नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘पुरुषाच्या भावाचा मुलगा’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात मिळालेले शब्दवैविध्य पुढीलप्रमाणे आहे. सर्वसाधारणपणे पुतन्या हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या शब्दाचे पुतण्या, पुतनो, पुतन्यो, पुतण्यो, पुतणो, पुतणा, पुतना इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. त्याचप्रमाणे स्वत:च्या मुलाची ओळख करून देताना वापरण्यात येणार्या शब्दांचा उपयोगही या नात्यासाठी केला जातो. लेक, मुलगा, पोरगा, बेटा, डिकरा, सोहरा, पोयरा हे शब्दही सदर नात्यासाठी वापरले जातात. पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी मुलगा हा शब्द महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळला. डिकरा हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात दिसून येतो. ल्योक हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी दिसून येतो. या शब्दाचे लेक, लेकुस, लेकरू इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. ल्योक हा शब्द पालघर, रायगड, पुणे, नाशिक, वर्धा या जिल्ह्यातील आदिवासी समाजात आणि कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील लिंगायत, महार, मातंग आणि बौद्ध समाजात आढळून आला आहे. पोरगा हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी दिसून येतो. पालघर, नाशिक, नंदुरबार, रायगड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यात आदिवासी समाजात आणि यवतमाळ, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यात बैद्ध, लिंगायत तर जळगावमध्ये राजपुत, नांदेडमध्ये बंजारा या समाजात आढळून आला आहे. भतीजा हा शब्द भावाचा मुलगा या संकल्पनेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, औरंगाबाद, आणि नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम समाजात तर नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या जिल्ह्यात चांभार समाजात जास्त दिसून येतो. तसेच औरंगाबादमधील राजपूत भामटा, जळगावमधील पावरा, यवतमाळमधील बंजारा, अमरावतीमध्ये गवळी, भलई, कोरकू, भावसार, नागपूरमधील किराड, गोंड, भंडारा जिल्ह्यातील गोंड, गोंदिया जिल्ह्यातील बिंजेवार, गडचिरोलीमधील कवर समाजातही तुरळक प्रमाणात हा शब्द दिसून येतो. पोयरा भावाच्या मुलासाठी पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील पुरुषांनी हा शब्द सांगितला आहे. या शब्दाचे पोयरं, पोयरा, पोयरो, पोरीयो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. सोहरा हा शब्द रायगडमधील कातकरी समाजात पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी दिसून येतो. पोशा हा शब्द पालघरमधील कोकणी आणि कोळी समाजात आढळला आहे. या शब्दाचे पोशा, पोसे, पेसा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बेटा हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजात पुरुषाच्या भावाच्या मुलासाठी आढळून आला आहे. भानेज हा शब्द भावाचा मुलगा या संकल्पनेसाठी पालघर जिल्ह्यातील कुंभार, वारली, उबळा या समाजात आढळला आहे.