नवऱ्याचा मामा या नात्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मामा, काका, सासरे, मामा सासरे, मावळे सासरे, घोवाचे मामा, बाप, चुलता असे शब्दवैविध्य सापडले आहे. भारतीय विवाह व्यवस्थेमध्ये असणाऱ्या विवाहविषयक संकेतांवर या नातेवाचक शब्दांवरून प्रकर्षाने प्रकाश पडतो. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाचा कोणाशी विवाह होऊ शकतो याबाबतीत दक्षिण भारतातील राज्य आणि मध्य आणि उत्तर भारतातील राज्य यांमध्ये संकेतभेद आहे. दक्षिणेकडील बहुतांशी प्रदेशांमध्ये मामाच्या मुलीशी/मुलाशी आत्याच्या मुलाचा/मुलीचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे सख्या मामाला मुलगी देण्याची प्रथाही काही ठिकाणी आहे. अशाप्रसंगी मामा म्हणून ज्यांची ओळख करून दिली जाईल ते कोणीही उपयोजित वर म्हणून चालू शकतात. ज्या ठिकाणी मामाशी लग्न होऊ शकते तेथे किंवा जेथे आत्याच्या मुलाशी लग्न झाले आहे अशा ठिकाणी नवऱ्याचा मामा या नात्यासाठी शक्यतो काका, बाप, चुलता हे शब्द वापरलेले दिसतात. सोलापूर, लातूर, नांदेड, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भारताला लागून असणाऱ्या प्रदेशांमधील काही कुटुंबांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील काही कुटुंबांमध्येही हे वैविध्य दिसते. ज्या कुटुंबात अशाप्रकारच्या नात्याला मान्यता नाही त्यांच्याकडे या नात्यासाठी मामा, सासरे, मामासासरे, मावले सासरे अशाप्रकारचे शब्द वापरलेले दिसतात. बहुतांश महाराष्ट्रामध्ये ह्या शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणावर आढळतो.