नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. घोसाळे’ हा उत्तर आफ्रिका आणि आशिया खंडांमधील उष्ण कटिबंधीय प्रदेशांत उगवणारा एक वेल आहे. याला काकडीसारखी दंडगोलाकार, गुळगुळीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून स्वयंपाकात उपयोग होतो, तसेच याची वाळलेली फळे आंघोळीसाठी नैसर्गिक घासणी म्हणून वापरली जातात. या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात घोसाळे, गिलके, च़ोपडा दोडका, पारोसा दोडका, गलगले, तेल दोडका, तुप दोडके, तुरई, टिपरीकय, चिकनी तुरई, दुधी दोडका, तवशा, शिबी, सातपुता, हरसुले, टेंडुळे, शिराळं, इ. शब्द वापरले जातात. याशिवाय आणखी काही विशेषणांचा वापर करून शब्द तयार केले जातात. त्याविषयी विस्ताराने माहिती पुढीलप्रमाणे. घोसाळे हा शब्द पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तर बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक आणि बुलढाणा या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दासाठी घोसावळं, घोसाळं, घोसाळे, घ्वासाळे, घोसाळा, घोसाला, घोसाळु, घोसावी, घोसाले, घोशाळे, घोसाळी, गोसावळा, घोसावला, गोसावळी, गोशेळा, गोसावळे, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. गिलके हा शब्द प्रामुख्याने खानदेशात आढळून येतो. तसेच नाशिक, पालघर, औरंगाबाद, जालना, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातही आढळून येतो. तर अहमदनगर, सोलापूर, यवतमाळ, परभणी, नागपूर, अकोला, भंडारा या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात सापडतो. या शब्दाचे गिलकं, गिलका, गिलकी, गलका, गलको, गलकं, गिलके, गिलको, गिलकिया इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. च़ोपडा दोडका हा शब्द पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजात जास्त आढळून येतो. तसेच औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यात आढळतो. या शब्दाचे चोपडा दोडका, सोपडा दोडका च़ोपडं दोडकं, च़ोपडं, चोपडे दोडके, चोपडी तुरई, च़ोपळा दोडका, च़ोपडा भोपळा, च़ोपडी तोरी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. घोसाळे दिसायला चोपडे असते, गुळगुळीत असते त्यामुळे चोपडा आणि चिकना ही विशेषणे दिसून येतात. पारोसा दोडका हा शब्द रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. तर सिंधुदुर्ग, अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती येथे तुरळक प्रमाणात आढळतो. पारुसं, पारोसा, पारोशी, पारोशे, पारवसा, पारुसा, पारशी, पारोसा भोपळा, पारोसं, फारसी दोडका, पारसा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. गलगले हा शब्द नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, आणि अमरावती या जिल्ह्यात आढळून येतो. या शब्दाचे गलगले, गलगला, गलगलं, गलगली, गिलगिला, गलगल्या इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पश्चिम-मध्य भारतात विशेषत: मध्य प्रदेशात सदर भाजीकरता गिल्की हा शब्द वापरला जातो. त्याचा प्रादेशिक प्रभाव या शब्दावर दिसून येतो. तेल दोडका हा शब्द यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आनि गडचिरोली या जिल्ह्यात आढळून येतो. घोसाळे वरून तेलकट दिसते म्हणून त्याला तेल दोडका म्हटले जाते. या शब्दाचे तेली दोडका, तेलीक दोडका, तेल्या दोडका इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तुप दोडके हा शब्द नांदेड आणि लातूर या दोनच जिल्ह्यात आढळून येतो. घोसाळा दिसायला तुपकट असतो म्हणून तुप दोडका म्हटले जाते. तुरई हा शब्द गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी समाजात आढळून येतो. तसेच यवतमाळ, नांदेड, वाशिम या जिल्ह्यात बंजारा आणि सोलापूर, बीड या जिल्ह्यातील मुस्लिम समाजात तुरळक प्रमाणात आढळून येतो. उर्वरीत महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यात क्वचितच हा शब्द आढळतो. या शब्दाचे तोरई, तुरे, तुरळी, तोरी, तुरई, तुरी, तोर्या इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. उत्तर भारतातील हिंदी भाषिक प्रदेशांत सदर भाजीकरता तोरी हा शब्द वापरला जातो. त्याचा प्रादेशिक प्रभाव या शब्दावर दिसून येतो. टिपरीकय हा शब्द सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मराठीसोबतच कन्नड भाषा बोलता येणार्या भाषकांत आढळून आला आहे. यामध्ये प्रामुख्याने, लिंगायत, हरिजन, बौद्ध, महार, मातंग, चांभार या समाजांचे प्रमाण जास्त आहे. तर धनगर, मराठा, कोळी या समाजातही तुरळक प्रमाणात सापडला आहे. या शब्दाचे टिपरीके, तिपरीके, त्रिपीके, टिपरीका, टिपरी, तिपरीकय, टिपरीकय इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. कर्नाटक राज्यात या भाजीला टिपरीकाय हे नाव आहे. त्यामुळे प्रादेशिक प्रभावातून कर्नाटक राज्याला सीमा लागून असणार्या प्रदेशांत हा शब्द मिळाला असावा. चिकनी तुरई हा शब्द औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. घोसाळ्याचे वरचे अवरन गुळगुळीत असते त्यामुळे त्याला चिकना/चिकनी म्हटले जाते. या शब्दाचे चिकनो गिलको, चिकनी, चिकनी तुरं, चिकनी तुरई, चिकना गिळकं, च़िकनी तुरई, च़िकना तोटके, चिकन तोरी, चिक्कन दोडका ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. दुधी दोडका हा शब्द कोल्हापूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील महार आणि मातंग समाजात वापरला गेला आहे. या शब्दाचे दुद दोडका, दुदी दोडके इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. तवशा हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे तवशा, तोवशी, टवसा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. शिबी हा शब्द रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बापळे गावात मिळाला असून सातपुता हा शब्द रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजात सापडला आहे. घोसाळा ही भाजी दोडका-वर्गीय असल्यामुळे घोसाळा या भाजीसाठी काही प्रमाणात ‘दोडका’ हा शब्द आढळून येतो. मात्र केवळ दोडका हा शब्द क्वचितच आढळून येतो. दोडका शब्दाबरोबर इतर विशेषणे लावून वेगवेगळे शब्द तयार होतात उदा. - गावरान, सरकारी, गोड, लंबे, लंबा, पांढरा, नरम, साधा, देव, बगर शिर्याचा, इ. विशेषणे वापरून शब्द तयार केले जातात. हे शब्द प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात आढळतात.