नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. महाराष्ट्रात ‘नव-याची आई’ आणि ‘बायकोची आई’ या दोन्ही संकल्पनांसाठी सासू हाच नातेवाचक शब्द सर्व जिल्ह्यांत आढळून येतो. त्याचबरोबर या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये पुढीलप्रमाणे वैविध्य आढळले आहे. सासू, सासूबाई, आत्या, आत्याबाई, आत्ती, सास, सासूस, मामी, हाऊ, हावो, फुई, हावडी इ. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाचा कोणाशी विवाह होऊ शकतो याबाबतीत दक्षिण भारतातील राज्य आणि मध्य आणि उत्तर भारतातील राज्य यांमध्ये संकेतभेद आहे. दक्षिणेकडील बहुतांशी प्रदेशांमध्ये मामाच्या मुलीशी/मुलाशी आत्याच्या मुलाचा/मुलीचा विवाह करण्याची प्रथा आहे. अशाप्रसंगी नव-याची आई आणि बायकोची आई या दोन्ही संकल्पनांसाठी वापरल्या जाणार्या शब्दांवरून भारतीय विवाह संस्थेत असणार्या विवाहविषयक संकेतांवर प्रकर्षाने प्रकाश पडतो. कर्वे (१९५३: १६५) यात नोंदविलेल्या निरीक्षणानुसार ‘सासू’ हा शब्द संस्कृतोद्भव असून ‘मामी’ हा आईच्या भावाच्या बायकोसाठी असलेला शब्द काही भौगोलिक प्रदेशात नवर्याच्या आईसाठी वापरला जात असल्याचे सदर सर्वेक्षणातही आढळून आले आहे. त्याचबरोबर सदर सर्वेक्षणात मिळालेल्या माहितीनुसार ‘मामी’ हा शब्द नवर्याच्या आईकरताच नव्हे तर बायकोच्या आईसाठीही वापरात असलेले आढळून आले. त्याचप्रमाणे ‘आत्या’ हा वडिलांच्या बहिणीसाठी वापरला जाणारा शब्द‘सासू’ या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून महाराष्ट्राच्या काही भागात वापरात आहे. ‘फुई’ हा शब्द रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावात व लातूर जिल्ह्यातील मानेजवळगा गावात मिळाला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामधील आदिवासी पट्टयात या शब्दाचे क्षेत्र दिसून येते.