नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. 'नवर्याच्या मोठ्या भावाची बायको' या नातेवाचक संकल्पनेसाठी ज़ाऊ, जेठानी, भावलानी, बाई, बहीन, वहिनी, भावज़य, भाबी, मोटे सासू, शिर्याळ, डायली, इ. शब्द दिसून येतात. याशिवाय आणखी काही शब्द आढळतात ते विस्ताराने पुढे पाहू. ज़ाऊ हा शब्द संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे ज़ाव, ज़ाऊबाई, ज़ावबाय, ज़ाऊबाय, ज़ावस, ज़ाऊस, ज़ास, ज़ावबाई, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. वयोज्येष्ठतेनुसार वडील ज़ाऊबाई, वडील ज़ाव, थोरली जाऊ, मोटी ज़ाऊ, मोठी ज़ाऊबाइ, इ. शब्दप्रयोगही आढळून आले आहेत. जेठानी हा शब्द उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आढळून येतो. तसेच पालघर, औरंगाबाद, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या जिल्ह्यातही आढळून येतो. याशिवाय नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बीड, नांदेड, रत्नागिरी ह्या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ मुस्लिम समाजात आणि गडचिरोली जिल्ह्यातील कवर समाजात हा शब्द आढळून येतो. सदर शब्दाकरता जेटानी, जेठानीबाई, जेठाणीस, जेठानीस, जितानी, जेथानी, जावजेठानी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. यापैकी जेठाणीस, जेठानीस हे ध्वन्यात्मक वैविध्य नाशिक जिल्ह्यातील कोकणा आणि महादेव कोळी समाजात आढळले आहे. बाई हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणबी समाजात, रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजात, पालघर जिल्ह्यातील क-ठाकूर, म-ठाकूर, कोकणा या समाजात आढळला आहे. या शब्दाचे बाईनु, बाईस हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भावलानी हा शब्द ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वारली, ठाकूर-क, ठाकूर-म, मल्हार कोळी आणि वाडवळ या समाजात आढळला आहे. या शब्दाचे भावलनी, भावलणी, भावलानीस, भावलोनी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बहीन हा शब्द रायगड, पालघर, नाशिक, धुळे, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, ह्या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळला आहे. हा शब्द सांगणार्या भाषकांमध्ये प्रामुख्याने कोरकू, कातकरी, वारली, महादेव कोळी, पारधी, म ठाकूर, गोंड, इ. समाजातील भाषकांचा समावेश होतो. तसेच सातारा, सोलापूर, हिंगोली, वाशिम, वर्धा, नांदेड या जिल्ह्यातही हा शब्द तुरळक प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे मोठी बहिन, भिनास, भयनी, भहिन, बयनी, भईन, बहिनी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. वहिनी हा शब्द सिंधुदुर्ग आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. या शब्दाचे व्हईनी, वयनी, व्हनीस, वहिनी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. भाबी हा शब्द रत्नागिरीतील मुस्लिम समाजात आढळून आला आहे. याशिवाय देवरानी हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजात आणि रायगड, उस्मानाबाद जिल्ह्यातील कुणबी समाजात आढळला आहे. शिर्याळ हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील गोंड समाजात तर मोटे सासू हा शब्द अमरावती जिल्ह्यातील गोंड समाजात आढळला आहे. आक्का हा शब्द कोल्हापुरातील कुंभार समाजात तर ताई हा शब्द गडचिरोली जिल्ह्यातील ढिवर समाजात दिसून आला आहे. कुयाद हा शब्द रायगड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात तर होनी हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात दिसून आला आहे. डायली हा शब्द नंदुरबारमधील भिल्ल समाजात तर वाव हा शब्द धुळे जिल्ह्यातील जिरे माळी समाजात आढळून आला आहे.