मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

दुधीभोपळा

डाउनलोड दुधीभोपळा

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘दुधीभोपळा' या संकल्पनेसाठी मराठीच्या विविध बोलींमध्ये काही वैविध्य आढळून आले आहे. दुधीभोपळा, दुधी, भोपळा, लवकी, कद्दू, मुगाडी, म्हारो दुधी, तुम्मा, सकेनी, कोठळे/कोंटळ्या, परास, डांगडा, हरसुल, इ. शब्द आढळून येतात.

कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचप्रमाणे अहमदनगर, जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यांत दुधीभोपळा हा शब्द आणि त्याचे ध्वन्यात्मक वैविध्य असणारे दुदी भोपळा, दुद भोपळा, दुदु भोपळा, दुधाळी भोपळा, दुधवा भोपळा, दुदई, दुध्या, दोधी भोपळा, दुधा भोपळा, दुध्ना भोपळा, दुधवाला भोपळा हे शब्द प्रामुख्याने आढळून येतात. नांदेड जिल्ह्यात दुदगं या शब्दाचा वापर अधिक प्रमाणात आढळून आला. ज्या भौगोलिक प्रदेशांत तांबड्या भोपळ्याकरता चक्री-डांगर इ. शब्द वापरले जातात अशा जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, नाशिक इ. केवळ दुधी, केवळ भोपळा ह्या शब्दांच्या वापराचे प्रमाण अधिक आहे.

लवकी हा शब्द विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांत दिसून येतो. या शब्दाचे लौकी, लॉकी, लोकी हे ध्वन्यात्मक वैविध्यही आढळून आले. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात कद्दू शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात वंजारी समाज जास्त असणार्‍या गावात कद्दू हा शब्द दिसून येतो. महाराष्ट्राच्या इतर काही भागात काही प्रमाणात हा शब्द दिसून येतो. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, औरंगाबाद, पुणे, लातूर, जालना, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यामधील विशेषत: मुस्लिम, माना, किराड, लोधी, बलाई, मांग या समाजात तुरळक प्रमणात कद्दू शब्द दिसून येतो. याशिवाय मराठी बरोबर हिंदी भाषा बोलता येणार्‍या इतर काही भाषकांमध्ये कद्दू या शब्दाचा वापर दिसून येतो.

दुधी भोपळा या भाजीला त्याच्या आकार, रंग इ. शी संबंधित काही नावे प्रचलित असल्याचे दिसून येते. त्यामध्ये दुधी भोपळ्याच्या आकारावरून लांब भोपळा, लामका भोपळा, लाम भोपळा, लांबार भोपळा, लांबोल भोपळा, लांबडा भोपळा, लांबं भोपळं, लंबे भोप्पयो, लांबुळा भोपळा हे सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या भागात आढळून येतात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात लांबा कद्दू हा शब्द आढळला आहे.

मुगाडी या शब्दाचे मुगाडी, मुगडं, मुगाडे, मुगटं, मुगाडा भोपळा, मुगाडी भोपळा, मुगी भोपळा, मुगं भोपलं, मुगा भोपळा हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि नेवासा तालुक्यात जास्त प्रमाणात हा शब्द दिसून येतो. शिवाय औरंगाबादच्या पैठण आणि पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात हा शब्द तुरळक प्रमाणात दिसून येतो. तसेच दुधी भोपळ्याच्या रंगावरून पांढरा भोपळा, सफेद भोपळा, पांड्रा भोपळा, हिरवा भोपळा इ. शब्द आढळून येतात.गोवा राज्याला लागून असणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात म्हारे दुधी हा शब्द आढळून येतो. त्याचे म्हारो दुधी असे ध्वन्यात्मक वैविध्य दिसून येते.

तुम्मा हा शब्द गडचिरोली जिल्ह्यातील कोर्ची तालुक्यातील कवर आणि गोंड समाजात दिसून येतो.

कोठळे/कोंटळ्या हा शब्द पालघर जिल्ह्यातील हातेरी गावातील ‘क’ ठाकुर समाजात दिसून येतो. विशेष: मोठ्या वयोगटातील अशिक्षित लोक हा शब्द वापरताना दिसतात. डांगडा हा शब्द सातारा जिल्ह्यातील खटाव या तालुक्यात दिसून येतो.

याशिवाय चवीला गोड असतो म्हणून गोड भोपळा, तुपकट असतो म्हणून तुप भोपळा, काकडी सारखा दिसतो म्हणून काकडी भोपळा, शिंगासारखा आकार असतो म्हणून शिंगाडी भोपळा, शिंगाड्या भोपळा, शेंडी भोपळा, ज़वारी भोपळा, साधा भोपळा, सादा भोपळा, सरकारी भोपळा, कालवण (भाजी) बनवले जाते म्हणून कालवनाच़ा भोपळा, कतली भोपळा अशी विशेषणे वापरली जातात.