एखाद्या वस्तूचा आकार, उंची किंवा वय यांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गुणवाचक विशेषणांपैकी लहान-मोठा या संकल्पनांकरिता पुढीलप्रमाणे शब्दवैविध्य आढळून येते. लहान या संकल्पनेसाठी छोटा, बारका, लहान, बारीक, लान, न्हान, आकुड, गिड्डं, धाकटो, छोटो, बारको, धाकला, लानो, सोटा, कमी, इउलुसा, नानलो, लहानु, हानो, दपकट, धाकलुसा, सोटाला, टीमुकला, चिटूकला इ. तर मोठा या संकल्पनेसाठी मोठा, मोटा, दांडगा, मोठो, तगडा, बोठो, जाम, माटी, थोरला, बलाढ्य, जाडा, अवाढव्य, वरजूर, मजबूत, धिपाट, धिप्पाड, ठोक, भक्कम इ. यापैकी ‘धाकटो’, ‘छोटो’, ‘बारको’ - ‘मोठो’ हे शब्द मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आढळतात. ‘धाकला’-’थोरला’ हे शब्द प्रामुख्याने धुळे, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत दिसून येतात. यातील ‘छोटा’, ‘बारका’, ‘लहान’, ‘बारीक’, ‘लान’, ‘न्हान’ हे आकारदर्शक, ‘आकुड’, ‘गिड्डं’ हे उंचीचे दर्शक तर ‘तगडा’, ‘भक्कम’, ‘मजबूत’, ‘धिप्पाड’ हे सामर्थ्यदर्शक शब्द असल्याचे दिसून येते. एखाद्या वस्तूच्या आकारमानावरून त्याच्या ताकदीची, वयाची कल्पना करण्याची लोकांची प्रवृत्ती या विशेषणांवरून लक्षात येते.