मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो अथवा लागत नाही

Download सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो अथवा लागत नाही
सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो अथवा लागत नाही
The varients presented in the note below are arranged according to their frequency of occurrence in the survey data-from most frequent to least frequent.

हिंदी, पंजाबी, गुजराती, कोंकणी या काही आर्य भाषांप्रमाणे मराठी देखील ‘आंशिक प्रेरकप्रवण भाषा’ (split ergative language) म्हणून ओळखली जाते. पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या सकर्मक वाक्यातील तृतीय पुरुषातील कर्त्याला [-ने] हा प्रेरक प्रत्यय लागतो आणि वाक्यातील क्रियापदाचा विभक्तिवाचक नसलेल्या कर्माशी सुसंवाद होतो. प्रमाण मराठीतील ‘सशाने गवत खाल्ले’ हे उदाहरण पाहा. या पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या वाक्यातील ‘ससा’ या कर्त्याला [-ने] हा प्रेरक प्रत्यक लागला आहे आणि ‘खाल्ले’ या क्रियापदाचा ‘गवत’ या एकवचनातील नपुंसकलिंगी कर्माशी सुसंवाद झाला आहे. त्याचप्रमाणे ‘कासवाने शर्यत जिंकली’ या वाक्यातील ‘कासव’ या कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागला आहे आणि ‘शर्यत’ या एकवचनातील स्त्रीलिंगी कर्माशी ‘जिंकणे’ या क्रियापदाचा सुसंवाद झाला आहे - ‘जिंकली’. ‘कासवाने सशाला हरवले’ या प्रमाण मराठीतील वाक्यात ‘हरवणे’ या क्रियापदाचा ‘ससा’ या विभक्तिविकारित कर्माशी सुसंवाद होत नाही; या पर्यायाअभावी क्रियापद नपुंसकलिंगी सुसंवाद दर्शविते - ‘हरविले’.


१.0 व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या प्रमाण बोलीत सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील (प्रेरक रचनेतील वाक्य) प्रथम आणि द्वितीय पुरुषातील सर्वनामाला प्रेरक प्रत्यय लागत नाही; केवळ तृतीय पुरुषातील सर्वनामाला [-ने] हा प्रत्यय लागतो. परंतु मराठीच्या काही प्रादेशिक बोलींमध्ये सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील प्रथम आणि द्वितीय पुरुषातील सर्वनामाला देखील प्रेरक प्रत्यय लागतो. मराठीच्या बोलींमध्ये ‘प्रेरक रचनेतील कर्त्याला लागणारा प्रेरक प्रत्यय’ या व्याकरणिक विशेषाच्या दोन पर्यायी रचना आढळल्या आहेत: (१) सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील केवळ तृतीय पुरुषातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो; (२) सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील प्रथम पुरुष, द्वितिय पुरुष आणि तृतीय पुरुषातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो. सर्वेक्षणात सापडलेल्या दोन्ही पर्यायांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.


१.१ पर्यायी रूप १ : सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील केवळ तृतीय पुरुषातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो
ही व्याकरणिक संरचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळते.
१.१.१ उदाहरण (जि. सोलापूर, ता. अक्कलकोट, गाव कुरनूर, पु३५, मराठा, बी.कॉम.)
येनी बॉल असा टाकला समोरच्या बावाच्यासमोर
yeni bɔl əsa ṭakla səmorča bawačasəmor
ye-ni bɔl əsa ṭak-l-a səmor-č-a bawa-č-a-səmor
he.OBL-ERG ball.3SGM thus.3SGM throw-PFV-3SGM ahead-GEN-OBL brother-GEN-OBL-ahead
He threw the ball in front of the other person.
१.२ पर्यायी रूप २ : सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषातील कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागतो

हा व्याकरणिक पर्याय राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये आढळला. या पर्यायाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत :


जिल्हा तालुका व गाव
गडचिरोली कोरची – मोहगाव
गोंदिया गोंदिया - कासा व तेढवा
भंडारा भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी
नागपूर नागपूर - येरला व सोनेगाव (लोधी), भिवापूर - सावरगाव व बोटेझरी, रामटेक - भोजापूर व करवाही, नरखेड - उमरी व पांढरी
वर्धा आष्टी - खडका व थार, हिंगणघाट - अजंती व पोती, सेलू - वडगाव जंगली व झडशी
यवतमाळ घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - दगड-धानोरा
अमरावती अमरावती - मलकापूर, वरूड - गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद, धारणी - कावडाझिरी
अकोला अकोला - गोपाळखेड व येवता
वाशिम रिसोड - घोणसर व चाकोली, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक)
बुलढाणा बुलढाणा - पळसखेड भाट व वरवंड, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ
औरंगाबाद औरंगाबाद - भिकापूर-नायगाव व पिंपळखुंटा, वैजापूर - सावखेडगंगा, सोयगाव - घोसला व पळसखेडा
जळगाव जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - हातले, चोपडा - वैजापूर
धुळे धुळे - लळिंग व खेडे
नंदुरबार शहादा - प्रकाशा
नाशिक सुरगणा - काठीपाडा
पालघर वसई - सायवन, डहाणू - बोर्डी व वेती, जव्हार – खंबाळा
ठाणे ठाणे - येऊर, अंबरनाथ - उसाटणे, भिवंडी -भिवली, मुरबाड - पाटगाव, शहापूर - चौंढे बुद्रुक
रायगड कर्जत - साळोख, रोहा - नागोठाणे, मुरुड - एकदरा, महाड - नरवण व भेलोशी
पुणे जुन्नर - धामणखेल
अहमदनगर अहमदनगर - कामरगाव व नारायणडोहो, नेवासा - खलालपिंपरी
बीड बीड - बेडूकवाडी व कोल्हारवाडी
जालना मंठा - उसवद
हिंगोली हिंगोली - कारवाडी
नांदेड नांदेड - पांगरी
कोल्हापूर गडहिंग्लज - हेब्बाळ-जलद्याळ


प्रथम पुरूष एकवचन प्रेरक सर्वनामाचे म्या हे रूप महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांपैकी १७ जिल्ह्यांत आढळले. म्या या रूपाचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत :


जिल्हा तालुका व गाव
गडचिरोली कोरची - मोहगाव
गोंदिया गोंदिया - तेढवा
भंडारा भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी
नागपूर नागपूर - येरला व सोनेगाव (लोधी), भिवापूर - सावरगाव व बोटेझरी, रामटेक - भोजापूर व करवाही, नरखेड - उमरी व पांढरी
वर्धा हिंगणघाट - अजंती
यवतमाळ घाटंजी - खापरी व कुर्ली
अमरावती दर्यापूर - भामोद, धारणी - कावडाझिरी
अकोला अकोला - गोपालखेड
बुलढाणा बुलढाणा - वरवंड, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ
औरंगाबाद सोयगाव - घोसला आणि पळसखेडा
जळगाव जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - मंगलवाडी, चाळीसगाव - हातले, चोपडा - वैजापूर
धुळे धुळे - लळिंग व खेडे
नंदुरबार शहादा - प्रकाशा
नाशिक सुरगणा - काठीपाडा
पालघर वसई - सायवन, डहाणू - बोर्डी व वेती ल
रायगड कर्जत - साळोख, रोहा - नागोठाणे, मुरुड - एकदरा, महाड – नरवण
ठाणे ठाणे - येऊर, अंबरनाथ - उसाटणे, भिवंडी -भिवली, मुरबाड - पाटगाव, शहापूर - चौंढे बुद्रुक
कोल्हापूर गडहिंग्लज - हेब्बाळ-जलद्याळ


१.२.१ उदाहरण (जि. नागपूर, ता. भिवापूर, गाव बोटेझरी, पु५०, बौद्ध-महार, बी.कॉम.) मंजे एका दिवशी चार शो बगितले मीनं
məñǰe eka diwši čar šo bəɡitle minə
məñǰe ek-a diwš-i čar šo bəɡit-l-e mi-nə
means one-OBL day.OBL-LOC four show see-PFV-3PL I-ERG
Means I watched four shows (of a movie) in one day.
१.२.२ उदाहरण (जि. यवतमाळ, ता. नेर, गाव दगड-धानोरा, पु२४, कुणबी, एम.ए.)
म्या माया मित्राले बॉल दिला
mya maya mitrale bɔl dila
mya maya mitra-l-e bɔl di-l-a
I.ERG I.OBL.GEN.OBL friend.OBL-DAT ball.3SGM give-PFV-3SGM
I gave the ball to my friend.
१.२.३ उदाहरण (जि. नागपूर, ता. भिवापूर, गाव बोटेझरी, पु२८, कुणबी, ९वी)
तुमीनं पाळल्या कउन बॉ बाटला
tuminə paḷlya kəun bɔ baṭla
tumi-nə paḷ-l-ya kəun bɔ baṭla
you.PL-ERG drop-PFV-3PL why DM bottle.PL.F.
Why did you drop the bottles?
१.२.४ उदाहरण (जि. बुलढाणा, ता. बुलढाणा, गाव वरवंड, स्त्री२०, अहिरे-धनगर, १२वी)
मीनं काम केलं तून केलं का
minə kam kelə tun kelə ka
mi-nə kam ke-l-ə tu-n ke-l-ə ka
I-ERG work.3SGN do-PFV-3SGN you-ERG do-PFV-3SGN what
I did the work. Have you (done the work)?
१.२.५ उदाहरण (जि. नाशिक, ता. नाशिक, गाव मडसांगवी, स्त्री४९, न्हावी, ८वी)
पानी दिलं तिनी
pani dilə tini
pani di-l-ə ti-ni
water.3SGN give-PFV-3SGN she-ERG
She gave water.