भारतीय विवाह व्यवस्थेमध्ये असणाऱ्या विवाहविषयक संकेतांवर या नातेवाचक शब्दांवरून प्रकर्षाने प्रकाश पडतो. रक्ताच्या नात्यामध्ये कोणाचा कोणाशी विवाह होऊ शकतो याबाबतीत दक्षिण भारतातील राज्य आणि मध्य आणि उत्तर भारतातील राज्य यांमध्ये संकेतभेद आहे. दक्षिणेकडील बहुतांशी प्रदेशांमध्ये मामाच्या मुलीशी/मुलाशी आत्याच्या मुलाचा/मुलीचा विवाह करण्याची प्रथा आहे. काही वेळा सख्ख्या मामाला मुलगी देण्याची प्रथा आहे. अशा वेळी भाचा-भाची यांची ओळख करून देतानाच जावई किंवा सून हे शब्द वापरले जातात. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचा प्रभाव नातेवाचक शब्दांमध्ये दिसून येतो. हे निरीक्षण ‘Kinship organization in India’ (१९५३) या डॉ. इरावती कर्वे (१९६५, दुसरी आवृत्ती) यांच्या मानववंशशास्त्राधारित ग्रंथातही नोंदवले आहे. त्यांनी याविषयी सविस्तर विवेचनही केले आहे. सदर सर्वेक्षणातही अशाच प्रकारचे वैविध्य आढळून आले आहे. भाचा या नात्यासाठी भाच़ा, भाच़ो, भांजा, भहिनिच़ं चोडो, भाचा, भासा, भासो, भासज़ावाई, भासरं, वाडबास, भासवा, भाल्या, ज़मास, ज़ावास, भाच़ास, बास्सा, ज़वाई, ज़ावी हे शब्दवैविध्य आढळून आले. यापैकी जावई या अर्थाचे नातेदर्शक शब्द पालघर जिल्ह्यातील वसई, जव्हार आणि तलासरी या तालुक्यांमध्ये वाडवळ, कुकणा, वारली या समूहांतील भाषकांनी नोंदवला आहे. त्याचप्रमाणे भाची या नात्यासाठी भाची, बाशी, भाशी, भावायो पोही, बाहानेज, भाशिस, सुन, सुनस इत्यादी शब्दवैविध्य आढळून आले. यापैकी सून या अर्थाचे शब्द उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुका, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील काही भाषकांनी नोंदवले आहेत.