नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. 'स्त्रीच्या भावाची मुलगी' या संकल्पनेसाठी भाचीहा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतो. या शब्दाचे भाच़ी, भाशी, बाशी, भासी, भाचीस, भाच़ीस, भाचे, भाच्ची इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भतीजी हा शब्द भावाच्या मुलीसाठी स्त्री-पुरुष दोघेही वापरतात असे आढळते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, नांदेड या जिल्ह्यात प्रामुख्याने मुस्लिम समाजात, औरंगाबादमध्ये मुस्लिम, राजपुत, चांभार समाजात, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात चांभार समाजात, जळगाव पावरा, अमरावतीमध्ये कोरकू, गवळी, बलई, भावसार या समाजात, यवतमाळमध्ये बंजारा, नागपूरमध्ये किराड, गोंड या समाजात, गोंदियामध्ये बिंजेवार, गडचिरोलीमध्ये कवर समाजात दिसून येतो. या शब्दाचे भतिजीन हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भांजी हा शब्द सिंधुदुर्गात मुस्लिम, पालघरमध्ये कुंभार, कोकणा, जळगावात तेली, वाशिममध्ये बंजारा, अमरावतीमध्ये गवळी, बलई इ. समाजात आढळला आहे. यामध्ये भानी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. सदर नाते दर्शविण्यासाठी सून या शब्दाचा वापर पालघरमधील कोकणा समाजात, नाशिकमधील कोळी समाजात, नागपूरमधील मरार समाजात आणि जालना जिल्ह्यातील मातंग समाजात प्रामुख्याने महिलांमध्ये आढळला आहे. रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजात सदर नात्याची ओळख करून देताना भाउसनी सोहरीअसा शब्दप्रयोग केल्याचे आढळून आले आहे.