नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. महाराष्ट्रात ‘नवर्याचे वडील’ आणि ‘बायकोचे वडील’ या दोन्ही संकल्पनांसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य आढळले आहे. सासरा, सासरे, ससरो(स), सासरोस, सासरेबुवा, ससुर, सोग, ससुरजी, सुसराजी, सुसरो, सुसर, सुसरा, सास्रं, मामा, मामाजी, मामाजीनू माव, माओ, फुवाजी, यही, दल्ला, हरो, हाहरा, हाओरा, हावरो, अक्कडसासरा, इत्यादी. धोंगडे (२०१३:७५) यांनी सदर संकल्पनेसाठी सासरा या नातेवाचक शब्दाचा उल्लेख केलेला आहे. सदर सर्वेक्षणात सासरा हा शब्द साधारणतः सर्व जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. सासरा या शब्दोच्चारात सासरा, सासरे, ससरो(स), सासरोस, सासरेबुवा, ससुर, सोग, ससुरजी, सुसराजी, सुसरो, सुसर, सुसरा, सास्रं, इ. ध्वनिवैविध्य आढळून आले आहे. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाचा कोणाशी विवाह होऊ शकतो याबाबतीत दक्षिण भारतातील राज्य आणि मध्य आणि उत्तर भारतातील राज्य यांमध्ये संकेतभेद आहे. दक्षिणेकडील बहुतांशी प्रदेशांमध्ये मामाच्या मुलीशी/मुलाशी आत्याच्या मुलाचा/मुलीचा विवाह करण्याची प्रथा आहे. अशाप्रसंगी नवर्याचे वडिल आणि बायकोचे वडिल या दोन्ही संकल्पनांसाठी वापरल्या जाणार्या शब्दांवरून भारतीय विवाह संस्थेत असणार्या विवाहविषयक संकेतांवर प्रकर्षाने प्रकाश पडतो. कर्वे (१९५३: १६५) यात नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सासरा या शब्दाची उत्पत्ती श्वशुर या संस्कृत शब्दापासून झाली असून मामा हा शब्द आईच्या भावासाठी असलेला शब्द काही भौगोलिक प्रदेशात शब्द नवर्याच्या वडिलांसाठी वापरला जातो. सदर संकल्पनेसाठी मामा हा शब्द वापरला जात असल्याचे सदर सर्वेक्षणातही आढळून आले आहे. त्याचबरोबर सदर सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीनुसार ‘मामा’ हा शब्द नवर्याच्या वडिलांकरताच नव्हे तर बायकोच्या वडिलांसाठीही वापरात असलेले आढळून आले. ‘मामा’ या शब्दाव्यातिरिक्त मामाजी, मामाजीनू असे ही पर्यायी शब्द सध्या झालेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहेत. मामा या शब्दाचा वापर सासरा या नातेवाचक संकल्पनेसाठी नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, तसेच बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दिसून येतो. तर मामाजी हा उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव या गावात (जि. सोलापूर) तसेच हिंदी भाषिक प्रदेशाला लागून असलेल्या गावांमध्ये प्रामुख्याने आढळून आला आहे. याशिवाय फुवाजी हा शब्द केवळ नंदुरबारच्या नंदुरबार तालुक्यातील धानोरा या गुजरात सीमेलगतच्या गावात आढळून आला आहे. तसेच ससरो हा शब्द यवतमाळ जिल्हयातील नेर तालुक्यातील दगड-धानोरा या गावात आणि औरंगाबादेतील पिंपळखुटा या गावी आढळून आला आहे. संदर्भ: कर्वे, इरावती १९५३, किनशिप ऑर्गनायज़ेशन इन इंडिया, डेक्कन कॉलेज मोनोग्राफ सिरिज: ११, पुणे धोंगडे, रमेश १९९५ (पुर्नमुद्रण२०१३) महाराष्ट्राचा भाषिक नकाशा (पूर्वतयारी), राज्य मराठी विकास संस्था,मुंबई.