मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

मराठी भाषा / मराठी भाषेची यापूर्वीची सर्वेक्षणे

मराठीचा भारतीय-युरोपीय भाषाकुळातील ‘आर्य’ या शाखेत समावेश केला जातो. कोकणी, गुजराती, बंगाली ह्या याच भाषाकुळातील इतर काही भाषा. मराठी भाषेतील भौगोलिक विविधतेचे पहिले सर्वेक्षण ब्रिटीश अधिकारी सर जॉर्ज ग्रियरसन यांच्या ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ या अभ्यासांतर्गत झाले (१९०७). तदनंतर झालेल्या मराठीच्या भाषिक सर्वेक्षणापैकी काही महत्त्वाची सर्वेक्षणे पुढीलप्रमाणे आहेत: डेक्कन कॉलेजच्या डॉ. अमृतराव घाटगे यांचे ‘सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्टस्’ (१९६३-१९७३): यात कोकण पट्ट्यातील कुडाळी, वारली, गोव्यातील गावडी, केरळमध्ये स्थलांतरित झालेल्या कासारगोड तसेच कोची शहरातील कोकणीचे भाषाप्रकार, इत्यादींचा समावेश होता. त्यांनी प्रत्येक बोलीची स्वनव्यवस्था, तिची व्याकरणिक व्यवस्था व बोलीतील काही वाक्यांचे आणि गोष्टींचे पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशन केले. सन २०१३ मध्ये डेक्कन कॉलेजच्याच डॉ. रमेश धोंगडे यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक साहाय्याने ‘मराठीचा भाषिक नकाशा: पूर्वतयारी’ हे सर्वेक्षण केले. यात महाराष्ट्रातील आठ प्रमुख केंद्रांमध्ये (धुळे, नाशिक, नागपूर, गडचिरोली, कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर आणि नांदेड) गोळा केलेल्या शब्दस्तरावरील सामग्रीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०१३ मध्येच भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या शृंखलेअंतर्गत महाराष्ट्रातील बोलींचे लोकसर्वेक्षण श्री. अरुण जाखडे (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) यांनी संपादित व प्रकाशित केले आहे.