मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

सिमला मिरची

डाउनलोड सिमला मिरची

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘सिमला मिरची’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात शिमला मिरची, ढब्बु मिरची, ढोबळी मिरची, भोपळा मिरची, फोफेरी मिरची, भोंगी मिरची, पोंगली मिरची, चपाटा मिरची, सरकारी मिरची, डगर मिरची, म्हातारी मिरची, टपोरी मिरची, भेंडी मिरची, , इ. शब्द वापरले जातात. ढब्बु, ढोबळी, भोपळा, जाडी, टपोरी हे शब्द मिरचीच्या अकारावरून वापरले जातात. तर शिमला मिरची, विलायती मिरची, बंबईची मिरची, बंगाली मिरची, कश्मिरी मिरची हे शब्द प्रदेशवाचक नावावरून आले आहेत. याशिवाय आणखी काही शब्द वापरले जातात ते पुढे विस्ताराने पाहू.

शिमला मिरची हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जातो. प्रामुख्याने विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर कोकण आणि मराठवाड्यात कमी प्रमाणात वापरला जातो. पश्चिम महाराष्ट्रात अतितुरळक प्रमाणात वापरला जातो. शिमला, सिमला, शिमली, सिमली, चिमला, चिमली, छिमला, शिपला, शमला, शिमगा, शिला इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

ढब्बु मिरची हा शब्द कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर या जिल्ह्यात अधिक प्रमाणात वापरला जातो. तर चंद्रपूर, वर्धा, परभणी, नांदेड, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यातही आढळून आला आहे. या शब्दाचे ढबु, ढभु, ढब्बी, ढबी, ढेबु, ढब्बुना डब्बु, डबु, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

ढोबळी मिरची हा शब्द महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे वगळता सर्वत्र आढळतो. हा शब्द पुणे, पालघर, नाशिक, बीड, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यात अधिक प्रमाणात वापरला जातो. तर उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळतो. तसेच उर्वरित मराठवाडा आणि विदर्भात अतितुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाच्या उच्चारात ध्वनिवैविध्य मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ते पुढीलप्रमाणे – ढोबळी, ढबुळी, ढबुली, ढाबुळी, ढबळी, ढाबळी, ढाबोळी, ढंबरी, ढांगडी, ढोबरी, ढोबडी, ढोम्ब्री, ढेमरी, ढोब्री, ढोमशी, ढोंबरी, ढाबोरी, ढोमळा, ढोबडी, ढोबला, ढोबो, ढोब्ळजा, ढोपली, ढोपली, ढोपला, ढेबळी, ढेबीय, ढोवळी, ढोबी, ढबुरली, ढोभळी, ढोपळी, ढोपळा, ढोलळा, ढोलळी, डोबली, डबोळी, डबरी इ.

धोबरी मिरची हा शब्द रायगड आणि ठाणे जिल्ह्यात (जिल्ह्यात जास्त प्रमाणात) तर जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे.

भोपळा मिरची हा शब्द कोकणात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तसेच सातारा, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे, नाशिक इ. जिल्ह्यात अतितुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे भोपळा, भोपळी, भोपली, भोपला, भोपडा, भोपलो, भोबडी, भोबरी, भोपा, भोबरा, भोबळी, भोभी, भिमरी, बोबरी, भोपी, भोबी, बोबडी, भोपळो, भोपळ्यो, बोहोपळी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

फोफेरी\पोपेरी मिरची हा शब्द रायगड, ठाणे, पालघर, या जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळतो. तसेच जळगाव मध्ये तुरळक प्रमाणात आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात मिळाला आहे. या शब्दाचे फोकली, फोक, फोगी, फुगी, फुगा, फुगली, फोफे, फोफ, फुफ्या, फाफडा, फोफी, फापडा, पोपेरी, पोपरी, पोपल्या, पोपली, पोपेला, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

मोठी मिरची हा शब्द सोलापूर, पालघर, लातूर या जिल्ह्यात तुरळक आढळतो. सातारा, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यात अतितुरळक आढळतो. यासाठी मोटा, मोठ्ठी, मोठा, मोटी, मोट्टी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. वांगी मिरची हा शब्द नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे वांगी, वांग, वांगफोड इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. जाडी मिरची हा शब्द जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. यासाठी जाडी, जाळी, झाडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

भोंगी मिरची हा शब्द सोलापपूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. भोंगी, भुंगी, भोंगा, बोंगी, बुंगी, बोंडगाम भोगा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पोंगली मिरची हा शब्द अकोला, अमरावती, बुलढाणा, या जिल्ह्यात तुरळक आढळतो. या शब्दाचे पोंगला, पोंगलु, पोंगडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. भाजीची मिरची हा शब्द नाशिक, जालना, नांदेड, रायगड या जिल्ह्यात मिळाला आहे. सिमला मिरचीची भाजी केली जात असल्यामुळे तिला भाजीची मिरची म्हटले आहे.

याखेरीज सदर संकल्पनेकरता इतर काही शब्द तुरळक प्रमाणात मिळाले आहेत. त्यांची नोंद घेणे गरजेचे वाटते.

चपाटा मिरची हा शब्द औरंगाबाद जिल्ह्यातील तडवी समाजात आढळला असून जळगाव जिल्ह्यातील मराठा आणि बौद्ध समाजात दिसून आला आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात चापा हा शब्द मिळाला आहे.

सरकारी मिरची हा शब्द नांदेड जिल्ह्यात मान्नेरवार्लू आणि मराठा समाजात तर चंद्रपूरमधील ढीवर समाजात दिसून आला आहे.

म्हातारी मिरची हा शब्द रायगड जिल्ह्यातील महादेव कोळी समाजात आणि डगर मिरची हा गडचिरोली जिल्ह्यातील गोंड समाजात दिसून आला आहे. टपोरी मिरची हा शब्द धुळे जिल्ह्यात तर टोबरी व ठोम्ब्री हे शब्द अमरावती जिल्ह्यात सापडले आहेत. तसेच टोमानी हा शब्द औरंगाबाद जिल्ह्यात मिळाला आहे. चिन्हा मिर्च हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यातील एका मुस्लिम समाजात तर चिणगा मिरची हा शब्द रायगड जिल्ह्यातील डोंगर कोळी समाजात आढळून आला आहे. भेंडी मिरची हा शब्द जळगाव जिल्ह्यातील भिल्ल समाजात आढळून आला आहे. तर भेंड मिरची हा शब्द धुळे जिल्ह्यातील कासार समाजात मिळाला आहे. रसगुल्ला मिरची हा शब्द धुळे, औरंगाबाद, आणि जळगाव जिल्ह्यातील भिल्ल समाजात मिळाला आहे. तसेच जळगावमधील राजपूत, कोळी आणि नंदुरबारमधील मातंग समाजात दिसून आला आहे. या शब्दाचे रसगुल्ला, रजगुल्ला, रडगुल्ला हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. रडगुल्ला हा शब्द नंदुरबारमधील मातंग समाजातील व्यक्तींकडून मिळाला आहे.

कॅपसिकम हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात, विलायती मिरची हा शब्द चंद्रपूर जिल्ह्यात, तर बंबईची मिरची, आणि बंगाली मिरची हे शब्द अनुक्रमे जालना जिल्ह्यातील वडार समाजात, औरंगाबाद जिल्ह्यातील भिल्ल समाजात आढळून आले आहेत. तसेच काश्मिरी मिरची हा शब्द अमरावती जिल्ह्यातील बलाई समाजात मिळाला आहे.

धांगडी मिरची हा शब्द हिंगोली जिल्ह्यातील अंध आदिवासी समाजात मिळाला आहे तर काकडी मिरची आणि ज्वाला मिरची हे शब्द औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत.

कुसरिकी हा शब्द अमरावती जिल्ह्यातील राजगोंड समाजात, काजुमिरी हा शब्द पालघरमधील सामवेदी ब्राम्हण समाजात तर हिरवा मिरची, हिरवी मिरची हे शब्द अनुक्रमे बुलढाणा आणि रायगड जिल्ह्यात आढळून आले आहेत.