नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘स्त्रीच्या भावाचा मुलगा’ या संकल्पनेसाठी भाच़ा हा शब्द मोठ्या प्रमाणात आढळला आहे. त्याचप्रमाणे ज़ावई, धाड्या हे शब्द देखील वापरले जातात. या शब्दाचे भाच़ा, भाच्चा, भाच़ो, भांजा, भासा, भासो, भाशे, भाशा, भासास, भाच़ास, भाच़स इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. याशिवाय अमराठी भाषिक समाजात भतीजा हा शब्द स्त्रीच्या भावाच्या मुलासाठी वापरताना दिसतात. त्यामध्ये भतीजा, आंडोर, नातू, पोशा, भानेज, भतरजस, कोसरा, पैतीसुहप्पा, भुरगो इ. शब्द वापरले जातात. अपवादात्मक स्वरूपात उस्मानाबाद जिल्ह्यातील लिंगायत समाजातील व्यक्तींनी स्त्रीच्या भावासाठी मुलगा हा शब्द वापरला जात असल्याचे सांगितले आहे. भतीजा हा शब्द भावाचा मुलगा या संकल्पनेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, औरंगाबाद, आणि नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम समाजात तर नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या जिल्ह्यात चांभार समाजात जास्त आढळला आहे. तसेच औरंगाबादमधील राजपुत भामटा, जळगावमधील पावरा, यवतमाळमधील बंजारा, अमरावतीमध्ये गवळी, भलई, कोरकू, भावसार, नागपूरमधील किराड, गोंड, भंडारा जिल्ह्यातील गोंड, गोंदिया जिल्ह्यातील बिंजेवार, गडचिरोलीमधील कवर समाजातही तुरळक प्रमाणात हा शब्द आढळला आहे. भानेज / भाणेज हा शब्द स्त्रीच्या भावाचा मुलगा या संकल्पनेसाठी पालघर जिल्ह्यातील कुंभार, वारली, उबळा या समाजात आढळला आहे. ज़ावई हा शब्द स्त्रीच्या भावाच्या मुलासाठी काही प्रदेशांत वापरल्याचे दिसून येते. केवळ पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील वारली, कोकणा, महादेव कोळी या समाजात आढळला आहे. ज़ावई, ज़वाई हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. काही समाजात भावाच्या मुलाला मुलगी देण्याची पद्धत आहे. त्याचे हे द्योतक असावे. धाड्या हा शब्द पुणे जिल्ह्यात भावाच्या मुलासाठी आढळला आहे. जळगावमध्ये भावाच्या मुलासाठी आंडोर हा शब्द आढळला आहे. नाशिकमधील महादेव कोळी समाजात पोशा हा शब्द आढळला असून या शब्दाचे पोशा, पोसे, पेसा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. होतरजो हा शब्द जळगाव जिल्ह्यातील पायली समाजात दिसून येतो. कोसरा, कुमन, नातू, कुरार हे शब्द अमरावती जिल्ह्यातील कोरकू समाजातील महिलांमध्ये आढळून आले आहेत. सिंधुदुर्गमधील ख्रिश्चन समाजात भुरगो हा शब्द आढळला आहे. तर पैतीसुहप्पा हा शब्द रायगड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात आढळला आहे. काही वेळा भावाच्या मुलासाठी काही शब्द सांगता न आल्यास लोक भावाचा मुलगा असेच सांगताना आढळतात. भावाचो चेडो अशा पद्धतीने सिंधुदुर्गमधील ख्रिश्चन समाजात, भाऊसना सोहरा हा रायगडच्या कातकरी समाजात, भावायो पोहा हा पालघरमधील धोडी समाजात, आणि भाईन छोकरो हा नंदुरबार जिल्ह्यातील गुज्जर समाजात ओळख करून दिली आहे.