मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

वडिलांचा मोठा भाऊ आणि वडिलांचा धाकटा भाऊ, वडिलांच्या मोठ्या भावाची बायको आणि वडिलांच्या धाकट्या भावाची बायको

डाउनलोड वडिलांचा मोठा भाऊ आणि वडिलांचा धाकटा भाऊ, वडिलांच्या मोठ्या भावाची बायको आणि वडिलांच्या धाकट्या भावाची बायको

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘वडिलांचा मोठा भाऊ’ आणि ‘वडिलांच्या मोठ्या भावाची बायको’ या दोन नात्यांना महाराष्ट्रातील विविध प्रदेशात शब्दवैविध्य दिसून येते. वडिलांचा मोठा भाऊ या नात्याला च़ुलता, काका, मोठा बाबा, मोठे वडील, मोठा बापू, मोठा बाप, मोठा पप्पा, म्हालपा, मोठा आबा, चाचा, बाबास, वडलो तिती, वडाओ, ढाल बाबा,मोटे पिताजी, आजोबा, खबा, बडो बाप, बडे अब्बा, आजलो, भावला, अंकल, इ. शब्द वापरले जातात. तसेच वडिलांच्या मोठ्या भावाच्या बायकोला च़ुलती, मोठी आई, काकी, मोठी मा, बडी अम्मी, चाची, मोटी मम्मी, मोठी बाय, म्हालपी, तिती माय, आंटी, भावलानीस, आजी, धोडावा, मावशी, ई. शब्द वापरले जातात. वडिलांचा मोठा भाऊ हा वडिलांपेक्षा वयाने मोठा असल्या कारणाने मोठा हे विशेषणाचा वापर करून मोठा बाप किंवा मोठा वडिल असे शब्द वापरले जातात. अशाच प्रकारे मोठ्या आईच्या बाबतीतही होते.

‘वडिलांचा छोटा भाऊ आणि त्याची बायको’ या नात्याला मराठी मध्ये मोजकेच शब्द वापरले जातात. प्रामुख्याने वडिलांच्या छोट्या भावासाठी च़ुलता, काका हे शब्द आणि च़ुलती, काकी किंवा काकू हे शब्द वडिलांच्या छोट्या भावाच्या बायकोसाठी वापरले जातात. वडिलांचा मोठा भाऊ या नात्याला जसे मोठा बाबा, मोठा वडिल, मोठा बाप असे शब्द वापरले जातात तसे छोट्या भावाला छोटा बाबा, छोटा वडिल, छोटा बाप असे शब्द वापरले जात नाहीत.

च़ुलता-च़ुलती ही संकल्पना सबंध महाराष्ट्रात वापरली जाते. परंतू पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यामध्ये पुणे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली या भागात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर नाशिकचा काही भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागातही हे शब्द वापरले जातात. महाराष्ट्राच्या इतर भागात तुरळक प्रमाणात हे शब्द वापरले जातात. गडचिरोली जिल्ह्यात वडिलांच्या लहान भावासाठी चुलता हा शब्द केवळ कुणबी समाज वापरत असल्याचे आढळून आले. च़ुलती या संकल्पनेसाठी च़ुलती, चुलती हे ध्वन्यात्मक साधर्म्य आढळून आले आहे. तर च़ुलता या संकल्पनेसाठी च़ुलता, च़ुलते, च़ुलतो, च़ुलतं, चुलते, चुलता, च़ुलतोस, च़ुलतस हे शब्द आढळून आले आहेत.

वडिलांचा लहान भाऊ आणि वडिलांच्या लहान भावाच्या बायकोसाठी महाराष्ट्रभर काका-काकी हेच शब्द वापरले जातात. तर वडिलांच्या मोठा भाऊ आणि वडिलांच्या मोठ्या भावाच्या बायकोसाठी काका-काकी हे शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे पालघर या भागात जास्त प्रमाणात वापरले जातात. तर काका-काकू हे शब्द धुळे नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. या शिवाय महाराष्ट्राच्या इतर भागातही कमी अधिक प्रमाणात हे शब्द वापरले जातात. काका-काकी या संकल्पनेसाठी काकी, काकू, मोठी काकी, मोठ्या काकू इ. ध्वन्यात्मक सारखेपणा आढळून आला आहे. तसेच वडिलांचा मोठा भाऊ या संकल्पनेसाठी काका, मोठे काका, काको, मोठो काका, काकाजी इ. ध्वन्यात्मक सारखेपणा आढळून आला आहे.

सदर मोठे बाबा-मोठी आई त्याचप्रमाणे मोठे वडील हे शब्द महाराष्ट्रात विदर्भात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे पालघर या भागात काही प्रमाणात वापरले जातात. औरंगाबादचा सोयगाव तालुका आणि नांदेडच्या किनवट, मुखेड तालुक्यात काही प्रमाणात वापरले जातात. तर पुणे, कोल्हापूर आणि लातूर या भागात अत्यल्प प्रमाणात वापरले जातात. मोठी आई या संकल्पनेसाठी ध्वन्यात्मक साधर्म्य असलेले मोठी आई, मोटी आई, मोटी आय, थोरली आई, आई, मोठी आया, बोठी आय, आया, म्होट्या आ, म्होट्या आया, मोटा आया, मोटं आया, मोठ्या आया, मुट्टी आई, आय, मोठाय, मोठ्या आई, च़ुलत आई, म्होटी आई, मोट्या आई, बडी आई इ. शब्द वापरले जातात. मोठी या शब्दांचे मोटी, बोठी, मोट्या, म्होट्या, मोठ्या, मोटं असे तर आई या शब्दाचे आय, आयस, आया, आ, असे साधर्म्य असलेले शब्द वापरात असल्याचे दिसते.

मोठे बाबा या संकल्पनेसाठी मोठे बाबा, मोठा बाबा, मोटे बाबा, बा, मोठा बा, मोठा बापा, मोटा बा, मोठे बा, मोठे आबा, बाबजी, मोठो बाबो, बडो बाब, मोटे बाबा, बाबाजी, बडे बाबा इ. शब्द वापरले जातात. मोठे बाबु किंवा मोठा बाबु हा शब्द केवळ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात कोहळी आणि बिंजेवार या समाजात वापरला जातो.

त्याचप्रमाणे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठी माय- मोठा बाप हे शब्द वापरले जातात. तसेच मराठवाड्यातील नांदेड, जालना आणि औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यात तुरळक प्रमाणात वापरले जातात. मोठी माय या संकल्पनेसाठी, मोट माय, होडली माय, मोठी माय, थोरली माय, ई ध्वन्यात्मक वेगळेपण असलेले शद्ब वापरले जातात. आई शब्दासाठी माय आणि मोठी या शब्दासाठी तित, होड, खुट, खन हे शब्द वापरले जातात. मोठा बाप या संकलनेसाठी मोट्या बाप, मोठा बाप, मोठो बाप, म्होटा बा, मोटा बाप इ. शब्द आढळून आले.

मोठी मा हा शब्द भंडारा, गोंदिया, अमरावती, गडचिरोली या भागात वापरला जातो. त्याच बरोबर जळगावमध्ये तेली, धुळ्यात कासार, आणि नंदुरबार जिल्ह्यात भिल्ल समाजात तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. या संकल्पनेसाठी मा, मोठी मा, बडी मा, मोटी मा, म्होटी मा इ. ध्वन्यात्मक सारखेपणा असणारे शब्द वापरले जातात.

मोठी बाय हा शब्द नंदुरबार, रायगड, जालना या जिल्ह्यात आढळून आला. या शब्दाचे मोठी बाय, मोटीबय, बाई, असे ध्वन्यात्मक साधर्म्य आढळून आले. मोठा बापू हा शब्द पालघर जिल्ह्यात तसेच वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात वापरत असल्याचे आढळून आले. या शब्दाचे मोठा बापू, मोटे बापा, मोटा बापु, मोठे बाप्पुजी इ. ध्वन्यात्मक साधर्म्य आढळून आले. पालघर येथे ‘मोठा बापूस’ हा शब्द मिळाला आहे. मोठा पप्पा-मोठी मम्मी हे शब्द वापरण्याचे प्रमाण नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. अमरावती, जळगाव, नंदुरबार, पालघर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात हे शब्द वापरले जात आहेत. हे शब्द केवळ सुशिक्षित तरुण मुली वापरतात असे आढळून आले आहे. या शब्दांचे ध्वन्यात्मक साधर्म्य असलेले शब्द पुढील प्रमाणे आहेत- मोटी मम्मी, मोठी मम्मी, म्होटी मम्मी, मोठा पप्पा, पप्पा, मोटे पपा, मोठे पप्पा, मोटे पप्पा, म्होटे पपाजी, मोटं पप्पा इ. म्हालपा-म्हालपी हे शब्द भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वापरले जातात. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रामुख्याणे कुणबी समाजात हे शब्द वापरले जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील ढिवर समाजात (अशिक्षित भाषकांमध्ये) हा शब्द आढळलून आला आहे. म्हालपी या संकल्पनेसाठी म्हालपी, मालपी असे ध्वनीसाधर्म्य आढळून आले आहे. तर म्हालपा या संकल्पनेसाठी माहालपा, मालपा, म्हालपा, मालपे इ. ध्वनिमिक साधर्म्य आढळून आले आहे. मोठा आबा हा शब्द पालघर, ठाणे आणि अमरावती जिल्ह्यात वापरला जातो. मोठे दादा हा शब्द भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वापरला जातो. या शब्दासाठी दादा, म्होटा दादा, म्होटे दाजी, मोठा दादा, मोटे दादा, मोटे दादाजी, म्होटा दादाजी इ. ध्वन्यात्मक साधर्म्य आढळून आले.

बडे पप्पा-बडी मम्मी या शब्दांचे ध्वन्यात्मक साधर्म्य असलेले शब्द पुढीलप्रमाणे वापरले जातात- बड मम्मी, बडे मम्मी, बडी मम्मी, बडे पप्पा, बडे पापा इ. हे शब्द मुख्यत: नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण व्यक्ती वापरतात. तसेच जळगाव जिल्ह्यातील तेली समाजात हा शब्द आढळून आला आहे.

चाचा-चाची हे शब्द नागोठाणे(रायगड) आणि नांदगाव (औरंगाबाद) येथील मुस्लिम समाजात वापरले जातात. बडे आब्बा, बडे अब्बा, आबा, बडी आम्मी, बडी अम्मी हे शब्द औरंगाबादच्या नायगाव आणि सिंधुदुर्गच्या नांदगावातील मुस्लिम समाजात वापरले जातात.

बाबा-आई आणि काका-काकी या शब्दांच्या पुढे ‘स’ लावण्याचा प्रकार महाराष्ट्रात ठाणे पालघर, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यात आढळतो. या भागातील कातकरी, ठाकूर, कोकणा, वारली आणि महादेव कोळी या समाजात असे शब्द वापरले जातात. मात्र नाशिक जिल्ह्यातील महादेव कोळी आणि वारली असे शब्द वापरत नसल्याचे आढळून आले आहे. ‘स’ लावून पुढील प्रमाणे शब्द वापरले जातात - काकूस, काकीश, मोठी आईस, मोट्या आयस, मोठ्या आईस, मोटी आईस, म्होटी आईस, मोठ्यास, आईस इ. तसेच काकास, मोठा बास, मोठा भास, मोठा बहास, बाबास, बाबुस, मोठे बाबास, मोटा बाबास इ. ध्वन्यात्मक साधर्म्य असलेले शब्द वापरले जातात. मोट्या बापूस हा शब्द केवळ पालघर जिल्ह्यातील वारली समाज वापरत असल्याचे आढळून आले.

वडलो तिती-तिती माय हे शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजामध्ये वापरले जातात. या शब्दांचे ध्वन्यात्मक साधर्म्य असणारे वडिलांच्या मोठ्या भावाच्या बायकोसाठी तिती माय, तिमाय इ. तर वडिलांच्या मोठ्या भावासाठी तिवा, तिती, वडलो तिती, होडली पाय इ. शब्द वापरले जातात.

गडचिरोली जिल्ह्यातील ढिवर, माना आणि गोंड समाजात डगर बाबा-डगर आई हा शब्द वापरला जातो. या शब्दाचे डगर बाबा, डगर बाजी, डगर बाबाजी, डग्राई आणि डगर आई असे ध्वन्यात्मक साधर्म्य आढळते. बडे बाबू-बडी मा हे शब्द गडचिरोली जिल्ह्यातील कवर समाजात वापरले जातात. या कवर समाजाची मातृभाषा छत्तीसगडी आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ढिवर समाजात हे शब्द वापरले जातात असे आढळून आले आहे.

मोठो बाबो-मोठी माय हे शब्द नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा या गावातील भिल्ल समाजात वापरले जातात. वडाओ- वडाई हे शब्द पालघरच्या तलासरी तालुक्यातील दुबळा, धोडिया समाजात वापरले जातात. हे समाज गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले आहेत. ढाल बाबा-ढालाई हे शब्द जळगाव जिल्ह्यातील वैजापूर या गावातील पावरा समाजात वापरले गेले आहेत.

मोटे पिताजी हा शब्द गोंदिया जिल्ह्यात आढळून आला. तर बडा पिताजी हा शब्द अमरावती जिल्ह्यात आढळून आला.

खबा-खन माय हे शब्द अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील कोरकु समाजात वापरले जातात. या शब्दांशी ध्वन्यात्मक साधर्म्य असणारे शब्द खुट माय, खन माय, खान माय, खबा, खटबा असे वापरले जातात. खबा हा शब्द वडिलांच्या मोठ्या भावासाठी वापरला जातो तर खन माय हा शब्द वडिलांच्या मोठ्या भावाच्या बायकोसाठी वापरला जातो. आजलो-आजली हे शब्द नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे भिल्ल समजात वापरले गेले आहेत. आजोबा हा शब्द केवळ नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा, खांडबारा येथे भिल्ल समजात वापरला गेला आहे. तर आजी हा शब्द चिंचपाडा, धानोरा, आणि जळगाव जिल्ह्यातील निरूळ येथे वापरला गेला आहे. विशेषकरून भिल्ल, पावरा, गुजर आणि चांभार समाजात हा शब्द वापरला गेला आहे.

बड्डो-बड्डी- गोंदिया जिल्ह्यातील तेडवा या गावात राज गोंड समाजात हे शब्द वापरले जातात.

बडो बाप-बडी बाई हे शब्द औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पिंपळखुटा या गावात रजपूत भामटा आणि चमारु या दोन समाजात वापरले जातात. या शब्दाचे ध्वन्यात्मक साधर्म्य बडो बाप-बडी बाई, बड बाबो-बड माई असे आढळून येते.

अंकल-आंटी हे शब्द जळगाव जिल्ह्यातील वैजापूर आणि वाकोद या गावातील सुशिक्षित तरुण मुलींनी वापरले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील ख्रिश्चन समाजात अंकल हा शब्द वापरला गेला आहे.

धोडावा हा शब्द महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील सोलापूर, उस्मानाबाद आणि कोल्ह्यापूर या जिल्ह्यामध्ये कन्नड भाषा बोलता येण्यारे लोक वापरतात. धोडावा हा मूळचा कन्नड शब्द आहे. धोड म्हणजे मोठी आणि आवा म्हणजे आई. धोड+आवा = धोडावा असा शब्द तयार झाला आहे. धोडावा या संकल्पनेसाठी धोडावा, आव्वा, अवा, दड्डाव असे ध्वन्यात्मक साधर्म्य आढळून आले.

मोठा बावा हा शब्द अमरावती जिल्ह्यात वापरला गेला आहे. बडा भाऊसा हा शब्द औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड येथे आढळून आला.

चंद्रपूर जिल्ह्यात कोलाम समाजात लहान चुलतीसाठी मावशी हा वापरला गेला आहे.

सर्वसाधारणपणे असे लक्षात येते की वडिलांचा मोठा भाऊ आणि त्याची पत्नी यांकरता स्वत:चे वडील आणि आई यांच्याकरिता वापरले जाणारे शब्द ‘मोठा’ हे विशेषण लावून वापरले जातात.