या संकेतस्थळामध्ये सादर केलेली भाषा-सामग्री महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निम-शहरी भागातील क्षेत्रपाहणीद्वारे गोळा केलेली आहे. मे २०१८ ते मार्च २०२० दरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रपाहणी करुन ही सामग्री एकत्रित करण्यात आली आहे. राज्यातील ३५ पैकी २५ जिल्ह्यांतील २३१ गावांमधील एकूण २,२८५ व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्व मुलाखती सोनी आयसी रेकॉर्डरचा वापर करुन ध्वनिमुद्रित करण्यात आल्या आहेत.
भाषा-सामग्रीचे संकलन करण्यासाठी “जिल्हा’’ हे एकक गृहीत धरले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य शहर ज्या तालुक्यात स्थित आहे तो तालुका व या तालुक्यापासून लांबचा, सीमा भागाच्या जवळचा असे इतर दोन ते तीन तालुके निवडले. प्रत्येक तालुक्यातील मुख्य शहराजवळच्या ग्रामीण भागातील एक गाव आणि शहरी भागापासून लांब असलेले एक गाव अशी प्रत्येक तालुक्यातील दोन गावे निवडली. लोकसंख्या, शेजारच्या जिल्हा/ राज्याची निकटता आणि त्या प्रदेशातील बोलीभाषेच्या भिन्नतेबाबत असलेली कल्पना हे ही निकष लक्षात घेऊन तालुक्यांची आणि गावांची निवड केली.
उदाहरण: कोल्हापूर जिल्ह्यात एकंदर बारा तालुके आहेत. जिल्ह्यातील मुख्य शहर (कोल्हापूर) हे करवीर तालुक्यात स्थित आहे. शहरी भागाच्या जवळ असलेले करवीर मधील गडमुडशिंगी गाव आणि कोल्हापूर शहरापासून लांब असलेले खुपिरे हे गाव निवडले. करवीर या तालुक्याव्यतिरिक्त कर्नाटक राज्याच्या निकट असलेला गडहिंग्लज तालुका, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेला चंदगड तालुका, कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळ असलेला शाहुवाडी हा तालुका. (कोल्हापूर जिल्ह्यातील क्षेत्रपाहणी या सर्वेक्षणात सर्वात आधी केली होते. प्रकल्प पद्धति निश्चित करण्याची प्रक्रिया अद्याप अंतिम झाली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्गच्या जवळ पण कर्नाटक पासून लांब असलेला राधानगरी तालुका आणि कर्नाटकच्या सीमेवर पण कोकण भागापासून दूर असलेला कागल तालुका येथे देखील भाषिक नमुने गोळा करण्यात आले.) अशा प्रकारे कोळौर जिल्ह्यातील बारा पैकी सहा तालुक्यांमध्ये भाषा-सामग्री गोळा करण्यात आली.
पूर्ण झालेल्या क्षेत्रपाहणीचा तपशील:
Total no. of Districts sampled | Tehsils | Villages Sampled | Total no. of Interviews |
---|---|---|---|
25 | 101 | 231 | 2285 |
निवडलेल्या प्रत्येक गावात मुलाखती घेऊन भाषा सामग्री गोळा करण्यात आली. मुलाखतीसाठी व्यक्तींची निवड करत असताना सामाजिक-भाषाविज्ञान या ज्ञानशाखेतील मानक निकषांचे पालन करण्यात आले:
गावांतील सर्व मुख्य धर्म /जाती समूहामधील तीन वयोगटांतील (१८-३०,३१-५५,५५+ वर्षे) पुरुष व महिला भाषकांकडून सामग्री गोळा करण्यात आली. अशिक्षित तसेच साक्षर भाषकांचा मुलाखतींसाठी समावेश करण्याची काळजी घेण्यात आली. काही गावांमध्ये अमराठी पण पिढ्यां पिढ्या त्याच गावात वास्तव्य असलेले आणि संख्येने मोठ्या प्रमाणात असणारे समाज आढळले. उदाहरणार्थ, नंदुरबारमधील भिल्ल; लातूर, सोलापूर, मिरजमधील कन्नड भाषक; रत्नागिरी व इतरत्र असलेले उर्दू भाषक; नागपुरातील गोंडी भाषक इत्यादी. जिथे अशा समाजातील व्यक्तींनी घराबाहेरील सर्व व्यवहारांसाठी मराठी भाषा वापरात असल्याचे नोंदविले, अशा व्यक्तींच्या देखील मुलाखती घेऊन भाषिक नमुने गोळा करण्यात आले.
ग्रामीण समुदायातील भाषेच्या वापराची माहिती गोळा करण्यासाठी, तसेच स्थानिक समुदायातील सामाजिक आणि आर्थिक संबंधांविषयीची माहिती एकत्रित करण्यासाठी एक समाज-भाषाविषयक प्रश्नावली तयार केली गेली.
घरगुती वस्तु आणि फळे-भाज्यांसाठीची नावे मिळवण्यासाठी चित्रांचा संच वापरला आहे. तसेच नातेसंबंधीय संज्ञा, व्यक्ती, काळ, स्थान दर्शक संज्ञा विचारण्यात आल्या आहेत.
व्याकरणिक वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळवण्यासाठी डेक्कन कॉलेज प्रेरित साधनांचा/ स्टिम्युलस किटचा (सुमारे सत्तर व्हिडिओंचा समावेश असणारे किट) वापर करण्यात आला आहे. या स्टिम्युलस किटमध्ये विशिष्ट व्याकरणात्मक श्रेण्या आणि व्याकरणिक रचना दर्शविण्यासाठी तयार केलेले व्हिडिओ आहेत, उदाहरणार्थ-
लिंग प्रणाली, विभक्ती प्रत्यय, क्रियाव्याप्तीचे निर्देशक, वाक्यातील विविध घटकांमधील सुसंवादाचे दर्शक, इत्यादी.
मुलाखती दरम्यान संशोधक त्या व्यक्तीचे निरीक्षण करत असतो. याचा व्यक्तीच्या भाषेवर परिणाम होऊ शकतो. (लॅबॉव्ह १९७२ याला “observer’s paradox” म्हणतो.) हा परिणाम कमीत कमी व्हावा म्हणून मुलाखतीमध्ये दोन प्रकारच्या कथनांचा समावेश केला गेला: प्रत्येक व्यक्तीकडून पारंपारिक कथांचे कथन (उदा: ससा आणि कासव, लाकूडतोड्या आणि देवी, म्हातारी आणि भोपळा) आणि वैयक्तिक अनुभवांचे कथन, बालपणीच्या स्मृतींचे कथन इत्यादी मिळविण्यात आले.
चित्र आणि व्हिडिओ यांचा उपयोग करुन मिळविलेली माहिती आय.पी.ए.(IPA) या लिपीचा वापर करुन लिप्यंतरित केलेली आहे. प्रत्येक गावात संग्रहित केलेले पारंपारिक कथांचे कथन आणि वैयक्तिक अनुभव यांचे लिप्यंतर संशोधक साहाय्यकांनी केले. कथनात्मक भाषा सामग्रीचे विश्लेषण ‘Leipzig Glossing Rules’ (पाहा: https://www.eva.mpg.de/lingua/pdf/Glossing-Rules.pdf) ह्या नियमावलीच्या साहाय्याने केलेले आहे.
जिल्हा | तालुका | गावे | अक्षांश | रेखांश |
---|