नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘नवर्याचा धाकटा भाऊ’ या संकल्पनेसाठी प्रामुख्याने दीर, देर, देवर, देरुस, भावजी, भाऊ, भाऊसाब इ. शब्द दिसून येतात. दीर हा शब्द पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात जास्त प्रमाणात आढळून येतो. तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळला आहे. देर हा शब्द विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आढळून येतो. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक आढळून येतो. या शब्दाचे डेर, देरा, देरोबा, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. देवर हा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड या जिल्ह्यातील मुस्लिम समाजात, रायगड जिल्ह्यातील कुणबी समाजात, पालघर जिल्ह्यातील कुंभार समाजात, अहमदनगर जिल्ह्यातील ठाकूर आणि मराठा समाजात, बीड जिल्ह्यातील मुस्लिम, आणि वंजारी समाजात, औरंगाबाद जिल्ह्यातील मुस्लिम आणि रजपूत समाजात, नाशिक जिल्ह्यातील चांभार समाजात, धुळे जिल्ह्यातील पावरा समाजात, नंदुरबार जिल्ह्यातील वळवी, चांभार, आणि लेवा पाटील समाजात, जळगाव जिल्ह्यातील पावरा आणि महार समाजात हा शब्द आढळून आला आहे. तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजात, अमरावती जिल्ह्यातील गवळी, बलई, आणि कोरकू समाजात, नागपूर जिल्ह्यातील किराड, लोधी, कोष्टी, गोंड, कलार, आणि मरार समाजात, भंडारा जिल्ह्यातील कलार समाजात, गोंदिया जिल्ह्यातील गोंड, पोवार, बिंजेवार, महार, आणि गोवारी समाजात, गडचिरोली जिल्ह्यातील कवर, गोंड, आणि महार समाजात, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील धनोजे कुणबी समाजात देवर हा शब्द आढळून आला आहे. या शब्दाचे देवेर, देवरु, देवरजी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. देरुस हा शब्द प्रामुख्याने रायगड, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या जिल्ह्यातील आदिवासी समाजात आढळून येतो. या शब्दाचे दिरुस, देरू, दिरास, देरोस, देरस, डेरस, डेरुस, ढेरस, देरूस, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. रायगड जिल्ह्यातील कातकरी, आणि महादेव कोळी समाजात, पालघर जिल्ह्यातील वारली, ठाकूर, कोकणा, महादेव कोळी, आणि कातकरी समाजात, नाशिक जिल्ह्यातील कोकणा, महादेव कोळी, आणि वारली समाजात, आणि ठाणे जिल्ह्यातील वारली, ठाकूर, आणि कातकरी समाजात सदर शब्द आढळून येतो. तसेच जळगाव जिल्ह्यातील भिल्ल, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात कातकरी समाजात आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुस्लिम समाजातही सदर शब्द आढळून येतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भावजी हा नातेवाचकशब्द जास्त प्रमाणात आढळून येतो. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे भाऊजी, भाओजी, भावजी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भाऊ हा शब्द रायगड जिल्ह्यातील सोनकोळी, सुतार आणि आगरी समाजात, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील कोकणा आणि महार समाजात आढळला आहे. भाऊसाब हा शब्द सोलापूर आणि लातुर जिल्ह्यातील अनुक्रमे महार आणि माळी समाजात सापडला आहे. भाईजान हा शब्द सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील मुस्लिम समाजात दिसून येतो. सोलापूरातील लिंगायत समाजात मामा हा शब्द सापडला आहे. मामासोबत लग्न करण्याच्या पद्धतीमुळे हा शब्द आढळून येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात इरमाऊ हा शब्द सांगितला आहे.