नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘नवरा-बायको’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात खूप वैविध्य आढळून आले आहे. नवरा-बायको, पती-पत्नी, मालक-मालकीन, कारभारी-कारभारीन, घो-बायल, घरवाला-घरवाली, धनी-अर्धांगीनी, होडास-होडीस, मरद-औरत, मिया-बिबी, मिस्टर-मिसेस, हजबंड-वाइफ इ. शब्द आढळले. याशिवाय नवरा या संकल्पनेसाठी दादला, दाद्या, लाडा, बायलस, साज़न, साहेब, यज़मान, वर, बवा, माटी इ. तर बायको या संकल्पनेसाठी लक्शीमी, बिर्हाड, कुटुंब, मंडळी, नवळी, घोळनी, लुगाई इ. शब्द आढळले. या संकल्पनेसाठी मिळालेले शब्द विस्ताराने पुढे पाहू. नवरा हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. या शब्दाचे नवरो, नवरास, न्हवरा, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच पती हा शब्दही संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. घो हा शब्द सिंधुदुर्गात जास्त प्रमाणात आढळून येतो. त्याचबरोबर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाजात आणि रायगड जिल्ह्यात हा शब्द तुरळक प्रमाणात दिसून येतो. याशिवाय हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेल्या राधानगरी तालुक्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे घोव, गव, घोस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. दादला हा शब्द सांगली जिल्ह्यात मिळाला असून धाल्ला हे त्याचे ध्वनिवैविध्य आढळून आले आहे. दाद्या हा शब्द पालघर जिल्ह्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात मिळाला आहे. मालक हा शब्द पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळून येतो. हा शब्द महिला जास्त प्रमाणात वापरताना दिसतात. कारभारी हा शब्द रत्नागिरी आणि परभणी जिल्ह्यामध्ये दिसून येतो. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे कारभारी, कारबारी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. घरवाला हा शब्द भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येतो. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, अहमदनगर, धुळे, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. महिलांमध्ये हा शब्द वापरण्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. या शब्दाचे घरवाले, घरवालो, घरना माणूस, घरवाला, घरचा माणूस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. धनी हा शब्द सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, हिंगोली, औरंगाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. महिला हा शब्द जास्त वापरतात. या शब्दाचे धनी, धळी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. लाडा/लाडो हा शब्द धुळे जिल्ह्यातील पावरा, नागपूर जिल्ह्यात मरार आणि अमरावती जिल्ह्यात लाडशी ही मातृभाषा असणार्या बौद्ध समाजात तुरळक प्रमाणात वापरला गेला आहे. होडास हा शब्द रायगड, ठाणे आणि पुण्याच्या मुळशी तालुक्यात कातकरी समाजात आढळून येतो. या शब्दाचे वहडास, वोडास, वडास, ओहोडास, ओढास इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. मिश्टर हा शब्द सांगली, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, परभणी, नाशिक, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, या जिल्ह्यात प्रामुख्याने स्त्रिया वापरताना दिसतात. या शब्दाचे मिस्टर, मिस्टेर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. हजबंड या शब्दाचा वापर अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून येतो. मरद हा शब्द धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील चांभार समाजात आढळून येतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजात मर्द, शोअर, मिया हे शब्द वापरले गेले आहेत. माटी हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल समाजात, धुळे जिल्ह्यातील पावरा स, पालघर जिल्ह्यात धोडिया समाजात तुरळक प्रमाणात दिसून येतो. साज़न हा शब्द कोल्हापूर जिल्ह्यात, साना हा शब्द अमरावती जिल्ह्यातील कोरकू समाजात तर साहेब हा शब्द गडचिरोलीतील गोंड समाजात तुरळक प्रमाणात मिळाला आहे. तसेच बवा हा शब्द धुळे जिल्ह्यात, बुवा हा शब्द पालघर जिल्ह्यात तर बांडगा हा शब्द नाशिक जिल्ह्यात सापडला आहे. त्याचबरोबर मुजो हा शब्द गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाजात तर यज़मान हा शब्द भंडारा जिल्ह्यात ब्राम्हण समाजात दिसून येतो. नंदुरबार जिल्ह्यातील वळवी समाजात कोवाळ हा शब्द तर गुजर समाजात वराजो हा शब्द दिसून येतो. बायको हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. या शब्दाचे बायकू हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच पत्नी हा शब्दही संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. मात्र पत्नी या शब्दाच्या वापराचे प्रमाण बायको या शब्दाच्या वापरापेक्षा कमी आहे. मालकीन हा शब्द मराठवाडा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येतो. उर्वरित महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. तर लातूर, सातारा, नांदेड, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातही हा शब्द मिळाला आहे. या शब्दाचे मालकीन, मालकीनबाई इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कारभारीन हा शब्द परभणी, हिंगोली, भंडारा या जिल्ह्यात दिसून येतो. तर बिर्हाड आणि कुटुंब हे शब्द कोल्हापूरात आढळून आले आहेत. घरवाली हा शब्द भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, पालघर ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तर गडचिरोली, अमरावती, धुळे, हिंगोली, अहमदनगर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर ह्या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळून येतो. नाशिक व नागपूर जिल्ह्यांतही हा शब्द मिळाला आहे. या शब्दाचे घरकरीन, घरवालीन, घरनीबाई, घरवाली, घरचे, घरमंत्री, गरवाली इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बाई हा शब्द नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात अधिक आढळून येतो असे दिसते. तर रायगड, रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक आढळून येतो. या शब्दाचे बायी, बाया हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बायेल हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. बईयर, बय्यर ह्या शब्दांचा वापर नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील चांभार समाजात दिसून आला आहे. बायलस, बायस हे शब्द ठाणे, रायगड जिल्ह्यांत दिसून आले आहेत. अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूर, रायगड या जिल्ह्यात क्वचितच नवरी हा शब्द आढळून येतो. या शब्दाचे नवळी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. मंडळी हा शब्द पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. लक्ष्मी हा शब्द परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती ह्या जिल्ह्यात दिसून येतो. तर सौभाग्यवती आणि धर्मपत्नी हे शब्द अनुक्रमे भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ब्राम्हण समाजात आढळून आले आहेत. अर्धांगिनी हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यातील भंडारी समाजात मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मिसेस हा शब्द तुरळक प्रमाणात आढळतो. तर फॅमिली हा शब्द सातारा जिल्ह्यात दिसून येतो. वाइफ हा शब्द भंडारा जिल्ह्यात मिळाला आहे. बिबी हा शब्द सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजात आढळून येतो. याचे बिवी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. औरत हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाजात तर मुलार हा शब्द रायगड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात आढळून येतो. या शब्दाचे मुल्यान, मुलॅर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. लुगाई हा शब्द नागपूर जिह्यात कलार, चांभार, मरार समाजात आढळून येतो. तर जळगावमध्ये तेली समाजात दिसून येतो. या शब्दाचे लुगईन, लुगनी, लोगलीन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. होडीस हा शब्द रायगड आणि पुण्यातील मुळशी तालुक्यातील कातकरी समाजात आढळून येतो. या शब्दाचे ओहोडीस हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. डोहाडी हा शब्द पालघर जिल्ह्यातील धोदी समाजात तर कोवाडी हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील वळवी समाजात मिळाला आहे. घोळनी हा शब्द यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा व थय हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल समाजात आढळून आला आहे. तसेच नंदुरबारमधील गुजर समाजात वराजो हा शब्द सांगितला आहे.