मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

आईची मोठी बहीण आणि आईची लहान बहीण

डाउनलोड आईची मोठी बहीण आणि आईची लहान बहीण

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘आईची मोठी बहीण’ आणि ‘आईची लहान बहीण’ या नात्याकरता महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत कमी-अधिक प्रमाणात वैविध्य आढळून येते. मावशी हा नातेवाचक शब्द महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सर्रास वापरला जातो. त्याचप्रमाणे सदर सर्वेक्षणात या संकल्पनेकरता माउशी, माशी, मोसी, मोठी आई, खाला, जिजी, धाकली, आईमोठी, आई, आईस, धाकलीस, वाडय, आया, मोठास, बाईल, मोठी माऊशी, फुई, मोठ्या आस, मोठी माय, जिजीस, मम्मी, बडीमम्मी, मोठी आयो, आजली, आजीबाई, वाडाई, जिज़ा, काकू, फुईस, मयती, हिरमा, आंटी, धोडावा, मोठीमम्मी, ढालाई, मोठी मा, मालपी, मॉसी. इ. वैविध्य महाराष्ट्रातील मराठीच्या विविध बोलीत आढळून आले.

त्यापैकी मालपी हा शब्द फक्त गोंदिया, व तुमसर या भंडारा जिल्ह्यातील तालुक्यात मिळाला. तर खाला हा शब्द विशिष्ट सामाजिक-भाषिक गटात मिळाला आहे. आदिवासी पट्ट्यात काही भागात वर नोंदविल्याप्रमाणे माउशी, जीजी, आई, मोठी आइ, धाकली, फुई या शब्दास -स हा प्रत्यय लावून बोलण्याची पद्धत दिसून येते. तसेच वाडाई हा शब्द मुख्यत: पालघर येथे व रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साळोख गावात मिळाला. त्याचप्रमाणे हिरमा हा शब्द केवळ रायगडातील मुरूड तालुक्यातील चिंचघर येथे मिळाला. तर फुई हा शब्द केवळ रायगडातील अलिबाग तालुक्यात बापळे या गावी मिळाला. मोठी मम्मी साधारण उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दिसून येतो, तर बडी मम्मी हा शब्द फक्त गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्हयापुरताच आढळून आला. धोडावा हा शब्द केवळ उस्मानाबादातील उमरग्यातील कसगी या गावी आढळला. त्याचप्रमाणे मॉसी हा शब्द केवळ गोंदियातील कासा-तेढवा या गावी मिळाला. काकू हा शब्द फक्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बापळे येथे मिळाला, तर जिजी हा शब्द नाशिक, धुळे, जळगाव रायगड व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील रायगडाला लागून असलेल्या गावात मिळाला आहे.

मावशी या नातेवाचक शब्दाबद्दल चर्चा करताना इरावती कर्वे (१९५३:१६८) यांनी मावशी हा शब्द वडिलांच्या लहान बायकोसाठीही वापरला जातो आणि यामागे एखाद्या माणसाने आपल्या पत्नीच्या लहान बहिणींसोबत लग्न करण्याची प्रथा कारणीभूत आहे असे नोंदविले आहे.

संदर्भ:

कर्वे, इरावती १९५३, किनशिप ऑर्गनायज़ेशन इन इंडिया, डेक्कन कॉलेज मोनोग्राफ सिरिज: ११, पुणे

धोंगडे, रमेश १९९५ (पुर्नमुद्रण२०१३) महाराष्ट्राचा भाषिक नकाशा(पूर्वतयारी), राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.