या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. भाजी भोपळा,पारोसं दोडकं, घोसावळे, हजारी दोडका, दुधी दोडका, पारोशी, शिराळं, तवशी, घी तुरई, घोसावी दोडक्या, माटे घोसाळा, गिलका, गलको, चोपडा, चोपडा दोडका, तुपी दोडका, तुराई, टिपरीकाई, गलगले, गिलगिला दोडका, चिकनं दोडकं, तेल दोडका,चोपडी तुरै, चिकनो गिलको, शिबी, पारोसा भोपळा, चिकनी तुरै, सरकारी दोडका, हरसोला, लंबा दोडका, सादे दोडके, भजीचे दोडके, इ. घोसाळ्याच्या बाबतीत एक महत्वाची नोंद म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ शाहुवाडी (रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेला तालुका) आणि चंदगड (सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेला तालुका) या ठिकाणी ‘घोसावळे’ हा शब्द माहित आहे. बाकी तालुक्यांमध्ये, ‘पारोसं’/ ‘पारोसं दोडकं’ हे शब्द प्रामुख्याने मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने ‘घोसाळे’ आणि ‘पारोसं’, सिंधुदुर्गामध्ये ‘तवशा’ आणि घोसाळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळ्यामध्ये केवळ ‘गिलका’, नांदेड- लातूरमध्ये प्रामुख्याने ‘तुपदोडका’, सोलापूरमध्ये ‘टिपरीकाई’ हा कन्नड भाषेतील शब्द तर नागपूरमध्ये ‘तेलदोडके’ आणि ‘गिलगिले’ हे शब्द प्रामुख्याने आढळतात.