मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

झ़ाडू-३ (जुन्या पद्धतीची घरे झाडण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू)

डाउनलोड झ़ाडू-३ जुन्या पद्धतीची घरे झाडण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

'जुन्या पद्धतीची घरे झाडण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू' या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. फडा, फळा, झाडू, केरसुनी, झाडणी, झ़ाडणी, झाडनी, साळूता, लक्ष्मी, बाहरी, बहारी, बाहारी, बोहरी, भाहरी, मोळ, मोली, बुतारी, भुतारी, बुतारं, साळता, खराटा, खर्‍हाटी, खरोटा, खराटो, साळाती, झान्नी, झ़ान्नी, झ़ाळन्नी, शिराई बहारा, शिराव, मांगाची शिराव, शिरावी, शिराय, शिरा, भारा, भारी, भारं, भारो, मोल, मोवळ, मोयाळा, भाडी, बाडी, बायडी, मयेर, मयेरं, मयारू, साऊता, मौळ, मउल, मोऊळ, मोवाळ, मोळा, मोळाची झ़ाडू, कुंच़ा, कुंचा, कुच्ची, कुच्या, कुचा, बायरं, बायरी, बाइरी, हालता, पिसोळी,सारन, सान, सुनी, मोया, मोलझ़ाडू, बुहारी, बुआरी, मोळवंडी, केरकाढणी, लोटना, वहारी, वाहरी, , , इ. या वैविध्याचे भौगोलिक आणि सामाजिक विवरण पुढीलप्रमाणे.

लातूर, उस्मानाबाद, नागपूर, जळगाव, वर्धा, नांदेड, यवतमाळ, जालना, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांत प्रामुख्याने फडा, फळा हे शब्द वापरले जातात. झाडू आणि तत्सम शब्द रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आढळून येतात. तसेच सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये केरसुणी हा शब्द प्रामुख्याने आढळला आहे.

झ़ाडनी हा शब्द प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत आढळून येतो. तसेच नाशिकच्या मालेगाव आणि सटाणा या तालुक्यात, अहमदनगर आणि औरंगाबादच्या काही भागात आणि अमरावती, वर्धा, बीड, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. औरंगाबादमधील भिल्ल आणि मराठा समाजात हा शब्द प्रामुख्याने आढळून येतो. तर रत्नागिरी, बीड, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांत अनुक्रमे ब्राम्हण, मराठा, आरक, तेली या समाजात आढळून येतो. या शब्दाचे झ़ाडणी, झान्नी, झाडनी, झ़ाळन्नी, झ़ान्नी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

शिराई हा शब्द नाशिक आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसेच अहमदनगरचा अकोले तालुक्यात आणि औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात आढळून येतो. तर जालना जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे शिराव, मांगाची शिराव, शिरावी, शिराय, शिरा, शिराई इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

साळूता आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे साऊता, साळता, साळाती वगैरे शब्द कोल्हापूर आणि दक्षिण कोकण (सिंधुदुर्ग, रत्नागिरी) या पट्ट्यात आढळतात.

लक्ष्मी हा शब्द अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसेच अहमदनगरला लागून असलेल्या औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांत आढळून येतो. तर रायगड, वाशिम या जिल्ह्यांतही तुरळक प्रमाणात आढळून येतो. प्रामुख्याने मराठा समाजात जास्त प्रमाणात आढळून येतो.

बाहरी हा शब्द रायगड, ठाणे, पुणे, पालघर, नंदुरबार, जळगाव, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत आढळून येतो. रायगड, ठाणे, पुणे पालघर या जिल्ह्यांतील कातकरी समाजात हा शब्द प्रामुख्याने आढळून येतो. तसेच पालघर जिल्ह्यांत दुबळा, धोडिया या समाजांत, जळगाव जिल्ह्यांतील पावरी, गोंदिया जिल्ह्यांत पोवार, महार, गोवारी, ढिवर, हळबी या समाजात, नागपूर जिल्ह्यांत लोधी, कलाल, आणि मरार समाजात, नंदुरबार जिल्ह्यांत वळवी, भिल्ल, चांभार इ. समाजात आढळून येतो. या शब्दाचे बाहरी, बहारी, बाहारी, बायरं, बायरी, बाइरी, बोहरी वहारी, वाहरी, भारा, भारी, भारं, भारो, भाहरी, बुहारी, बुआरी, भाडी, बाडी, बायडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून येते. यापैकी भारा, भारी, भारं, भारो, भाहरी, बुहारी, बुआरी हे वैविध्य ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यांत आढळून आले. तर भाडी, बाडी, बायडी हे वैविध्य नंदूरबार जिल्ह्यात आढळून आले. बहारी, बाहारी, बायरी, बाइरी, बाहारी, वहारी, वाहरी हे वैविध्य रायगड आणि जळगाव जिल्ह्यांत तर बायरं, बायरी, बाइरी हे वैविध्य नागपूर जिल्ह्यांत आढळून आले.

मोळ आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद असणारे मौळ, मोल इ. शब्द प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सापडतात. या शब्दाचे मोळ, मोल, मोली, मोवाळ, मोयाळा, मोया, मोलझ़ाडू, मउल, मयेर, मयेरं, मयारू, मोऊळ, मोवळ, मोळा, मोळाची झ़ाडू, मोळवंडी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले.

बुतारी हा शब्द रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आढळून येतो. मुख्यत्वे ठाकूर आणि कातकरी या समाजात हा शब्द आढळून येतो. त्याचबरोबर कुणबी, मराठा, आगरी, भंडारी, या समाजातही हा शब्द आढळून येतो. बौद्ध आणि तेली समजात अपवादात्मक स्वरूपात आढळून येतो. या शब्दाचे भुतारी, बुतारं असे ध्वन्यात्मक भेद आढळून आले.

भौगोलिक सान्निध्यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यात हालता, साळता या कोकण-कोल्हापूरकडील शब्दांबरोबर नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांत सापडणारे झ़ाडणी, केरसुनी, शिराई, बहारा, इ. शब्ददेखील सापडतात.

खराटा हा शब्द पालघर जिल्ह्यातील वारली आणि गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील गोंड समाजात दिसून आला आहे. त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यात अतिशय तुरळक प्रमाणात हा शब्द आढळून येतो. त्यात नागपूर (कलार समाज), नंदुरबार (मातंग समाज), लातूर (लिंगायत समाज), रायगड (भंडारी समाज), ठाणे (म ठाकूर समाज), भंडारा (कोहली समाज), बीड (मराठा समाज), औरंगाबाद (मराठा समाज) आणि वर्धा (मराठा समाज) या जिल्ह्यांत या शब्दाचा अतिशय तुरळक वापर दिसून येतो. या शब्दाचे खर्‍हाटी, खरोटा, खराटो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून येते.

कुंच़ा हा शब्द अतिशय अपवादात्मक स्वरूपात नंदुरबार, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, पालघर या जिल्ह्यामध्ये वापरल्याचे दिसून आले आहे. या शब्दासाठी कुंच़ा, कुंचा, कुच्ची, कुच्या, कुचा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले.

पिसोळी हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आढळून आला आहे. मराठा, ख्रिश्चन आणि मुस्लिम या समाजात हा शब्द आढळून येतो. सारन हा शब्ददेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला असून या शद्बाचे सारन, सान, सुनी, इ. ध्वन्यात्मक भेद आढळतात.

या सर्व शब्दांपैकी शिंदीची झ़ाडू, मोलाची झ़ाडू यासारखे शब्द हे ज्या प्रकारच्या वनस्पतीपासून हा झाडू तयार केला जातो त्यावरून तयार केलेले दिसतात. तर झाडणी, केरकाढनी, लोटना यासारखे शब्द कार्यदर्शक आहेत.