नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘छप्पर १ (उतरते छप्पर)’ या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. कौल, कौलं, कौलारू, कयेलू, कवल, कवेल, कवेला, कवलाई, कोयलू, कौला, कवलर, कौलार, कवलारी, कोलारू, कौलाच घर, छप्पर, छपर, छप्रं, छप्रा, चप्प्रा, छपरी, छप्परूस, छप्र्या, सपार, सप्प्रे, सप्री, शप्पर, सप्परी, सप्रे, सप्पर, सपर, सप्पार, सप्र्या, सप्रा, छत, चत, शत, छेत्र, सत, छेत, खापरेल, खापर, खापरी, खाप्र्या, खापरान, बिलायत खपरेल, धाबं, धाबा, धावा, आड, आडा, आळं, आरा, हड, हाड्या, पाक, पाका, पाकें, पाक्कं, दोनपाक्की, पाखं, पाखा, पाखी, पाकं, पाक्या, पक्ख्या, पाखाड्या, पाकाडी, मोरपाक, नळ्या, नळिया, नरीये, टिन, शेड, वरन, वरनी, शिवार, कोठा, रूपकाम, माळवद, शावनी, छावनी, सानी, पडवी, मोवुळे, मोळ, सज्जा, टप्रा, टपेरा, सायवन, सायवर, पदडी, डोल, ढापे, ढापं, सलाप, मावटी, मावठी, पलाड, मांडण, कुटारू, मोगे, झाकन, टिबा, पानसर, म्हाळत, साटा, मगरी, धाई, घोने, वयनाट, उरा, शटान, थथ्यार, खोपडी, कबेलू, पाटन, तस्मा, मथान, इत्यादी. सदर संकल्पनेकरता वापरण्यात येणार्या शब्दांमध्ये ते छप्पर बनविण्याकरता वापरण्यात येणारी साधने, त्याचे कार्य यानुसार शब्दांची योजना केलेली दिसते. खापर्या, कौलं, नळ्या ही साधने वापरून ज्या भौगोलिक प्रदेशांत उतरते छप्पर तयार केले जाते, त्या ठिकाणी सदर संकल्पनेकरता छप्पर आणि छत या शब्दांबरोबरच कौलं आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे शब्द, नळ्या आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे शब्द तसेच खापर्या आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे शब्द दिसून येतात. कौलारू हा शब्द महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आढळला असून आडा हा शब्द पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळला आहे. त्यामध्ये आड, अडं हे ध्वनी वैविध्य आढळते. मड्यार हा शब्द गोवा राज्यास लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात दिसून येतो. नळ्या हा शब्द आणि त्याचे ध्वन्यात्मक वैविध्य सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळून येते. खापरेल हा शब्द आणि त्याचे ध्वन्यात्मक वैविध्य असणारे शब्द मराठवाडा आणि विदर्भात मुबलक प्रमाणात मिळाले आहेत. भंडारा आणि चंद्रपूर मध्ये वरन आणि त्याचे ध्वनी वैविध्य आढळून येते. औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जर गवताचा वापर केला असेल तर त्याला छप्पर असा शब्द मिळाला आहे तर कौलारु असेल तर त्याला कौलारु किंवा छत हा शब्द मिळाला आहे. हारा, नळे, नले हे शब्द रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मराठीभाषिक मुस्लिम समाजात तुरळक प्रमाणात आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त बेन्ग्रोल, मोरपाक, कबेलू, धोपाटगे हे शब्द अनुक्रमे मरार, मातंग, कुणबी आणि गोंड आदिवासींमध्ये मिळाला आहे. टीन हा शब्द मराठवाडा आणि विदर्भात त्याच्या ध्वनी वैविध्यानुसार आढळून येतो.