हिंदी, पंजाबी, गुजराती, कोंकणी या काही आर्य भाषांप्रमाणे मराठी देखील ‘आंशिक प्रेरकप्रवण भाषा’ (split ergative language) म्हणून ओळखली जाते. पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या सकर्मक वाक्यातील तृतीय पुरुषातील कर्त्याला [-ने] हा प्रेरक प्रत्यय लागतो आणि वाक्यातील क्रियापदाचा विभक्तिवाचक नसलेल्या कर्माशी सुसंवाद होतो. प्रमाण मराठीतील ‘सशाने गवत खाल्ले’ हे उदाहरण पाहा. या पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या वाक्यातील ‘ससा’ या कर्त्याला [-ने] हा प्रेरक प्रत्यक लागला आहे आणि ‘खाल्ले’ या क्रियापदाचा ‘गवत’ या एकवचनातील नपुंसकलिंगी कर्माशी सुसंवाद झाला आहे. त्याचप्रमाणे ‘कासवाने शर्यत जिंकली’ या वाक्यातील ‘कासव’ या कर्त्याला प्रेरक प्रत्यय लागला आहे आणि ‘शर्यत’ या एकवचनातील स्त्रीलिंगी कर्माशी ‘जिंकणे’ या क्रियापदाचा सुसंवाद झाला आहे – ‘जिंकली’. ‘कासवाने सशाला हरवले’ या प्रमाण मराठीतील वाक्यात ‘हरवणे’ या क्रियापदाचा ‘ससा’ या विभक्तिविकारित कर्माशी सुसंवाद होत नाही; या पर्यायाअभावी क्रियापद नपुंसकलिंगी सुसंवाद दर्शविते – ‘हरविले’.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदमराठीच्या बोलींमध्ये या व्याकरणिक विशेषाच्या दोन पर्यायी रचना आढळल्या आहेत : (१) सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील क्रियापदाचा केवळ कर्माशी सुसंवाद; (२) सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील क्रियापदाचा प्रामुख्याने कर्माशी आणि पर्यायाने कर्त्याशी सुसंवाद. सापडलेल्या दोन्ही प्रकारच्या पर्यायांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्यायी रूप १ : सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील क्रियापदाचा केवळ कर्माशी सुसंवाद ही व्याकरणिक रचना सर्वेक्षणात समाविष्ट सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली. १.१.१ उदाहरण (जि. जालना, ता. मंठा, गाव उसवद, पु४५, मराठा, ६वी) ह्या मुलीनं त्या मुलाच्या तोंडात घास घातला hya mulinə tya mulača toṇḍat ɡʰas ɡʰatla hya muli-nə tya mula-č-a toṇḍ-a-t ɡʰas ɡʰat-l-a DEM.PROX.OBL girl.OBL-ERG DEM.DIST.OBL boy.OBL-GEN-OBL mouth-OBL-LOC morsel.3SGM put-PFV-3SGM This girl put a morsel of food in that boy’s mouth. १.१.२ उदाहरण (जि. हिंगोली, ता. कळमनुरी, गाव मोरवड, स्त्री२१, अंध (एस.टी), १२वी) त्या मानसाला पानी दिलं तिनं tya mansala pani dilə tinə tya mansa-la pani di-l-ə ti-nə DEM.DIST.OBL man.OBL-DAT water.3SGN give-PFV-3SGN she-ERG She gave water to that man. १.१.३ उदाहरण (जि. परभणी, ता. पालम, गाव बनवस, पु४२, हटकर-धनगर, ९वी) मंग तेनं आमाला तारीक दिली məṅɡ tenə amala tarik dili məṅɡ te-nə ama-la tarik di-l-i then he.OBL-ERG we.EXCL-DAT date.3SGF give-PFV-3SGF Then he gave us a date. १.२ पर्यायी रूप २ : सकर्मक पूर्ण क्रियाव्याप्ती वाक्यातील क्रियापदाचा प्रामुख्याने कर्माशी आणि पर्यायाने कर्त्याशी सुसंवादमराठीच्या बोलींमध्ये या व्याकरणिक विशेषाची ही पर्यायी रचना सर्वेक्षणातील ३४ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये आढळली. खालील सारणीत या पर्यायाच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील दिला असून पुढे त्याची उदाहरणे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
चंद्रपूर | राजुरा - कोष्टाळा, ब्रह्मपूरी - तोरगाव व पाचगाव |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा व शिवनी, कोरची - बोरी व मोहगाव |
गोंदिया | गोंदिया - टेमणी व तेढवा, सडक-अर्जुनी - चिखली |
भंडारा | भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी व बोरी |
नागपूर | रामटेक - भोजापूर |
नांदेड | मुखेड - हळणी |
लातूर | लातूर - पाखरसांगवी, निलंगा - दादगी, उदगीर - शिरोळ जानापूर |
बीड | अंबेजोगाई – दरडवाडी |
उस्मानाबाद | उमरगा - कसगी |
सोलापूर | अक्कलकोट - चिक्केहळी |
सांगली | मिरज - म्हैसाळ |
कोल्हापूर | करवीर - गडमुडशिंगी, चंदगड - चंदगड व तुडीये |
सिंधुदुर्ग | वैभववाडी - नादवडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे |
रत्नागिरी | रत्नागिरी - झाडगाव, खेड - सवणस व बहिरवली |
रायगड | रोहा - नागोठाणे |