नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.
जमिनीखाली उगवणारे गोड कंद ‘रताळे’ या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य आढळले आहे.
रताळं, रत्ताळं, रत्ताळ रताळ, रताळी, रतालो, रतेला, रत्तालं रताळा, रताळो, रताळू, रत्तालू, रताल, रत्ताळा, रतालू, रताला, रताले रताळे, रताय, रत्नाळ, रताली, रत्नाडं, रत्नारं, राताल्या, रेतालू, रतालं, रातेरा, रतालं, रत्तेली, रतेली, रतळ, रताडं, रेतनाळू, रत्नाय, रत्नाळी, रत्नाल्य, रत्नाड, रताळे, रताडू, रताउ, रताळू, साक्रू, साख्रू, साखरू, साकरू, साक्री सक्र्या, कंद, कंडो, सकनारं, सकनारू, सकनारा, सकनार, सक्ला, सकरकंद, साकरकंद, साकारकंद, सकरकंदं, शकरकंद, शक्करगन, चिन्नं, चिनी, काटीकन, कोंगे, कंगेव, कंगी, कंगा, पेंड्या, माटी, छक्री, सक्री, लातेरी, भातकंद, बातात, बात्तास, भेली, मोम्ना, इ.
मोल्सवर्थ (१९७५) यांनी रक्तालू हा मूळ शब्द नोंदविला असून रताळें व रताळू या पर्यायी शब्दांची नोंद केली आहे. सदर सर्वेक्षणात रताळं हा शब्द गोंदिया जिल्हा वगळता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. रताळं हा मूळ शब्द असून या शब्दात ध्वन्यात्मक परिवर्तन होऊन या शब्दाच्या उच्चारात वर नोंदविल्याप्रमाणे वैविध्य आढळून आले आहे. धोंगडे (२०१३: ६२) यांनी रताळी या शब्दाची नोंद ‘महाराष्ट्राचा भाषिक नकाशा’ यात दिली आहे. धोंगंडे यानी नोंदविलेला धुळे केंद्रातील साकस शब्द सदर सर्वेक्षणात आढळून आला नाही. त्याऐवजी साक्रू हा शब्द धुळे, पालघर, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद व जळगाव या भागात आढळून आला. हिंदी भाषेमध्ये रताळे या कंदाकरता प्रचलित असलेला शकरकंद हा शब्द भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात दिसून आला आहे. या शब्दाचे सकरकंद असे ध्वन्यात्मक वैविध्यदेखील आढळून आले आहे. चिन्न, चिनी हे शब्द कोल्हापूरातील केवळ चंदगड या तालुक्यात दिसून आले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग म्हणजेच गोव्यालगतच्या तालुक्यात रताळ्यासाठी कोंगे, कंगेव, कंगी, कंगा, इ. शब्द आढळून आले. याव्यतिरिक्त रत्नाळ हा शब्द विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांत दिसून आला आहे. भातकंद हा शब्द जळगाव जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात दिसून आला आहे.
अमरावती जिल्ह्यात मिळा भेली लेला हा शब्द तेथील कोरकू समाजात, मोम्ना हा शब्द तेथील आरक समाजात तर माटी हा शब्द यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील राजगोंड समाजात आढळून आला आहे. बातात, बात्तास रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई या गावातील ख्रिश्चन समाजात आढळून आला आहे.