नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘अळू’ या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. अळू, आळू, येळू, आडुची पानं, पोती, चिमकुरा, च़मकुरा, धोपा, धोबा, कोचई, तेरा, तेरी, तेरे, तेडा, पात्रा, पाथरा, बरमाराकस, गाटीये, घाट्या, घाट्याची पानं, देठी, गरगट, गडारा, पाटोन्ना, पातोड्याची पानं, घुया, आहल्या पानं, डोडा, बेस्रम, इ. अळूच्या पानापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या नावावरूनच काही ठिकाणी ही पाने ओळखली जातात असे दिसते. उदाहरणार्थ, घाट्याची पानं, पातोड्याची पानं इ. या शब्दाचा भौगोलिक आणि सामाजिक प्रसार पुढीलप्रमाणे: आळू हा शब्द पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जास्त आढळून येतो. तसेच अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातही आढळून येतो. महाराष्ट्राच्या इतर भागात आळू हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे येळू, आलु, आळुची पानं, आळीव, आल्यापात्रे, आवळु, आळा, आळन पान, आलवर, आलवाड, आलकुरी, अळू, आळुचे पानं, अळुची पानं इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. आडु हा शब्द नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील भिल्ल आणि महार समाजातील काही व्यक्तींनी सांगितला असून या शब्दासंदर्भात आडुची पानं, आडु, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तर बुलढाणा जिल्ह्यातील शिरजगाव येथे वाडुची पानं हा शब्ददेखील आढळून आला आहे. पोती हा शब्द धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येतो. शिवाय नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून येतो. तर अकोला, ठाणे (कातकरी समाजात), बीड (बेडूकवाडी गावात), वर्धा (थार ता. आष्टी) या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. अकोल्यातील या शब्दाच्या बाबतीत पोती, पोथी, पोतीनं पानं, पोतीचे पान, पोतीना पानं, कोथी, कोतीची पानं इ. ध्वनिवैविध्य आढळते. कोथी आणि कोतीची पानं हे ध्वनिवैविध्य केवळ अमरावती जिल्ह्यात आढळून आले आहे. चिमकुरा हा शब्द लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याशिवाय अमरावतीच्या धारणी वगळून इतर तालुक्यात, बीडच्या बीड आणि आंबाजोगाई तालुक्यात, वर्धा, यवतमाळ, जालना या जिल्ह्यांच्या अनुक्रमे आष्टी, नेर, आणि मंठा या तालुक्यातही आढळून येतो. सोलापूरच्या उस्मानाबादला लागून असलेल्या बार्शी तालुक्यातील गावात तुरळक प्रमाणात हा शब्द वापरतात. या शब्दाचे चमकोरा, चमकुरा, चिमकरा, चिमकारा, च़ुमकुरा, चमकुरा, च़ंदकुरा, च़मकुर, चमकुर्याची पानं, चमखुरा, चमकी, चिमकुर्याची पानं, चेमकुरा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. धोपा हा शब्द विदर्भातील प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आढळून येतो. नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यात अनुक्रमे गौल, तेली, गोसावी आणि कोरकू, भिलई या समाजात अतितुरळक प्रमाणात आढळतो. त्या शब्दाचे धोपा, धोपी, धोबी, धोप्याच़ं पान, धोबा, धोप, धोपची पानं, धुप इ. ध्वन्यात्मक वैविध्य दिसून येते. कोचई हा शब्द विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. नागपूरच्या भिवापूर आणि रामटेक तर चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे कोचई, कोच़ई, कोचे, कोची, कोचा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कोचा आणि कोची हे वैविध्य भंडारा जिल्ह्यातील तेली आणि गोहरी समाजात आढळून आले. तेरी हा शब्द पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आढळून येतो. याशिवाय सातारा आणि नाशिक जिल्ह्यात तसेच रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात हा शब्द तुरळक प्रमाणात मिळाला आहे. या शब्दाचे तेरा, तॅरे, तेरे, तेर्याची पानं, तेडा, तेडी, तोरी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. तोरी हा शब्द वाशिमच्या गिरडा या गावात अपवादात्मक वापरला गेला आहे. पात्रा हा शब्द नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येतो तर धुळे जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. पालघर जिल्ह्यात वारली समाजातील व्यक्तींकडून हा शब्द मिळाला आहे. तर रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातही या शब्दाचा वापर दिसून आला आहे. या शब्दाचे पत्रन्या, पाथरा, भाजी पात्र, पात्रान पाने, पातोर्याच़ं पान इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. बरमाराकस हा शब्द प्रामुख्याने भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळतो. ब्रहमराक्षसची पानं, बरम्याराक्षस, ब्रहमराक्षसची पाना, ब्रहमराकस, बरम्याराक्षसची पानं, बरम्याराकस, ब्रमनाराकस, बरम्याराकशची पत्ते, बरमं राक्सस, ब्रमन्याराकस, बरमाराकस, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. घाट्या हा शब्द सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळून येतो. सातार्याच्या सातारा व पाटण तालुक्यात आणि रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात हा शब्द आढळून आला. घाटवड्याची पानं, घाट्याची पानं, गाट्या, गाटीये इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. रायगडच्या अलिबाग आणि ठाण्याच्या अंबरनाथ तालुक्यात देठी हा शब्द आढळून येतो. आळूच्या पानांच्या देठाची भाजी केली जाते. म्हणून देठी हा शब्द रूढ झाला असावा. या शब्दाचे देठी, देटी, डेटीची पानं इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. अमरावतीच्या धारणी तालुक्यातील कोरकू समाजामध्ये गडारा हा शब्द वापरला जात असल्याचे दिसून येते. गरगट/गरगटी हे शब्द पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कातकरी समाजात आणि हवेली व इंदापूर तालुक्यातील मराठा व धनगर समाजात तुरळक प्रमाणात वापरले गेले आहेत. रायगड, ठाणे, नाशिक, ह्या जिल्ह्यात पातोडी हा शब्द तुरळक प्रमाणात आढळतो. रायगडच्या कर्जत, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, ठाण्याच्या अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यांत हा शब्द आढळून येतो. या शब्दाचे पातोडी, पाटोन्ना, पातोड्याची पानं, पातोड्यान पान, पातोडीची पानं, पातोड्या, पातुर्याचे पान इ. ध्वनिवैविध्य आढळते. घुया/घुई हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील बिंजेवार, ढिवर, हळबी, महार, कुणबी इ. समाजातील भाषकांनी सांगितला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावातील भिल्ल समजात तुरळक प्रमाणात अहल्या पानं हा शब्द वापरला गेला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यातील कोरकू समाजात डोडा हा शब्द मिळाला असून जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजात या पानांकरता भाजीच़ं पान हा शब्द वापरला जात असल्याचे दिसून आले आहे. शांगुरा हा शब्द नांदेडच्या इस्लापूर गावातील महादेव कोळी समाजात आढळून आला असून आमटा हा शब्द अमरावतीच्या गाडेगावातील कुणबी समाजात दिसून आला आहे. बेस्र्म हा शब्द वाशीम जिल्ह्यातील शिरपुती या गावात मिळाला. अळू या संकल्पनेसाठी वापरण्यात येणार्या शब्दांवर इतर भारतीय भाषांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. द्राविड भाषांमध्ये आळू या संकल्पनेसाठी साधारणत: तमिळमध्ये चेपंकझांगु किंवा चेंबू, मल्याळममध्ये चेंबू किंवा चेंपू, तेलगूमध्ये चेमा किंवा चामा हे शब्द वापरले जातात. तेलगूभाषिक प्रदेशाला लागून असलेल्या महाराष्ट्रातील प्रदेशात चिमकुरा हा शब्द आढळून येतो. द्राविड भाषांच्या प्रभावाने मराठीमध्ये चिमकुरा हा शब्द तयार झाला आहे. बंगाली भाषेत आळू या संकल्पनेसाठी कोचु हा शब्द आढळून येतो. या शब्दाशी साम्य असणारा शब्द महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडच्या भागात कोचई हा शब्द आढळून येतो. तारो या इंग्रजीतील शब्दावरून तेरी हा शब्द मराठीत आला असावा. पालघर, रायगड, रत्नागिरी या भागात हा शब्द आढळून येतो. पात्रा हा शब्द गुजरातीमध्ये आढळून येतो. त्यावरून महाराष्ट्रात गुजरात राज्याला लागून असलेल्या प्रदेशात पात्रा हा शब्द आढळतो.