मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

पुढे

डाउनलोड पुढे

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

एखादी व्यक्ती अथवा ठिकाण यांच्या स्थिर जागेचा विचार करता त्यांच्या ‘मुखासमोरील दिशे’च्या निर्देशाकरता सदर सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील मराठीच्या विविध बोलींमधे खालीलप्रमाणे वैविध्य दिसून येते.

मुखासमोरील दिशा या संकल्पनेसाठी समोर, समुर, संबुर, संबुरं, संबोर, सामोर, सामुरी, सोमोर, पुढे, पुढं, पुडं, पुरं, पुडो, पुडे, पुडी, फुडं, फुढी, फुढे, पुळ्हे, पुढ्यात, पुड्यात, पु-हयात, पुढल्या, सामने, सामनी, म्होरं, म्होरा, म्होरी, म्हुरी, मोहरं, आगं, अगाड, आगाडी, आग, आगो, मुन्ने, द्येआंत, आत्तं, तोंडापुडं, तोंडापुढे, तोंडाला, मुंदारी, हुंबूर, हांबूक, सुद्या, सन्मुख, आपोजिट, नजिक, स्टेट, सामन्यावर, समंग, इत्यादी शब्दांचा वापर दिसून येतो.

महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये समोर व पुढे हे शब्द आढळून येतात. समोर या शब्दाचे समोर, समुर, संबुर, हुंबूर, संबुरं, संबोर, सामोर, सामुरी, सोमोर हे ध्वन्यात्मक भेदही आढळून आले. तर पुढे या शब्दाचे पुढं, पुडं, पुरं, पुडो, पुडे, पुडी, फुडं, फुढी, फुढे, पुळ्हे, पुढ्यात, पुड्यात, पु-हयात, पुढल्या हे ध्वन्यात्मक भेद आढळून आले. वर नमूद केलेल्या शब्दांपैकी सामने हा शब्द बुलढाणा, हिंगोली, परभणी, वाशिम वगळता महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मर्यादित स्वरूपात आढळून येतो. गोंदिया आणि भंडारा येथे प्रामुख्याने सामने हा शब्द प्रचलित आहे.

म्होरं या शब्दाचे भौगोलिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका, पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी हे तालुके, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व सांगोले तालुका, सातारा जिल्ह्यातील वाई तालुका, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका, रायगड जिल्ह्यातील कर्जत, अलिबाग, रोहा व मुरूड हे तालुके, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका, नांदेड जिल्ह्यातील काही भागात, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील तांदलवाडी येथे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात, तसेच पुणे जिल्ह्यातही म्होरं या शब्दाचा वापर सर्रास होताना दिसतो. त्याचप्रमाणे पालघर आणि नंदुरबार या आदिवासी जिल्हयातील भौगोलिकदृष्ट्या गुजरात राज्याला जोडून असलेल्या भागात अगाड व आगाडी हे शब्द आढळले आहेत. आगं हा शब्द धुळयातील सोनगीर व जळगाव जिल्हयातील रावेर तालुक्यात निरूळ या गावी प्रचारात असल्याचे दिसते. तर मुन्ने हा शब्द यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यातील राजगोंड समाजात आढळून येतो. द्येआंत तसेच आत्तं हे शब्द रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई गावातील पोर्तुगीज भाषकांच्यात वापरलेला दिसतो. तोंडापुढं हा शब्द नाशिकच्या आदिवासीबहुल गावांमध्ये तर तोंडाला हा शब्द लातूर येथील उद्गीर तालुक्यातील मलकापूर गावात आढळून येतो.

संबुर हा शब्द नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील काठीपाडा येथे, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात तसेच बीड आणि परभणी जिल्ह्यात आढळून आला आहे.