मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

नवर्‍याचा मामा

डाउनलोड नवर्‍याचा मामा

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘नवऱ्याचा मामा’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत मामसासरे, मामा, काका, सासरे, वडील, बाबा, बाप, च़ुलता, मोठा बा, भाको, मावळा, मावळे सासरे, आज़्ज़ा, फुयसाका, भासवायरी इ. शब्दवैविध्य दिसून येते.

भारतीय विवाह व्यवस्थेमध्ये असणाऱ्या विवाहविषयक संकेतांवर या नातेवाचक शब्दांवरून प्रकर्षाने प्रकाश पडतो. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाचा कोणाशी विवाह होऊ शकतो याबाबतीत दक्षिण भारत आणि मध्य आणि उत्तर भारत यांमध्ये संकेतभेद आहेत. दक्षिणेकडील बहुतांशी प्रदेशांमध्ये मामाच्या मुलीशी/मुलाशी आत्याच्या मुलाचा/मुलीचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सख्ख्या मामाला (आईच्या भावाला) मुलगी देण्याची प्रथाही काही ठिकाणी आहे. अशाप्रसंगी मामा म्हणून ज्यांची ओळख करून दिली जाईल ते कोणीही उपयोजित वर म्हणून चालू शकतात. ज्या ठिकाणी मामाशी लग्न होऊ शकते तेथे किंवा जेथे आत्याच्या मुलाशी लग्न झाले आहे अशा ठिकाणी ‘नवऱ्याचा मामा’ ही व्यक्ती त्या मुलीसाठी वडिलांसमान असल्याने या नात्यासाठी शक्यतो काका, बाप, चुलता, वडील हे शब्द वापरलेले दिसतात. ज्या कुटुंबात अशाप्रकारच्या नात्याला मान्यता नाही त्यांच्याकडे या नात्यासाठी मामा, सासरे, मामासासरे, मावळेसासरे अशाप्रकारचे शब्द वापरलेले दिसतात.

सदर नात्याकरिता सर्वेक्षणात आढळून आलेल्या वैविध्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता इतर जिल्ह्यांत मामेसासरे हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जातो. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत सदर शब्दाचा वापर अधिक दिसून येतो. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये या शब्दाचा वापर कमी आढळून येतो. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात सदर शब्दाचा वापर अतिशय तुरळक प्रमाणात दिसून येतो. या शब्दाचे मामसासरा, मामसासरे, मामसासरं, मामा सासरे, मामेसासरा, मामेसासरे, मामेससुर, मामा सासरा, मामं सासरा, मामा हारो, मामा ससुर, मामास सासरा, मामेससरोस, मामुसासरे, मामे ससरो, मामंसुसरो, मामने ससरो, मामाजी सासरे, मामासास इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. मामुसासरे हा शब्द रायगड जिल्ह्यातील कोकणी मुस्लिम समाजात वापरला जातो.

मामा हा शब्द कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, रायगड, पालघर या जिल्ह्यांत सर्वाधिक प्रमाणात आढळला आहे. त्याचबरोबर अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हा शब्द तुरळक प्रमाणात दिसून आला आहे. उत्तरेकडील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भौगोलिक क्षेत्रात मामा या शब्दाचा वापर अतितुरळक प्रमाणात असल्याचे दिसून येते. या शब्दाचे मामा, मामांजी, घोवाचे मामा, मामू, नवऱ्याचे मामा, मामाजी, मामजी, मामाज़ी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. मामू या शब्दाचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील मुस्लिम समाजात दिसून आला आहे. मामांजी हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजात आढळून आला आहे. मामाजी, मामजी, मामाज़ी हे शब्द मुख्यत्वे विदर्भात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. नागपूर, अमरावती, वर्धा भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात ‘मामा’ शब्दासोबत आदरवाचक ‘जी’ शब्दाचा वापर हाक मारताना तसेच नातेवाचक शब्द म्हणूनही होताना दिसतो. तसेच जळगाव, ठाणे, बीड, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतही मामाजी या शब्दाच्या वापराचे तुरळक प्रमाण आढळते.

काका हा शब्द कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात आढळला आहे. सदर भौगोलिक क्षेत्रात मामा शब्दासोबतच काका या शब्दाचा वापरही मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतही हा शब्द कमी-अधिक प्रमाणात आढळून आला आहे. पुणे जिल्ह्यातील महादेव कोळी आणि कातकरी समाजात, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील महादेव कोळी, कातकरी, ठाकूर म इ. आदिवासी समाजात तसेच या शब्दाचा वापर आढळून आला आहे. या शब्दाचे काका, काकास, काकाजी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले आहे. काकाजी हा शब्द विदर्भात वापरला जातो. काकास हा शब्द पालघरच्या जव्हार तालुक्यातील वारली व कोकणा समाजात आणि पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कातकरी समाजात वापरला जातो असे आढळले आहे.

सासरे हा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर्, पालघर, ठाणे आणि नांदेड या जिल्ह्यात जास्त प्रमाणात वापरला जात असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यात सदर शब्द तुरळक प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे सासरे, सासरा, सासरं, सासरेबुवा, सुसर, सासरेबॉ इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले आहे.

वडील हा महाराष्ट्राच्या सर्वच भागात तुरळक प्रमाणात वापरला जातो.

सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद धुळे या जिल्ह्यांमध्ये बाप हा शब्द आढळून आला आहे. तर नागपूर, वर्धा, भंडारा, जळगाव, ठाणे, बुलढाणा, रायगड, परभणी, पालघर, बीड, सातारा या जिल्ह्यात बाबा हा शब्द वापरला जातो असे दिसून आले आहे.

च़ुलता/चुलता हे शब्द कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आणि लातूर, उस्मानाबाद, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळून आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातही काही प्रमाणात सापडला आहे. त्याचबरोबर नंदुरबार, गडचिरोली, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांतही हा शब्द अन्य शब्दांबरोबरच वापरला जात असल्याचे दिसून येते.

या सर्व शब्दांबरोबरच इतर काही शब्द तुरळक प्रमाणात मिळाले आहेत. उदाहरणार्थ, मोठा बा हा शब्द नाशिकच्या गोलदरी या गावात वारली समाजात आढळला आहे. तर मोटा बाबा हा शब्द भंडारा जिल्ह्यातील बौद्ध समाजात मिळाला (धारगाव, ता. भंडारा). मावळा हा शब्द उस्मानाबादच्या कसगी या गावात वापरल्याचे दिसते. रत्नागिरीच्या कुंभवडे गावात मावळे सासरे या शब्दाचा वापर आढळला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावात आत्ये सासरे हा शब्द वापरल्याचे दिसून येते. फुयसाका हा शब्द रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजात वापरला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात भिल्ल समाजामध्ये भाको या शब्दाचा वापर झाल्याचे दिसून येते. तर नाशिकमध्ये बाबा या शब्दाबरोबरच आज़्ज़ा हा शब्द आढळला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात बाबा या शब्दाबरोबर भासवायरी हा शब्द आढळून आला आहे.