नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘नवर्याच्या धाकट्या भावाची बायको’ या संकल्पनेसाठी ज़ाऊ, देरानी, बहिन, भाभी, सुन, वहिनी, खोनी, भावलीन इ. शब्द दिसून येतात. ‘नवर्याच्या धाकट्या भावाची बायको’ या संकल्पनेसाठी ज़ाऊ, देरानी, बहिन, भाभी, सुन, वहिनी, खोनी, भावलीन इ. शब्द दिसून येतात. ज़ाऊ हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे जाऊ, ज़ाऊबाई, दाव, ज़ावबाई, ज़ाऊबाय, वाव, ज़ऊबाई, ज़ावस, ज़ावा, ज़ाऊस, ज़ावास, इ. ध्वनिवैविध्य आढळते. तसेच धाकटेपण दर्शविण्यासाठी लानी ज़ाव, लहान ज़ाऊ, ल्हान ज़ाऊबाई इ. शब्द्प्रयोगही आढळले आहेत. देरानी हा शब्द उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसेच पालघर, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यातही आढळून येतो. त्याचप्रमाणे विदर्भातील वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, ठाणे, बीड, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील प्रामुख्याने मुस्लिम समाजात आणि अन्य समाजात तुरळक प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे दिरानी, देराणी, देवरानी, डेराणी, दिरानीस, डेरानिस, दिवरानीन, देरानीस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बहीन हा शब्द पालघर, रायगड, नाशिक, धुळे, अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात आढळला आहे. या जिल्ह्यांमधील प्रामुख्याने कातकरी, महादेव कोळी, वारली, कोरकू, गोंड, ठाकूर, पारधी इ. समाजातील भाषकांमध्ये सदर शब्द आढळून आला आहे. तसेच नांदेड, हिंगोली, सोलापूर, वर्धा या जिल्ह्यातही तुरळक प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे भयनी, भनिस, भिनास, बईन, भयीन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले आहे. भाभी हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजात आढळून आला आहे. या शब्दाचे भाबी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. वहिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. या शब्दाचे व्हईनी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मांगेला समाजात भावलीन हा शब्द मिळाला आहे.