मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

पुरुषाच्या भावाची मुलगी

डाउनलोड पुरुषाच्या भावाची मुलगी

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘पुरुषाच्या भावाची मुलगी’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात आढळून आलेले शब्द्वैविध्य पुढीलप्रमाणे: पुतणी, मुलगी, ध्वाडी, पोरगी, डिकरी, लेक, सोहरी, बेटी, भांजी, भतीजी, भतरजी इ. या शब्दांचा महाराष्ट्रातील प्रसार पुढे पाहू.

पुतणी हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. या शब्दाचे पुतनी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पुरुषाच्या भावाच्या मुलीसाठी मुलगी हा शब्द ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, उस्मानाबाद, कोलापूर या जिल्ह्यात पुरुष भाषकांकडून मिळाला आहे. (पालघर आणि वर्धा जिल्ह्यातील आदिवासी समाजातील महिलांकडून देखील हा शब्द मिळाला आहे.)

ध्वाडी हा शब्द प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळून येतो. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातही हा शब्द आढळतो. धुळे जिल्ह्यातील ठेलारी समाजात हा शब्द मिळाला आहे. या शब्दाचे ध्वडी, धुवाडी, धाडी, दुहाडी, धुडो, धुवडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

पोरगी हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलीसाठी प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात हा शब्द आढळतो. तसेच पालघर, रायगड आणि सोलापुरातही आढळतो. या शब्दाचे पोर, पोयरी, पोसी, पोशी, पोट्टी इ ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. डिकरी हा शब्द प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात पुरुषाच्या भावाच्या मुलीसाठी आढळून येतो.

लेक हा शब्द पुरुषाच्या भावाच्या मुलीसाठी आढळून येतो. पालघर, नाशिक, अमरावती, रायगड, सोलापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, या जिल्ह्यात आढळतो. या शब्दाचे ल्येक, लेकीस, लेकी, लेकरी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजात पुरुषाच्या भावाच्या मुलीसाठी सोहरी हा शब्द आढळून येतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजात भावाच्या मुलीसाठी बेटी हा शब्द आढळला आहे.जळगावमधील पावरा समाजात छोरी हा शब्द भावाच्या मुलीसाठी दिसून आला आहे.