नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘तांबडा भोपळा’ ही मोठ्या आकाराचे फळ येणारी वेलवर्गातील वनस्पती आहे. या फळभाजीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्याच्या आकार, चव, रंग, ठिकाण व आहारातील उपयोगानुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदा. चक्री भोपळा, घागरी भोपळा, गोड भोपळा, साखर कोहळा, लाल भोपळा, काळा भोपळा, फराळी भोपळा, शिकरण भोपळा, काशीकोहळं, पंढरपुरी कोयरं, गंगाफळ, इ. यापूर्वी धोंगडे (२०१३) यांनी केलेलेया सर्वेक्षणामध्ये ‘तांबडा भोपळा’ या संकल्पनेसाठी काळा भोपळा (चिपळून), काशीकोहळं (नागपूर, चंद्रपूर) आणि डांगर (नाशिक) हे शब्द या विशिष्ट केंद्रांमध्ये माहित असल्याचे नोंदवले आहे. सदर सर्वेक्षणात या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये सापडलेले वैविध्य आणि त्यांचे ध्वन्यात्मक भेद पुढीलप्रमाणे. भोपळा हा शब्द जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून येतो. कोहळा, कोहला, कोयरा, व तत्सम शब्द फक्त विदर्भातील (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा) या ११ जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळले असून त्याव्यतिरिक्त धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुका, पालघरमधील तलासरी तालुका, रायगडमधील अलिबाग आणि रोहा तालुका आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात हे शब्द आढळले. काशीकोहळं व तत्सम शब्द सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, आणि बीड जिल्ह्यांत आढळून येतात. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गोरंबे, लातूर जिल्ह्यामधील लातूर आणि उदगीर तालुका, सातारा जिल्ह्यामधील खटाव आणि वाई तालुका, नागपूरमधील नागपूर आणि नरखेड तालुका, अहमदनगरमधील नगर आणि जामखेड तालुका, औरंगाबादमधील औरंगाबाद, पैठण, आणि सोयगाव तालुका, यवतमाळमधील नेर तालुका, जळगावमधील जामनेर तालुका, जालना जिल्ह्यामधील जालना आणि मंठा तालुका, पुणे जिल्ह्यामधील हवेली, इंदापूर, आणि मुळशी तालुका, अमरावतीमधील अमरावती, आणि वरुड तालुका, बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव-जामोद, शेगाव, आणि बुलढाणा तालुका, परभणीमधील पालम आणि सोनपेठ तालुका, हिंगोलीमधील हिंगोली, आणि कलमनुरी तालुका आणि वाशिममधील वाशिम आणि रिसोड तालुक्यात हे शब्द सापडले आहेत. चक्री भोपळा, चक्की, चक्रो व तत्सम शब्दांचा वापर औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत दिसून आला. काळा भोपळा, काळा दुधी, काळं कोहळं आणि तत्सम शब्द कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, आणि चिपळून तालुका, सिंधुदुर्गमधील देवगड तालुका, पालघरमधील वसई तालुका, रायगडमधील महाड, कर्जत, मुरुड व श्रीवर्धन तालुक्यात आढळतात. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामधील खटाव, सातारा, आणि वाई तालुका, सांगलीमधील मिरज तालुका, पुणे जिल्ह्यामधील हवेली आणि मुळशी तालुका आणि सोलापूरमधील सांगोले तालुक्यातही हे शब्द आढळून येतात. डांगर, डांग्या भोपळा व तत्सम शब्द पालघर, रायगड, ठाणे, जालना, परभणी, नशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांबरोबरच धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुका, नंदुरबारमधील नंदुरबार तालुका, जळगावमधील जामनेर, आणि चाळीसगाव तालुका, लातूरमधील लातूर आणि उदगीर तालुका, बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा तालुका, वाशिममधील रिसोड तालुका, बीडमधील बीड, आणि अंबाजोगाई तालुका, पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका तसेच सोलापूरमधील अक्कलकोट व सांगोले तालुका या भौगोलिक प्रदेशांतही वापरलेले दिसतात. कलिंगड, कलंगड भोपळा, कलांगडु व तत्सम शब्द महाराष्ट्रातील केवळ वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी तालुक्यात तसेच नांदेड जिल्ह्यात भोपळा या संकल्पनेसाठी वापरतात असे दिसून आले. देवकोहळा, देवकोये, देवभोपडा व तत्सम शब्द धुळेमधील धुळे, साक्री, लातूरमधील लातूर, उदगीर, नाशिकमधील मालेगाव, सटाणा, सुरगणा, नांदेडमधील नांदेड, किनवट, मुखेड, देगलूर, रायगडमधील अलिबाग, औरंगाबादमधील सोयगाव, जळगावमधील जामनेर, चाळीसगाव, अमरावतीमधील अमरावती, दर्यापूर, परभणीमधील पालम, सोनपेठ, परभणी, वाशिममधील रिसोड आणि बीडमधील बीड व अंबाजोगाई तालुक्यात वापरतात. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, अक्कलकोट, सांगोले, बार्शी, लातूरमधील लातूर, निलंगा, उदगीर, अहमदनगरमधील जामखेड, उस्मानाबादमधील उमरगा व बीडमधील अंबाजोगाई तालुक्यात या संकल्पनेला आहारातील उपयोगानुसार उपासाचा भोपळा, फराळीचा भोपळा व तत्सम शब्द वापरतात. उपासाचा भोपळा हा शब्द सोलापूर जिल्हा (अक्कलकोट, बार्शी, सांगोले आणि उत्तर सोलापूर तालुक्यांत), अहमदनगर (ता. जामखेड), बीड जिल्हा (ता. आंबाजोगाई), उस्मानाबाद जिल्हा (ता. उमरगा), लातूर जिल्हा (ता. निलंगा आणि लातूर) इथे आढळला आहे. फराळीचा भोपळा प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यात (अक्कलकोट, सांगोले आणि उत्तर सोलापूर) तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात दिसून आला आहे. शिकरण भोपळा हा शब्द नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात मिळाला आहे. घारीचा भोपळा व तत्सम शब्द कोल्हापूरमधील करवीर, कागल, सांगलीमधील मिरज व सोलापूरमधील सांगोले तालुक्यात सापडतो. पंढरपुरी कोयरं व पंढरपुरी कोहळं हे शब्द वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व सेलू तालुक्यात सापडले आहेत. तसेच भेर कोवडो, भेर कौवं हे शब्द अनुक्रमे वर्धा आणि अकोला जिल्ह्यात आढळून आले आहेत. गुमडकाया हा शब्द नांदेड जिल्ह्यात, भेंडस हा शब्द जळगाव जिल्ह्यामधील नंदीवाले जोशी समाजात, खुरासान, खुडोसनी, कुडोसनी, कलेंदर हे शब्द गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यामधील कलार आणि गोंड भाषिकांमध्ये दिसून आले आहेत. खुद्दू आणि कद्दू हे शब्द अमरावती जिल्ह्यात (ता. अचलापूर (गाव धामणी) तर मेवा हा शब्द नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मिळाला आहे.)