नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘छत किंवा छप्पर’ म्हणजे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळण्यासाठी घराच्या वरील भागावर असलेले आवरण होय. महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेचा विचार करता विविध जिल्ह्यांत दोन प्रकारची छतांची रचना आढळून येते – एक म्हणजे उतरत्या रचनेचे छप्पर आणि दुसरे म्हणजे सपाट पृष्ठभाग असलेले छप्पर. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी असते तिथे दुसर्या प्रकारच्या छताची रचना पाहावयास मिळते. या संकल्पनेसाठी महाराष्ट्रातील मराठीच्या विविध बोलीत खालीलप्रमाणे वैविध्य आढळून आले. स्लॅब, स्लॅप, स्लप, सलाप, स्ल्याप, स्ल्याब, स्लाप, सलप, सलीप, स्लॉप, सलेब, स्लेप, सिलेप, सिलॅप, शिलाप, शिलॅप, शिल्याप, छत, शेत, सत, गच्ची, गची, छप्पर, शप्पर, छपर, सप्पर, छप्र, छप्परूस, धाबं, ढाबा, धाबा, टेरेज, टेरेस, टेरीस, तारस, कोबा, आरशीशी, पत्रं, पत्रा, पत्रे, बद्री, सजो, सज्जा, वंडी, सप्रे, सप्रा, सिलिंग, मालवद, माळवद, सपई, सपार, प्लास्टर, पडवी, लॅनटेन, झाप, पाका, इत्यादी. सदर सर्वेक्षणात या शब्दांचे भौगोलिक वर्गीकरण पुढीलप्रमाणे दिसून येते. स्लॅब हा शब्द इंग्रजीतून मराठीत जसाचा तसा आलेला शब्द असून शब्दोच्चारातील थोड्याफार फरकाने हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. शिलाप हा शब्द प्रामुख्याने आदिवासी समाजातील वारली, तुरळक प्रमाणात कुकणा, गोंड या समाजांबरोबरच कुंभार, कुणबी, बौद्ध, नाईक, धनगर या समाजात महाराष्ट्राच्या ठराविक जिल्हयात आढळून आला आहे. सिलाप हा शब्द सर्व समाजातील शिक्षित-अशिक्षित भाषकांकडून सर्वच जिल्ह्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात वापरात असलेला दिसून आला आहे. छत हा शब्द औरंगाबाद वगळता मराठवाड्यात जास्त प्रचलित आहे. तसेच विदर्भातील नागपूर जिल्हयात आणि नाशिक जिल्ह्यातही तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. तर गच्ची या शब्दाचा प्रसार अन्य शब्दांबरोबर नागपूर, जळगाव, बीड, पालघर आणि रत्नागिरीच्या सोमेश्वर येथे आढळून आला आहे. सप्पर हा शब्द नाशिक जिल्हयात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे फक्त महिलावर्गाकडून वापरात असलेला आढळून आला आहे. धाबं हा शब्द उत्तर महाराष्ट्रात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथे मिळाला आहे. टेरेस हा शब्द किनारपट्टीलगतच्या ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तर कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत आणि काही प्रमाणात नागपूर जिल्ह्यात आढळून आला आहे. कोबा हा शब्द मुखत्वे करून वारली आणि कातकरी या आदिवासी समाजांमध्ये आढळून आला असून छपरूस हा शब्द तुरळक प्रमाणात मांगेला समाजात मिळला आहे. झाप, आरशिशि, लॅनटेन, पत्रा, वंडी, सपई, सिलिंग, प्लास्टर, टिबा, माळद हे शब्द विशिष्ट गावात अतिशय कमी प्रमाणात आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे प्लास्टर ह्या शब्दाचा वापर फक्त पालघर जिल्ह्यातील गिरगाव येथे वारली समाजात तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. तसेच बद्री हा शब्द केवळ नागपूर जिल्हयातील काही गावात जास्त प्रमाणात प्रचलित असून त्याच प्रदेशात टिबा हा शब्द सुद्धा तुरळक प्रमाणात मिळाला आहे. मालवद हा लातूर जिल्ह्यात तर माळवद हा शब्द सोलापूर जिल्ह्यातील सांगोले येथे सापडला आहे.