मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

मुलीची सासू आणि मुलाची सासू मुलाचा सासराआणि मुलीचा सासरा

डाउनलोड मुलीची सासू आणि मुलाची सासू मुलाचा सासरा आणि मुलीचा सासरा

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

‘मुलीची सासू’ आणि ‘मुलाची सासू’ तसेच ‘मुलीचे सासरे’ आणि ‘मुलाचे सासरे’ या संकल्पनांसाठी महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशामध्ये मिळणारे शब्द पुढे विस्ताराने पाहू.

‘महाराष्ट्राचा भाषिक नकाशा: पूर्वतयारी’ (२०१३) या पूर्वी झालेल्या भाषिक सर्वेक्षणामध्ये व्याही आणि विहीण या नातेवाचक शब्दांसाठी बोलींमध्ये फार थोडे वैविध्य असल्याची नोंद आहे. व्याही शब्दासाठी ईवाई/विवाई इतकेच वैविध्य तर विहीण शब्दासाठी कोणत्याही वैविध्याची नोंद नाही. सदर सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. यीन, विहीन, इन, याहीन, यीहीन, समधिन, येहानीस, सोयरी, विहानिस इ. शब्दवैविध्य आढळते. यांपैकी याहीन, यीहीन हे शब्द प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या भौगोलिक प्रदेशात, तर येहानीस, विहानिस हे शब्द कातकरी समाजात आढळून येतात. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत सोयरी हा शब्द प्रामुख्याने दिसून येतो. अन्य सर्व प्रदेशांमध्ये यीन, विहीन, वेन, विन अशाप्रकारचे ध्वन्यात्मक भेद आढळतात. व्याही शब्दाकरता ईवाई, इवाय, व्याई, युवाय, सोयरे, विहीस, यहानास, विहा इ. शब्दवैविध्य आढळते. यापैकी रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सोयरे आणि धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तसेच अन्य जिल्ह्यांमधील कातकरी समाजामध्ये विहीस, यहानास, विहा हे शब्द आढळतात.

‘मुलाची सासू’ आणि ‘मुलीची सासू’ या दोन संकल्पनांसाठी समान शब्द आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने विहिण, याहीन, येहानीस, येन, ईन, हिन, समधन, सोयरी, पाहुनी इ. शब्द येतात. विहिण हा शब्द महाराष्ट्रात अकोला, परभणी, हिंगोली हे जिल्हे वगळुन इतर जिल्ह्यात आढळतो. विदर्भात तुरळक प्रमाणात आढळतो. विहिन, विहिण, विहिनबाय, विहीनबाई, व्याही, विनबाई, विनी, व्हिन, विन, व्हिनबाई, वेनबाई, विनबाय, व्याहीन, वेवाण, व्याईन, व्यायनी, विहा, वेहानी, वेहीनी, विहिनी, वेव्हाईन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. ईवाईन हा शब्द भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यात आढळतो. अपवादात्मक स्वरूपात सांगली जिल्ह्यात आढळला आहे. या शब्दाचे ध्वन्यात्मक वैविध्य ईवायनी, ईवाईनी, ईवायीन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. याहीन हा शब्द प्रामुख्याने पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, या जिल्ह्यात आढळतो. या शब्दाचे यिहीन, यिहीनी, ययीन, यहीन, यायीन, येहीनी, येयीन, येहीन, याहनी, यायनी, याहीनी, याईन, याईनी, यायेन, ह्याईन, येणीन, याहीन, यीहीन, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

येहानीस हा शब्द पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यात प्रामुख्याने वारली, कातकरी, भिल्ल, कोकणा, ठाकूर, महादेव कोळी इ. आदिवासी समाजात आढळून येतो. या शब्दाचे इहानीस, इनीस, यानीस, याहनीस, याहीनीस, यायीनीस, व्याह्यानीस, विहायनीस, वेव्हानीस, इहायनीस, येहीनीस, याहानीस, येहानीस, विहास, विहानीस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

येन हा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यात दिसून येतो. या शब्दाचे येनी, वेन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. नंदुरबार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ईन हा शब्द आढळतो. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात दिसून येतो. तसेच गोंदिया, गडचिरोलीसह अमरावतीच्या धारणी तालुक्यातही तुरळक दिसून येतो. ईनी, यीन, ईनबाई, ईनीबाई, इनबाय, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. हिन हा शब्द लातूर आणि नांदेड जिल्ह्यात दिसून येतो. या शब्दाचे हिन, हिनबाइ, हिनी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. समधन हा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, औरंगाबाद, नाशिक, नांदेड या जिल्ह्यात मुस्लिम समाजात, नांदेड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात बंजारा समाजात, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात चांभार समाजात, अमरावतीत कोरकू, भालाई, भावसार समाजात, नागपूर जिल्ह्यात किराड, लोधी, मरार, कलाल, कोष्टी समाजात आणि गोंदिया जिल्ह्यात गोंड, पोवार, बिंजेवार, गोवारी, कवर इ. समाजात दिसून येतो. या शब्दाचे समधीन, समधन, समदी, समदीन, समदन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

सोयरी हा शब्द रायगड जिल्ह्यात आणि ठाण्याच्या अंबरनाथ तालुक्यात जास्त प्रमाणात आढळतो. तर रत्नागिरीमधील गुजर, पालघरमधील वारली समाजात, लातूर आणि नाशिकमधील महादेव कोळी समाजात, यवतमाळ आणि नागपूरमध्ये गोंड समाजात, आणि उस्मानाबादमध्ये लिंगायत समाजात हा शब्द आढळून आला आहे. सोयरी, सोयरे, सोयरस, सोयर्‍या, सोयरं, सोयरीशी, सोयरीनी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पाहुनी हा शब्द सोलापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. पाहुनी, पाहुने, पाव्हने, पावनी, पावने, पावनीबाई इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

‘मुलाचा सासरा’ आणि ‘मुलीचा सासरा’ या दोन्ही संकल्पनासांठी समान शब्द आढळून येतात असे आढळले. प्रामुख्याने व्याही, ईवाई, यहानास, समधी, सोयरे, पाहुने इ. शब्द आढळून येतात. व्याही हा शब्द कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसून येतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि आणि सांगली तर अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यातही जास्त आढळतो. गडचिरोली अकोला, जालना, परभणी, बीड हे जिल्हे वगळता उर्वरीत महाराष्ट्रात सर्वत्र तुरळक प्रमाणात आढळतो. व्याई, विवाही, विवाई हे वैविध्य विदर्भात आढळते. केवळ पालघरमध्ये वेवाय, विहा, वेवाई, हे ध्वनिवैविध्य आढळते. याही हा शब्द ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रायगड या जिल्ह्यात दिसून येतो. या शब्दाचे यायी, ययी, याही, यही, येयी, येही, याई, यई, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. ईवाई हा शब्द महाराष्ट्रात ठाणे, नंदुरबार आणि नाशिक हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच धुळे, जळगाव, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे ईवय, ईवाय, यिवाई, यिवई, यिवाय, यिवय, यिवायी, ईवयी, ईवायी, इवाही, युवाय इ.ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

यहानास हा शब्द पालघर, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यातील वारली, कातकरी, भिल्ल, महादेव कोळी, मल्हार कोळी या समाजात तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे यायीस, वेहीस, व्याहीस, इहास, विहीस, येहीस, यहानास, याहानास इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात मुस्लिम समाजात, वाशिम व नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजात, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या जिल्ह्यात चांभार समाजात आणि गडचिरोली जिल्ह्यात गोंड व कवर समाजात समधी हा शब्द दिसून येतो. तसेच भंडारा, गोंदिया, जळगाव, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी समाजात आढळतो. या शब्दाचे समदी, सोमदी, समंदी, समदीजी इ ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यात अधिक प्रमाणात सोयरे हा शब्द मिळाला आहे. पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात अतितुरळक प्रमाणात मिळाला आहे. सोयरा, सोयरं, सोयरस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पाहुने हा शब्द कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जलगाव या जिल्ह्यात अतितुरळक प्रमाणात आढळतो. यामध्ये पावने, पाव्हने, पावना, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.