नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. शेवग्याच्या शेंगांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे करतात. ‘शेवगा’ या संकल्पनेकरता मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य आढळले आहे. शेवगा, शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची शेंग, शेवगा शेंगो, शेवगान शेंगो, शेगू, शेंगा, शेवगाना शेंगा, मुंगना, मुंगणा , मुंगन्याच्या शेंगा, मुंगन्या का शेंगान, मुगुनीच्या शेंगा, मुंगाफल्ली, मुंगफळी, शेकटं, शेगट, सेगटानी सेंग, शंगफल्ली, शेकटाची शेंग, शेकटाच्या शेंगा, शेगुल, शेगलाच्या शेंगा, शेगुल की फल्ली, डांबा, डांबं, डांबाच्या शेंगा, हेकटा हेंगा, हेकटा हिंगो, हिंगा, हिगटा, शोवगा, नुंगीची शेंगा, हेग्वा पापडी, हेंग्या, हाडग्याची शेंग, बरबटीन, शेवगो, शिवंगा, बरबडी, मुरा, लवंगीशेंगा, शेवरी, लांबशेंग, खरसिंगाच्या शेंगा, बडग्याची शेंग, बुगना, उडियाफुल, गोडशेंगा इ. वरीलपैकी मूळ शब्द शेवगा आणि त्याचे ध्वन्यात्मक भेद जवळपास सर्वच जिल्ह्यात सापडतात. धोंगडे (२०१३: ६२) नुसार डांबे व शेकटा हे शब्द विशिष्ट केंद्रात माहित आहेत तर मुंगण्याच्या शेंगा हा शब्द नागपूर व चंद्रपूर या मर्यादित केंद्रात आढळून आल्याची नोंद केलेली आहे. सदर सर्वेक्षणात मुंगण्याच्या शेंगा या भंडारा व गोंदिया येथे त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यामधील औरंगाबाद तालुक्यातील भिकापूर-नायगाव येथे, जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील धावेडी या गावात आणि नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात मारेगाव(खालचे) येथे माहित असल्याचे दिसून आले. हिंदी भाषेमध्ये शेवग्याकरता असणार्या मुंगना या शब्दाशी साधर्म्य असणारा हा शब्द परभणी, वाशिम, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भौगोलिक प्रदेशात रूळलेला दिसतो. शेकटा हा शब्द मुख्यत्वे करून रायगड व पालघर जिल्ह्यात वापरात असून रत्नागिरीच्या खेड व दापोली तालुक्यात आढळतो. शेकटा ऐवजी हेकटा असे ध्वन्यात्मक परिवर्तन ठाणे, अमरावती, नाशिक, रत्नागिरी व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दिसून येते. शेगू हा शब्द नाशिक जिल्हयातील आदिवासी वस्ती जास्त असलेल्या सुरगणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत मिळाला. शेगुल हा शब्द गोव्याला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व कणकवली या तालुक्यांत आढळून आला. शेगला हा शब्द प्रामुख्याने कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर रायगड जिल्ह्यातील मुरूड व महाड या तालुक्यात आढळून आला. डांब हा शब्द केवळ रत्नागिरी जिल्ह्यात वापरात आहे असे दिसून आले. उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातील कसगी येथे नुग्गी हा शब्द मिळाला. सदर भौगोलिक प्रदेश हा कर्नाटक राज्याला लागून असल्याने कन्नड भाषेमध्ये शेवग्याकरता असणार्या नुग्गे शब्दाशी साधर्म्य सांगणारा हा शब्द आहे.