मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

शिराळे / दोडके

डाउनलोड शिराळे, दोडके

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘शिराळे’/’दोडके’ या संकल्पनेसाठी मराठी भाषेतील विविध बोलींमध्ये खालीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे.

दोडका हा शब्द त्याच्या ध्वन्यात्मक भेदांसह महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वापरला जातो. याचबरोबर शिराळं आणि तत्सम शब्द कोकणातील रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुका, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, सुरगणा तालुका आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये आढळतो. शिरंच़ा दोडका, सिर दोडका आणि तत्सम शब्द जालना आणि बीड जिल्ह्यात तसेच नागपूरमधील भिवापूर, वर्ध्यामधील हिंगणघाट, सेलू, बुलढाणामधील बुलडाणा, औरंगाबादमधील पैठण, यवतमाळमधील घाटंजी, नेर, अमरावतीमधील अमरावती, वरूड, दर्यापूर, परभणीमधील पालम, हिंगोलीमधील हिंगोली, कलमनुरी, अकोलामधील अकोला, वाशिममधील कारंजा, रिसोड, गडचिरोलीमधील, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील चंद्रपूर आणि राजुरा तालुक्यामध्ये आढळतो.

शिरीवाला दोडका, शिऱ्यावालं दोडकं आणि तत्सम शब्द त्र्यंबकेश्वर तालुका (जि. नाशिक), नरखेड, नागपूर तालुके (जि. नागपूर), हिंगणघाट, सेलू तालुके (जि. वर्धा), दर्यापूर तालुका (जि. अमरावती), परभणी तालुका (जि. परभणी), कारंजा तालुका (जि. वाशिम), गडचिरोली (जि. गडचिरोली), चंद्रपूर आणि राजुरा तालुके (जि. चंद्रपूर) येथे वापरलेला दिसतो.

तोरई आणि तत्सम शब्द नागपूरमधील रामटेक, औरंगाबादमधील वैजापूर, सोयगाव, नांदेडमधील नांदेड, किनवट, यवतमाळमधील नेर, अमरावतीमधील धारणी, वाशिममधील वाशिम, भंडार्‍यामधील भंडारा, तुमसर, गोंदियामधील गोंदिया आणि गडचिरोलीमधील कोरची तालुक्यात वापरलेले दिसतात.

खिशी दोडका आणि तत्सम शब्द हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात वापरले जातात.

धारेवाला दोडका, धाराळी तोरी आणि तत्सम शब्द प्रामुख्याने विदर्भातील नागपूरमधील येरला, नरखेड तालुका, वर्ध्यामधील हिंगणघाट, सेलू, आष्टी, अमरावतीमधील अमरावती, वरुड आणि वाशिममधील वाशिम तालुक्यामध्ये वापरलेला दिसतो.

खरबडा दोडका, खरबडी तुरई, खडी तुरई आणि खडमडीत दोडकंआणि तत्सम शब्द अनुक्रमे औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुका आणि नांदेड जिल्ह्यातील किंनवट तालुक्यात वापरतात.

चच़री आणि च़ोच़ंरो गिलको हे शब्द फक्त नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात आढळतात.

झुंकी शब्द गोंदिया जिल्ह्यातील फक्त गोंदिया तालुक्यात आढळला आहे.

तवसा हा शब्द सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यामध्ये सापडला आहे.

याचप्रमाणे नशा गिल्कू आणि नेष्ट्या गिलक्या हे शब्द जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ठराविक परिसरात वापरतात.

यासारखेच दोडी, दडकोरा हे शब्द अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यामध्ये वापरतात.काच कोईरी हा शब्द अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये वापरात आहे.

या फळभाजीवर उभ्या शिरा असल्याने अनेक भागात शिराळं, शिरंच़ा दोडका, शिरीवाला दोडका म्हणून ओळखले जाते. अनेक ठिकाणी या फळभाजीवर असणार्‍या शिरा ह्या धार काढल्यासारख्या असल्याने धार दोडका म्हणूनही ओळखतात. तसेच अनेक ठिकाणी या फळ भाजीची किसून भाजी केली जाते यावरुन खिस दोडका, खिसी दोडका, किशा दोडका इ. म्हणूनही या संकल्पनेला ओळखतात.