मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

झ़ाडू-१ (सर्वसाधारणपणे घराबाहेरील स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू)

डाउनलोड झ़ाडू-१ सर्वसाधारणपणे घराबाहेरील स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू

नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. खराटा, खट्टा, खर्‍हाटा, खरोटा, खराटो, झ़ाडू, ज़ाडू, झ़ारु, झ़ाळू, झाडू, भुतारी, बुतारी, भोकरी, बोख्री, बोखर्‍या, बोक्री, बाहरी, बाडी, भारा, बहारा, बाहरू, भायडो, साळुता, साळता, साळाती, साळू, साळोता, सळोता, सराटा, सराटी सान, सारण, सारन, सुनी, फडा, फळा, हालता, हालातो, बास, बासोर, घोळ, घोलन, बंदन, शिरावा, शिराव, शिरोवा, वाडवन, वाढवन, कैसार, मोलो, मुगलो, मुगडो, मवेली, झ़ाडनी, झ़ाडणी, झ़ान्नी, झान्नी, झाडनी, केरसुणी, केरसुनी, लक्ष्मी, लोटना, इ.

यापैकी खराटा आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे खर्‍हाटा, खरोटा, खराटो हे शब्द महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. खट्टा हा शब्द नाशिक, धुळे, जळगाव, आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये दिसून येतो. ‘झ़ाडू’ आणि तत्सम शब्द प्रामुख्याने रायगड, आणि ठाणे जिल्ह्यांत आढळून येतात. याच प्रदेशांत ‘झ़ाडू’ या शब्दाला येळीचा, हिराची, नारळाची, नागलाची इत्यादी विशेषणे लावलेली दिसतात. ‘बुतारी’ आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे भुतारी, बुतारा, भुतारु इ. शब्ददेखील प्रामुख्याने रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात तर अहमदनगर जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतात. भोकरी, बोख्री, बोखर्‍या, बोकी हे शब्द नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत. बाहरी, भारा, बाडी, बहारा, बाहरू, भायडो हे शब्द पालघर, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळले आहेत. ‘साळूता’ आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे ‘साऊता’, ‘साळता’, ‘साळाती’ वगैरे शब्द कोल्हापूर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा या पट्ट्यात आढळतात. तसेच ‘भौगोलिक सान्निध्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ‘साळता’ आणि त्याचे ध्वनिवैविध्य असणारा ‘हालता’ या कोकण-कोल्हापूरकडील शब्दांबरोबरच नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांत सापडणारे ‘झाडणी’, ‘केरसुनी’, ‘शिराई’, ‘बहारा’, इ. शब्ददेखील सापडतात. सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ‘केरसुणी’ आणि लातूर, उस्मानाबाद, नागपूर, जळगाव, वर्धा, नांदेड, यवतमाळ, जालना, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांत प्रामुख्याने ‘फडा’/’फळा’ हे शब्द वापरले जातात.

या सर्व शब्दांपैकी हिर्‍याचा झ़ाडू, नारळाचा झ़ाडू, नागलाची झ़ाडू यासारखे शब्द हे ज्या प्रकारच्या वनस्पतीपासून हा झाडू तयार केला जातो त्यावरून तयार केलेले दिसतात. तर ‘झ़ाडनी’, ‘लोटना’ यासारखे शब्द कार्यदर्शक आहेत. सराटी, सराटा हे शब्द रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील मुस्लिम समाजात, तसेच अमरावती जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळले आहेत. सान, सारन हे शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा राज्याला लागून असलेल्या सावंतवाडी तालुक्यात आढळले आहेत. बास, बासोर हे शब्द रायगड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात तर कसुर, कैसार हे शब्द विदर्भातील गोंड समाजात आढळले आहेत. बंदन हा शब्द अमरावती जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून येतो. मोलो, मुगडो, वाडवन हे शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून आले आहेत.