नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘स्त्रीच्या बहिणीची मुलगी’ या संकल्पनेसाठी लेक, मुलगी, पोरगी, अंडेर, पुतणी, बहिणलेक, बहिणबेटी, बहिनीस्नी सोहरी, मावस लेक या शब्दांचा वापर करतात असे सदर सर्वेक्षणात आढळून आले आहे. याशिवाय भतीजी, नात, डिकरी हे शब्द स्त्रियांनी बहिणीच्या मुलीसाठी सांगितलेले दिसले आहे. बहिणलेक हा शब्द बहिणीच्या मुलासाठी आणि मुलीसाठीही आढळला आहे. हे शब्द पुढे विस्ताराने पाहू. मुलगी हा शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलीसाठी परभणी आणि हिंगोली हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जातो. लेक हा शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलीसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने आढळतो. तर विदर्भातील नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. तर खानदेशात जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात तुरळक आणि कोकणात रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक आढळतो. मात्र पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. या शब्दाचे लेक, ल्येक, लेकुस, लेकरी, लेकीस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बहिणलेक हा शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलीसाठी वापरला जातो. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात हा शब्द आढळतो. पोरगी हा शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलीसाठी प्रामुख्याने विदर्भ व खानदेशात जास्त प्रमाणात वापरला जातो. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक आढळतो. पोरी, पोर, पोयरी, पोशी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भाची हा शब्द बहिणीच्या मुलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात काही प्रमाणात स्त्रिया वापरतात असे आढळले आहे. या शब्दाचे भाशी, भासी, बाशी, बासी, भाच्ची, भाच़ी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. अंडेर हा शब्द बहिणीच्या मुलीसाठी महिला वापरतात असे दिसून आले आहे. केवळ खानदेशात हा शब्द वापरला जातो. याच नात्याकरता जीजा अंडेर असे म्हणण्याची पद्धतही दिसून येते. मावस मुलगी/मावस लेक हे शब्द स्त्रीच्या बहिणीच्या मुलीसाठी अहमदनगर, ऐरंगाबाद, जालना, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळले आहेत. बहिणबेटी हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील गोवारी, बिंजेवार, महार या समाजात आढळला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गोंड समाजातही आढळला आहे. भतीजी हा शब्द बहिणीच्या मुलीसाठी नंदुरबारमधील गुजर समाजात व अमरावतीमधील कोरकू, बलई या समाजात आढळून आला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांभार समाजात बहिणीच्या मुलीसाठी डिकरी हा शब्द आढळला आहे. पालघरमध्ये वारली समाजात आणि कुंभार समाजात बहिणीच्या मुलीसाठी नात हा शब्द सांगितला आहे. या शब्दाचे नात, नातनी, नाती असे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. त्याचप्रमाणे पुढील काही पद्धतींनीही बहिणीच्या मुलीची ओळख करून देण्यात येते. रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजात बहिणीच्या मुलीसाठी बहिनीस्नी सोहरी असा शब्दप्रयोग केला आहे. पालघरमधील कोकणा समाजात देराची लेक असा शब्दप्रयोग केला आहे. बहिनीची चेडी हा शब्दप्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात आढळला आहे. वाडबास हा शब्दप्रयोग पालघर जिल्हियातील मल्हार कोळी समाजात दिसला आहे. इरमासु निगरी हा शब्दप्रयोग रायगड जिल्ह्यातील खिश्चन समाजात आढळला आहे. तसेच बहिणीची मुलगी, बहिनीची पोरगी, बहिनोयी पोही, बहिनीची लेक हे शब्दप्रयोग प्रामुख्याने स्त्रीच्या बहिणीच्या मुलीसाठी पालघर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, सोलापूर, इ. जिल्ह्यात तुरळक आढळले आहेत.