नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.
व्याकरणिक विशेष : {रीती वर्तमानकाळ}
क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. एखादी क्रिया वर्तमानकाळात नेहमी घडत असेल किंवा वर्तमानकाळात त्या क्रियेची पुनरावृत्ती संदर्भित होत असेल तर त्यासाठी रीती वर्तमानकाळातील क्रियारूप वापरले जाते. उदाहरण : ‘मी रोज कामाला जातो’ या प्रमाण मराठीतील वाक्यात ‘जातो’ ह्या क्रियापदावरुन ही क्रिया नेहमी घडते आणि वर्तमानकाळात ह्या क्रियेची पुनरावृत्ती होते हे दिसते.
मराठीच्या बोलींमध्ये रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी सर्वेक्षणात तीन प्रकारच्या संरचना आढळल्या आहेत : (१) [क्रियापद-त-लिंग,वचन,पुरुष सुसंवाद]; (२) [क्रियापद-स.वचन सुसंवाद]; (३) [क्रियापद-ता]. सापडलेल्या तिन्ही प्रकारच्या संरचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त-लिंग,वचन,पुरुष सुसंवाद] ही संरचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली.
रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-स.वचन सुसंवाद] ही संरचना राज्यातील ५ जिल्ह्यांत आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
जळगाव | जळगाव - धामणगाव, चाळीसगाव - दहिवद |
धुळे | धुळे - सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - शिंगावे व बोराडी, साक्री - धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | सटाणा - दरेगाव, मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.) |
पालघर | डहाणू - वेती |
रीती वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-ता] ही संरचना राज्यातील ३ जिल्ह्यांत आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
कोल्हापूर | चंदगड - कोदाळी |
सिंधुदुर्ग | दोडामार्ग - आयी व माटणे, मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, देवगड - तारामुंबरी व जामसंडे, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे |
रत्नागिरी | राजापूर - कंभवडे |