूपीभवनाचे खाली वर्णन केले आहे. १.0 व्याकरणिक विशेषाची नोंद
[-शी] हा प्रत्यय मराठीच्या सर्व बोलीत सहसंबंध दर्शविण्यासाठी वापरला जातो. परंतू सदर सर्वेक्षणात सहसंबंध व्यतिरिक्त इतरही कारकसंबंध दर्शविण्यासाठी या प्रत्ययाचा वापर आढळून आला आहे. सर्वेक्षणात मिळालेल्या भाषिक सामग्रीमध्ये (१) अपादान आणि सहसंबंध, (२) करण आणि सहसंबंध, (३) अपादान, सहसंबंध आणि करण, (४) अपादान, सहसंबंध आणि अधिकरण तसेच (५) अपादान, सहसंबंध, अधिकरण आणि करण या कारकसंबंधांचे विकार समरूपीभवन आढळून आले आहे. संबंधित विकार समरूपीभवन हे महाराष्ट्रातील केवळ कोकण भागात (प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील निरनिराळ्या जाती-जमातींमध्ये) आढळले आहे. या विशेषाचा भौगोलिक - सामाजिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ अपादान आणि सहसंबंध विकार समरूपीभवनअपादान आणि सहसंबंध हे दोन कारकसंबंध दर्शविण्यासाठी [-शी] या एकाच प्रत्ययाचा वापर राज्यातील ३ जिल्ह्यांत आढळला आहे. या प्रत्ययाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
रायगड | अलिबाग - बोडनी (कोळी समाज) व बापळे (आगरी समाज), रोहा - नागोठणे (सोनकोळी समाज), श्रीवर्धन - बागमांडला (महादेव कोळी समाज), महाड - नरवण (मुस्लिम समाज), मुरूड - एकदरा (महादेव कोळी समाज) |
ठाणे | मुरबाड - पाटगाव (आगरी समाज), अंबरनाथ - उसाटणे (कातकरी समाज) |
पालघर | मोखाडा - दांदवळ (म ठाकूर समाज) |
करण आणि सहसंबंध हे दोन कारकसंबंध दर्शविण्यासाठी [-शी] या एकाच प्रत्ययाचा वापर केवळ पालघर जिल्ह्यातील वसई तालूक्यामधील सायवन गावातील कातकरी समाजात आढळला आहे.
अपादान, सहसंबंध आणि करण कारकसंबंध दर्शविण्यासाठी [-शी/ची] या एकाच प्रत्ययाचा वापर राज्यातील केवळ पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आढळला. या प्रत्ययाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
पालघर | डहाणू - पिंपळशेत (वारली समाज), वसई - वाघोली (वारली समाज) |
रायगड | कर्जत - गोळवाडी (मराठा समाज) व साळोख (कातकरी समाज) |
पालघर जिल्ह्यामधील वाघोली (ता. वसई) गावातील वारली समाजामध्ये [-शी] हे प्रत्ययी रूप करण या कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी तर [-ची] हे प्रत्ययी रूप अपादान कारकसंबंधाचा निर्देश करण्यासाठी आढळले आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील वारली समाजामध्ये [-शी] हे प्रत्ययी रूप करण, अपादान, सहसंबंध आणि अधिकरण या कारकसंबंधांचा निर्देश करण्यासाठी दिसून आले आहे.
१.३.१ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव पिंपळशेत, पु४५, वारली, ८वी) आता चेंडू घितला हाय तेच्याकडशी [अपादान कारकसंबंध] ata čeṇḍu ɡʰitla hay tečakəḍši ata čeṇḍu ɡʰit-l-a hay te-č-a-kəḍ-ši now ball.3SGM take-PFV-3SGM be.PRS he.OBL-GEN-OBL-PP.LOC-ABL Now he has taken the ball from him. १.३.२ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव पिंपळशेत, पु४५, वारली, ८वी) वारलीशी त वारली भाषा बोलतो [सहसंबंध कारकसंबंध] Warliši tə warli bʰaša bolto warli-ši tə warli bʰaša bol-t-o Warli-SOC so Warli language speak-IPFV-1SGM I speak Warli language with Warli people. १.३.३ उदाहरण (जि. पालघर, ता. डहाणू, गाव पिंपळशेत, पु२४, वारली, ६वी) हाताशी बाटली खाली पडली आहे [करण कारकसंबंध] Hataši baṭli kʰali pəḍli ahe hat-a-ši baṭli kʰali pəḍ-l-i ahe hand-OBL-INS bottle.3SGF down fall-PFV-3SGF be.PRS The bottle is dropped by hand. १.३.४ उदाहरण (जि. रायगड, ता. कर्जत, गाव गौळवाडी, स्त्री४२, मराठा, २री) दोनी लोटून दिल्या टेबलावरशी मुलाने [अपादान कारकसंबंध] doni loṭun dilya ṭeblawərši mulane doni loṭ-un di-l-ya ṭebla-wər-ši mula-ne both.OBL sweep-CP give-PFV-3PLF table.OBL-PP.LOC-ABL boy.OBL-ERG The boy swept both the bottles off the table. १.३.५ उदाहरण (जि. रायगड, ता. कर्जत, गाव साळोख, स्त्री२५, कातकरी, अशिक्षित) काय काडं त्यानी फुल पेन्सलीशी [करण कारकसंबंध] kay kaḍə tyani pʰul pensəliši kay kaḍ-ə tya-ni pʰul pensəli-ši what draw-PFV.3SGN he.OBL-ERG flower.3SGN pencil.OBL-INS What has he drawn with the pencil, it’s a flower. १.३.६ उदाहरण (जि. रायगड, ता. कर्जत, गाव साळोख, पु६२, मुस्लिम, १०वी) बॅगशी त्यानं किताब काडून देल्ली [अपादान कारकसंबंध] bæɡši tyanə kitab kaḍun delli bæɡ-ši tya-nə kitab kaḍ-un de-ll-i bag-ABL he.OBL-ERG book.3SGF remove-CP give-PFV-3SGF He removed the book from the bag and gave it (to me). १.३.७ उदाहरण (जि. रायगड, ता. कर्जत, गाव साळोख, पु६२, मुस्लिम, १०वी) याने याला मारला काठीशी मारला [करण कारकसंबंध] yane yala marla kaṭʰiši marla ya-ne ya-la mar-l-a kaṭʰi-ši mar-l-a he.OBL-ERG he.OBL-ACC hit-PFV-3SGM stick-INS hit-PFV-3SGM He hit him with a stick. १.३.८ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव वाघोली, स्त्री५०+, वारली, अशिक्षित) पिशवीची काय काडलं त्यानी [अपादान कारकसंबंध] pišwiči kay kaḍlə tyani pišwi-či kay kaḍ-l-ə tya-ni bag-ABL what remove-PFV-3SGN he.OBL-ERG What did he take out of the bag? १.३.९ उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव वाघोली, पु४५, वारली, अशिक्षित) एकमेकाशी काइतरी बोलतात ते [सहसंबंध कारकसंबंध] ekmekaši kaitəri boltat te ekmeka-ši kaitəri bol-t-at te each other-SOC something speak-IPFV-3PL they They are saying something to each other. १.३.१० उदाहरण (जि. पालघर, ता. वसई, गाव वाघोली, स्त्री५०+, वारली, अशिक्षित) हाताशी मारलं [करण कारकसंबंध] Hataši marlə hat-a-ši mar-l-ə hand-OBL-INS hit-PFV-3SGN (He) hit (him) with his hand. १.४ अपादान, सहसंबंध आणि अधिकरण विकार समरूपीभवनअपादान, सहसंबंध आणि अधिकरण या कारकसंबंधांचे विकार समरूपीभवन दर्शविण्यासाठी [-शी] हा प्रत्यय केवळ उत्तर कोकणात आढळला आहे. या प्रत्ययाचा भौगोलिक व सामाजिक प्रसार आणि उदाहरणे खाली दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
पालघर | डहाणू - बोर्डी (वाडवळ समाज), तलासरी - गिरवाव (वारली समाज) व उधवा (वारली समाज) |
ठाणे | अंबरनाथ - उसाटणे (आगरी समाज) |
अपादान, सहसंबंध, अधिकरण आणि करण या कारकसंबंधांचे विकार समरूपीभवन दर्शविण्यासाठी [-शी] हा एकच प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावातील मुस्लिम समाजात आढळून आला आहे.
१.५.१ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर, गाव कोंडिवरे, स्त्री३०, मुस्लिम, ५वी) घडी काडलान हाताशी [अपादान कारकसंबंध] ɡʰəḍi kaḍlan hataši ɡʰəḍi kaḍ-lan hat-a-ši watch remove-PFV hand-OBL-ABL He removed the watch from his hand. १.५.२ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर, गाव कोंडिवरे, स्त्री३०, मुस्लिम, ५वी) लहानपनाक काय खेलत होतीव सगल्यांशी मिलून मिलून येत होतीव [सहसंबंध कारकसंबंध] ləhanpənak kay kʰelət hotiw səɡlyanši milun milun yet hotiw ləhanpən-a-k kay kʰel-ət hot-iw səɡlyan-ši mil-un mil-un ye-t hot-iw childhood-OBL-LOC what play-IPFV be.PST-1SGF all.OBL-SOC together REDUP come-IPFV be.PST-1SGF As a child (I) used to play and come with everyone. १.५.३ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर, गाव कोंडिवरे, स्त्री७५, मुस्लिम, ५वी) ते तुज्या पप्पाच्या बुआच्या घराशीस होती [अधिकरण कारकसंबंध] te tuǰa pəppača buača ɡʰərašis hoti te tu-ǰ-a pəppa-č-a bua-č-a ɡʰər-a-ši-s hot-i it you-GEN-OBL father-GEN-OBL aunt-GEN-OBL home-OBL-LOC be.PST-3SGF It was near your father’s aunt's house. १.५.४ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर, गाव कोंडिवरे, स्त्री३०, मुस्लिम, ५वी) काइतर टाकला डब्ब्याशी [अधिकरण कारकसंबंध] kaitər ṭakla ḍəbbyaši kaitər ṭak-l-a ḍəbbya-ši something put-PFV-3SGM box.OBL-LOC (He) put something in the box. १.५.५ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर, गाव कोंडिवरे, स्त्री७५, मुस्लिम, ५वी) प्यारशी बाय बोलतो (मुलीला) [करण कारकसंबंध] pyarši bay bolto pyar-ši bay bol-t-o love-INS ‘bay’ speak-IPFV-1PL We address our daughter as ‘bay’ with love. संदर्भ :• कॉम्री, बर्नार्ड. (१९९१). फॉर्म अॅण्ड फंक्शन इन आयडेंटिफाइंग केसेस. प्लॅन्क, फ्रांस (संपा.), पॅराडाइम्स : द इकॉनॉमी ऑफ इंफ्लेक्शन, ४१-५६. बर्लिन : मूतॉ द ग्रायटर. • ब्लेक, बॅरी. (२००१). केस. केम्ब्रिज : सी.यू.पी.