नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. 'नवर्याचा मोठा भाऊ' या संकल्पनेसाठी महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत दीर, जेठ, देर, भासरा, देवर, भाया, भावसासरा, भावला, भावजी, दाजी इ. शब्द दिसून येतात. सदर शब्दांचा प्रसार पुढीलप्रमाणे दिसून येतो. दीर हा शब्द कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांतही प्रमाणात आढळून येतो. विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, भंडारा, वर्धा ह्या जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. वयातील ज्येष्ठता दर्शविण्यासाठी थोरला दीर, मोठा दीर, थोरले दीर, मोटो दीर, दिड, मोठे दीर, इ. शब्दप्रयोगांचाही उपयोग केलेला दिसतो. ठाणे जिल्ह्यातील कातकरी आणि ठाकूर-म या समाजांत दिरास हे वैविध्य आढळले आहे. तर दिरुस हे वैविध्य रायगड जिल्ह्यातील कातकरी, कोळी, आणि महादेव कोळी या समाजांत, रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजात, ठाणे जिल्ह्यातील वारली समाजात तर पालघर जिल्ह्यातील कोळी समाजात आढळले आहे. जेठ हा शब्द प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आढळला आहे. तसेच पालघर, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातही जास्त प्रमाणात आढळला आहे. वाशिम, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात हा शब्द तुरळक प्रमाणात आढळला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, बीड, जालना, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात हा शब्द अतितुरळक प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे जेट, जेठारस, जेठवास, जेठरास, झेठू, ज़ेथ, जेठु, जेठो, जेठजी, जेठुस, जेटसा, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. देर हा शब्द नाशिक, बुलढाणा, नांदेड, सोलापूर ह्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात असून पुणे, ठाणे, पालघर, सांगली, भंडारा, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, वाशिम इत्यादी जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कातकरी, ठाकूर-क, वारली या समाजांत सदर शब्द आढळला आहे. वयातील ज्येष्ठता दर्शविण्यासाठी व्हडलो देर, मोठा देर, मोटा देर, इ. शब्दप्रयोगांचाही उपयोग केलेला दिसतो. देरुस हे वैविध्य रायगड, पालघर, आणि पुणे, जिल्ह्यातील कातकरी, ठाकूर-क आणि वारली समाजात, जालना जिल्ह्यातील भिल्ल समाजात आढळते. याचे डेरुस, देरोस हे शब्दवैविध्य दिसून येते. भासरा हा शब्द अकोला वगळता संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. नांदेड जिल्ह्यातील प्रधान समाजातही हा शब्द आढळून आला आहे. या शब्दाचे भाच़रे, भाच़रा, भासरे, बासरा, मोटे भासरे इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. सिंधुदुर्ग मधील मुस्लिम समाजात, रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम आणि कुणबी समाजात, अहमदनगर जिल्ह्यातील मराठा समाजात, औरंगाबाद जिल्ह्यातील रजपूत समाजात, धुळे जिल्ह्यातील पावरा समाजात, नंदुरबार जिल्ह्यातील वळवी समाजात, नागपूर जिल्ह्यातील गोंड, आणि लोधी समाजात, तर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड समाजात देवर हा शब्द आढळून आला आहे. या शब्दाचे देवरूस, देवरजी, देवेर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले आहे. भाया हा शब्द मराठवाड्यातील अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळला आहे. तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही आढळला आहे. शिवाय सोलापूर, पुणे, पालघर, नाशिक, अकोला या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे भावा, भाव्या, भावे, भायास, बाह्यो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. वयातील ज्येष्ठता दर्शविण्याकरिता मुठा भाया, वडिल भाये, वडील भाया, थोरला भाया, थोरल्या भाव्या, म्होटा भाया हे शब्दप्रयोगही दिसून आले आहेत. भावसासरा हा शब्द जळगाव जिल्ह्यातील पावरा समाजात, अमरावती जिल्ह्यातील धनगर, कोरकू, आणि गोंड समाजात, यवतमाळ जिल्ह्यातील मराठा समाजात, वर्धा जिल्ह्यातील गोवारी आणि गोंड समाजात आढळून आला आहे. वयातील ज्येष्ठता दर्शविण्याकरिता मोटे सासरे, सासरा, ससरा, भाऊ सासरा, भावसासरा हे शब्दप्रयोगही दिसून आले आहेत. भावला हा शब्द पालघर आणि ठाण्यात या जिल्ह्यात आढळला आहे. या शब्दाचे भावलो, भावलास इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. वयातील ज्येष्ठता दर्शविण्याकरिता म्होटा भावला, मोठा भावला हे शब्दप्रयोगही दिसून आले आहेत. भावजी हा शब्द महाराष्ट्रात अकोला, बुलढाणा, हिंगोली, जालना, बीड, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे वगळता सर्वत्र आढळला आहे. तुलनेने सोलापूर आणि पालघर जिल्ह्यात हा शब्द जास्त प्रमाणात आढळला आहे. या शब्दाचे भाऊजी, भावोजी, भावजे, भावज़ी, भाऊजी, भोवोजी, भाओजी, भाव्हजा, भावज़ा, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. दाजी हा शब्द कोल्हापूर, पालघर, आणि नंदुरबार जिल्ह्यात आढळून आला आहे. दाजीबा हा शब्द सोलापूर जिल्ह्यात सापडला आहे. भाऊ हा शब्द रायगड जिल्ह्यातील भंडारी समाजात, ठाणे जिल्ह्यातील वारली आणि आगरी समाजात, नाशिक जिल्ह्यामधील महार आणि कोकणा समाजात, नंदुरबारमधील महार समाजात, आणि गडचिरोलीमधील गोंड समाजात आढळून आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दादा हा शब्द आढळला असून त्याचे दादानू हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. मामा हा शब्द कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात सापडला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये नवरा, नवर्याचा भाऊ, सासरे या नात्यांकरता मामा हा शब्द वापरला जातो. इरमाऊ हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात तर कुयाद हा शब्द रायगड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात सापडला आहे. बाबानू हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तर डाजाजी हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यात सापडला आहे. भाईजान हा शब्द रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात आढळून आला आहे. मेवना हा शब्द ठाणे जिल्ह्यातील ठाकूर समाजात आणि भाटवा हा शब्द वर्धा जिल्ह्यात सापडला आहे. वरील दोन शब्दांच्या बाबतीत स्त्रिया आपल्या मोठ्या बहिणीच्या नवर्याची ज्या शब्दाने ओळख करून देतात तोच शब्द नवर्याच्या मोठ्या भावाची ओळख करून देताना वापरलेला दिसतो. डायलो हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल समाजात दिसून येतो तर बुवाजी हा शब्द नागपूर जिल्ह्यातील गोंड समाजात आढळला आहे.