नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘पुरुषाच्या बहिणीची मुलगी’ या संकल्पनेसाठी प्रामुख्याने भाची, सून, पांजी, सादरसशी इ शब्दांचा वापर करतात असे आढळून आले आहे. या शिवाय भतीजी, नात, डिकरी पुरुषाने आपल्या बहिणीच्या मुलीसाठी सांगितले आहेत. हे शब्द विस्ताराने पुढे पाहू. भाची हा शब्द पुरुषाच्या बहिणीच्या मुलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात वापरतात असे दिसले. भाशी, भासी, बाशी, बासी, भाच्ची, भाच़ी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. रायगड, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यातील अनुक्रमे मुस्लिम, पोवार, आणि कोरकू समाजातील व्यक्तींनी भतीजी हा शब्द बहिणीच्या मुलीसाठी वापरल्याचे दिसून येते. रायगडमधील कातकरी समाजात आणि नाशिकमधील कोकणा समाजात बहिणीच्या मुलीसाठी सून हा शब्द सांगितला आहे. पुरुषाच्या बहिणीची मुलगी सून करून आणण्याच्या पद्धतीमुळे हा शब्द वापरला जात असावा. सोलापूर जिल्ह्यात बहिणीच्या मुलीसाठी सादरसशी हा शब्द सांगितला आहे. कन्नडमध्ये सोदरसोसे हा शब्द बहिणीच्या मुलीसाठी वापरला जातो. त्यातून हा शब्द आला असावा. नात हा शब्द नाशिकमधील महादेव कोळी समाजात आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक आढळला आहे. याचे नाती असे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. डिकरी हा शब्द जळगावमधील भिल्ल समाजात आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल समाजात पांजी हा शब्द बहिणीच्या मुलीसाठी आढळला आहे.