नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘पुरुषाच्या बहिणीचा मुलगा’ या संकल्पनेसाठी पुरुष प्रामुख्याने भाच़ा आणि ज़ावई हे शब्द सांगतात. शिवाय भांजा, भतीजा हे शब्द स्त्री आणि पुरुष दोघेही सांगतात. तसेच इतर काही शब्द तुरळक प्रमाणात आढळतात ते विस्ताराने पुढे पाहू. भाच़ा हा शब्द पुरुषाच्या बहिणीच्या मुलासाठी संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. भाच़ा, भाच्च़ा, भाच़ो, भासा, बाच़ा, भाच्या, भाचे, भास्सा, भाच़ोस, भासे, भाच़ास, भाशा, भासरा, भावसा, भासो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बहिणीच्या मुलासाठी पुरुषदेखील भांज़ा हा शब्द वापरतात. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील मुस्लिम समाजात हा शब्द वापरला जातो. अपवादात्मक स्वरूपात रायगड जिल्ह्यातील इतर सामाजिक गटांतही हा शब्द आढळला आहे. जावई हा शब्द अहमदनगर, सोलापूर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात आढळला आहे. त्याचप्रमाणे पालघरमधील कोकणा समाजातही हा शब्द आढळला आहे. या शब्दाचे ज़ावई, ज़ावाय, ज़वाय, ज़ुयस, ज़ावास, भासज़ावई इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भतीजा हा शब्द बहिणीच्या मुलासाठी स्त्रिया आणि पुरुष दोघेही वापरताना आढळतात. रत्नागिरी आणि रायगडमधील मुस्लिम समाजात, पालघरमधील डवर, दुबळा समाजात आणि गोंदियामधील पोवार समाजात हा शब्द आढळून आला आहे. तसेच अमरावतीमधील कोरकू, बलई या समाजातही हा शब्द आढळतो. या शब्दाचे भतिजा, भतरेजा, भतिरजो, भतरजा, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. नातू हा शब्द नाशिक जिल्ह्यातील कोळी समाजात आढळून आला आहे. बहिणीच्या मुलासाठी नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल समाजात पांज़ो हा शब्द आढळून आला आहे. या शब्दाचे पांजा, पांजो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजात सागराळ्या हा शब्द आढळून आला आहे. भासुंडा हा शब्द ठाणे जिल्ह्यात आढळून आला आहे. तर डावीस हा शब्द नाशिकमध्ये कोकणा समाजात आढळून आला आहे. याशिवाय बहिणीचा मुलगा, बहिणीचा ल्योक, बहिणीचा पोऱ्या, बहनोयी पोहा, बहिणीचा पोरगा, बहिणीचा लेक, इ. पद्धान्तीने बोलीभाषकांनी ‘पुरुषाच्या बहिणीचा मुलाची’ओळख करून दिली आहे.