मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

स्त्रीच्या बहिणीचा मुलगा

डाउनलोड स्त्रीच्या बहिणीचा मुलगा

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘स्त्रीच्या बहिणीचा मुलगा’ या संकल्पनेसाठी महिला मुलगा, ल्योक, बहिणल्योक, पोरगा, आंडोर, जिजा आंडोर, पुतण्या, बहिणबेटा, इ. शब्द सांगतात असे सदर सर्वेक्षणात आढळून आले आहे. या शिवाय भांजा, भतीजा हे शब्द स्त्री आणि पुरुष दोघेही सांगतात. तसेच इतर काही शब्द तुरळक प्रमाणात आढळतात ते विस्ताराने पुढे पाहू.

स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी मुलगा हा शब्द परभणी आणि हिंगोली वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो.

स्त्रीच्या बहिणीचा मुलासाठी ल्योक हा शब्द पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त प्रमाणात आढळतो. तर विदर्भ, खानदेश आणि कोकणात तुरळक आढळतो. मात्र कोकणातील पालघर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात हा शब्द आढळतो. या शब्दाचे लेक, ल्योक, ल्येक, लेकरा, लेकुस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात बहिणल्योक हा शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी वापरला जातो असे दिसते.

स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी पोरगा हा शब्द प्रामुख्याने विदर्भात आणि खानदेशात आढळून येतो. तसेच उर्वरित महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळतो. पोरगा, पोर, पोर्‍या, पोरग्या, पोसा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

भाच़ा हा शब्द पुरुषाच्या बहिणीच्या मुलासाठी संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे भाच्चा, भाच़ो, भासा, बाच़ा, भाच्या, भाचे, भास्सा, भाच़ोस, भासे, भाच़ास, भाशा, भासरा, भावसा, भासो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी आंडोर हा शब्द नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात आढळून येतो. या शब्दाचे आंड्योर, अंडोर, आंडोर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. जिजा आंडोर हा शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील केवळ महार आणि बौद्ध समाजात आढळतो.

स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी पुतण्या हा शब्द सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक आढळला. ह्या शब्दाचे पुतन्या, पुतना, पुतनो, पुतण्या इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

मावस लेक हा शब्द बहिणीच्या मुलासाठी कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, जालना इ. जिल्ह्यात दिसून आला आहे. याचे मावस मुलगा, मावस लेक, मावस ल्योक इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

बेटा हा शब्द स्त्रीच्या बहिणीचा मुलासाठी नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील चांभार समाजात आढळून आला आहे. औरंगाबादमध्ये राजपूत समाजात तर अमरावतीमध्ये गवळी समाजातही हा शब्द आढळला आहे.

नातू हा शब्द बहिणीच्या मुलासाठी पालघरमधील वारली आणि कुंभार समाजात आढळला आहे.

स्त्रीच्या बहिणीच्या मुलासाठी गोंदिया जिल्ह्यातील बिंजेवार, महार, गोवारी समाजातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील बिंजेवार, आणि महार समाजात बहिनबेटा हा शब्द आढळला आहे.

भतीजा हा शब्द बहिणीच्या मुलासाठी स्त्रिया आणि पुरुष दोघेही वापरताना आढळतात. नंदुरबारमधील एका गुज्जर महिलेने, या शब्दाचे भतिजा, भतरेजा, भतिरजो, भतरजा, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

बहिणीच्या मुलासाठी स्त्रिया आणि पुरुष दोघेही भांज़ा हा शब्द वापरतात. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील मुस्लिम समाजात हा शब्द आढळून येतो.

त्याचप्रमाणे वाडबास हा शब्द पालघर जिल्ह्यातील कोळी समाजात आढळला आहे. छोरो हा शब्द जळगावातील पायली समाजात आढळतो. पैतीसअप्पा हा शब्द रायगड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात तर भिहनास हा शब्द रायगडमधील कातकरी समाजात आढळून आला आहे. बेनपुत हा शब्द पालघर जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात आढळला आहे. बिहिस्ना सोहरा अशाप्रकारेही रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजात ओळख करून दिल्याचे दिसते. भयनीच़ो चेडो अशाप्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात सदर नात्याची ओळख करून दिल्याचे आढळते. तर पालघर जिल्ह्यातील कोकणा समाजात देराचा मुलगा अशी ओळख करून दिली आहे. याशिवाय बहिणीचा मुलगा, बहिणीचा ल्योक, बहिणीचा पोर्‍या, बहनोयी पोहा, बहिणीचा पोरगा, बहिणीचा लेक इ. अशा पद्धतीने बहिणीच्या मुलाची ओळख करून देण्याची पद्धत अहमदनगर, बीड, नांदेड, औरांगाबाद, परभणी, हिंगोली, जळगाव, बुलढाणा, जालना, पालघर इ. जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळली.