नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘स्वत:चा मुलगा-मुलगी’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात पुढीलप्रमाणे वैविध्य आढळते. मुलगा-मुलगी, पोरगा-पोरगी, ल्योक-लेक, आंडोर-आंडेर, झिल-चेडु, लेकुस-लेकीस, पोशा-पोशी, सोहरा-सोहरी, बेटा-बेटी, डिकरा-डिकरी, पोयरो-पोयरी, छोरा-छोरी, चेडो-चेडु, टुरा-टुरी, पोट्टं-पोट्टी, छोकरा-छोकरी, पुतुस-धुवस, लेकरू-लेकरी, कारटं-कारटी, छोकरो-छोकरी, छोरो-छोरी, पुराय-पोरीयो, हप्पा-निगरी इ. शब्द आढळतात. तसेच याशिवाय मुलगा या संकल्पनेसाठी पोर्या, भुरगे, चिरंजीव तर मुलगी या संकल्पनेसाठी पोर, पोरी, बाय, ताराई, कुंजाई इ. शब्द दिसून येतात. लेक आणि पोर हे शब्द कमी अधिक प्रमाणात मुलगा आणि मुलगी दोन्ही संकल्पनांसाठी दिसून येतात. या शब्दांच्या वापरामध्ये असणारे भौगोलिक आणि सामाजिक वैविध्य पुढे विस्ताराने पाहू. मुलगा-मुलगी हे शब्द संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मुलासाठी मुलगो, मुलगं, मुला, मुले, मगा, मुलगे, आणि मुलगा हे तर मुलीसाठी मुली, मगलो आणि मुलगी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. मुलगो हे ध्वन्यात्मक वैविध्य मुलासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असणारा चंदगड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याला लागून असणारा राधानगरी तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवली या गावात आढळते. मगा-मगलो हे ध्वन्यात्मक वैविध्य सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजात मिळाले आहे. पोरगा-पोरगी हे शब्द संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मुलासाठी पोरगा, पोरगं, पोरगे, पोरगो, पोहा, पोर, पोरा, पॉर, प्वार, पुरय इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तर मुलीसाठी पोरगी, पुरगी, पॉरॉ, पोरघी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.पोरगोहा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच वर्धा, रायगड, आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आढळून आला आहे.पोहा हा शब्द पालघर जिल्ह्यातील धोडी आणि दुबळा या समाजातील भाषकांकडून मिळाला आहे. प्वार, प्वारगा, प्वारगो हे शब्दवैविध्य अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळून आले आहे. मुलासाठी पोर हा शब्द पालघर जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळून आला आहे. मुलासाठी पोर्या हा शब्द साधारणत: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. तर रत्नागिरी जिल्ह्यातही हा शब्द तुरळक प्रमाणात मिळाला आहे. औरंगाबाद, आणि जालना जिल्ह्यात केवळ भिल्ल समाजात, नागपूर जिल्ह्यामध्ये कोष्टी समाजात तसेच अमरावती जिल्ह्यामध्येदेखील हा शब्द दिसून आला आहे. पोर हा शब्द मुलीसाठीही दिसून येतो. रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर अहमदनगर, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून येतो. पोरी हा शब्द मुलीसाठी आढळून येतो. ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो. तर अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक आढळतो. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ल्योक-लेक हा शब्द जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यापाठोपाठ खानदेश, विदर्भ आणि कोकण या भौगोलिक क्षेत्रात तुरळक दिसून येतो. साधारणत: मोठ्या वयोगटातील लोकांनी हा शब्द जास्त प्रमाणात सांगितला आहे. मुलासाठी ल्योक, लेक, ल्येक, लेकरू, लेउक, लेकुर, ल्याक, ल्येकरू, लेवोक, लेका हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तर मुलीसाठी लेक, लेकी, ल्येक, लेकरी, लेका इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. आंडोर-आंडेर हे शब्द नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधील भिल्ल, मराठा, माळी, भोई, महार, बौद्ध, कोळी, तेली, पारधी, चांभार, मातंग, पाथरवट, गुजर इ. समाजातील भाषकांनी सांगितला आहे. अंडोर, आंडोर हे शब्द मुलासाठी तर अंडेर, आंडेर, आंड्येर, आंडरी हे मुलीसाठी मिळाले आहेत. झिल-चेडु हे शब्द मुलगा आणि मुलगी या संकल्पनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसून येतात. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेल्या चंदगड तालुक्यातील कोदाळी गावातही हे शब्द आढळून आले आहेत. झिल म्हणजे मुलगा आणि चेडु म्हणजे मुलगी या शब्दांचे झीला-चिडु, चेडो, चेडवा इ. ध्वन्यात्मक वैविध्यही आढळते. लेकुस-लेकीस हे शब्द रायगडमधील कातकरी, पालघरमधील वारली, ढोर कोळी, मल्हार कोळी, ठाकूर-क, कोकणा, नाशिकमधील महादेव कोळी आणि औरंगाबादमधील भिल्ल इ. समाजात आढळतो. मुलासाठी, लेकुस, लिख्खुस आणि मुलीसाठी लेकीस, लेकी, लिख्खिस इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. पोशा-पोशी हे शब्द पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून येतात. कातकरी, वारली, ठाकूर, कोकणा, ढोर कोळी, महादेव कोळी इ. समाजात हे शब्द आढळतात. मुलासाठी पोशा, पोशे, पोसे, पोसा, पोसॅ, पोहा, पोस्या इ. आणि मुलीसाठी पोसी, पोही, पोशी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. सोहरा-सोहरी हे शब्द रायगड, ठाणे आणि पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कातकरी समाजात दिसून येतात. सोहरा हा शब्द मुलासाठी आणि सोहरी हा शब्द मुलीसाठी दिसून येतो. याचे सोवरा-सोवरी असे ध्वन्यात्मक वैविध्यही आढळते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि वर्धा जिल्ह्यातील मुस्लिम समाजात, नंदुरबार जिल्ह्यातील चौधरी, तेली आणि भिल्ल समाजात, आणि अमरावती जिल्ह्यामधील गवळी समाजात बेटा-बेटी हे शब्द आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमधील चांभार, धुळे जिल्ह्यातील माळी, कासार, चांभार आणि जळगाव जिल्ह्यातील पायली समाजातील व्यक्तींकडूनही हे शब्द मिळाले आहेत. मुलासाठी बेटा तर मुलीसाठी बेटी, बिटीया, बेटीया इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. डिकरा-डिकरी हे शब्द प्रामुख्याने धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात दिसून येतात. पालघरमध्ये धोडी समाजात तर जळगावमध्ये गुजर समाजात हे शब्द मिळाले आहेत. धुळ्यात महार, भोई, वाणी, कोळी, वडार इ. समाजात तर नंदुरबार जिल्ह्यात महार, मातंग ह्या समाजात हे शब्द मिळाले आहेत. डिकरा म्हणजे मुलगा आणि डिकरी म्हणजे मुलगी होय. मुलासाठी डिकरो हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. पोयरो-पोयरी हे शब्द पालघरमधील वारली, मांगेला, नंदुरबारमधील भिल्ल आणि धुळे जिल्ह्यातील पावरा समाजात आढळले. मुलासाठी पोयरो, पोईरो, पोयरा, पोयरं, पोईरा, पुरय इ. आणि मुलीसाठी पोयरी, पोईरी, पुराई, पुरय, पुरीयो इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. चेडो-चेडु हे शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येतात. प्रामुख्याने ख्रिश्चन, कुंभार, भंडारी, मराठा इ. समाजातील व्यक्तींनी हे शब्द सांगितले आहेत. चेडो हा शब्द मुलासाठी तर चेडु हा शब्द मुलीसाठी दिसून येतो. याचेच ध्वन्यात्मक वैविध्य चोडो-चोडु असेही वापरले जाते. तसेच मुलगा-मुलगी या संकल्पनेसाठी चेलो-चेली हे शब्द ब्राम्हण समाजातील व्यक्तींनी सांगितले आहेत. छोरा-छोरी हे शब्द जळगाव जिल्ह्यातील पावरा, पायली आणि धनगर समाजात तर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजात दिसून आले आहेत. टुरा-टुरी हे शब्द मुलगा-मुलगी या संकल्पनेसाठी गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अमरावती या जिल्ह्यात दिसून येतात. हे शब्द गडचिरोलीतील कवर समाजात, गोंदियातील राजगोंड आणि कुणबी समाजात, नागपूर जिल्ह्यातील कलार, मरार, आणि गोंड समाजात तसेच अमरावतीमधील गोंड समाजात दिसून आले आहेत. मुलासाठी टुरा, टूडाल, तुडा, मुलीसाठी टूरी, टूडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. यवतमाळ, वर्धा, नंदुरबार या जिल्ह्यात तर नागपूरमध्ये तुरळक प्रमाणात पोट्टा-पोट्टी हे शब्द वापरले आहेत. मुलासाठी पोट्टा, पोट्टं, पोट्ट्या हे ध्वन्यात्मक वैविध्य तर मुलीसाठी केवळ पोट्टी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. छोकरा-छोकरी हे शब्द मुलगा-मुलगी या संकल्पनेसठी पालघर जिल्ह्यातील वारली आणि ठाणे जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या भाषकांकडून मिळाले आहेत. पुतुस-धुवस हे शब्द रत्नागिरी जिल्ह्यातील इस्लाम समाजात दिसून येतात. पुतुस म्हणजे मुलगा आणि धुवस म्हणजे मुलगी होय. अपवादात्मक स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुलीसाठी धु हा शब्द मिळाला आहे. लेकरू-लेकरी हे शब्द सातारा, सोलापूर, अहमदनगर, नांदेड जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळले. लेकरू हा शब्द मुलासाठी तर लेकी, लेक, लेकरी हे शब्द मुलीसाठी मिळाले. कार्ट-कार्टी हे शब्द सोलापूर आणि जालना जिल्ह्यात दिसून आले आहेत. मुलगा म्हणजे कार्ट आणि मुलगी म्हणजे कार्टी होय. या शब्दाचे काट्ट-काट्टी हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. नाशिक जिल्ह्यातील कोकणा आणि वारली समाजात मुलीसाठी कार हा शब्द आढळला आहे तर मुलासाठी मुल हा शब्द आढळला आहे. छोकरो-छोकर हे शब्द पालघर जिल्ह्यातील कुंभार, धुळे जिल्ह्यातील तेली आणि नंदुरबार जिल्ह्यातील गुजर या गुजराती भाषिक समाजाच्या भाषकांत आढळून आले आहेत. याच शब्दाचे ध्वन्यात्मक वैविध्य छोरो-छोरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील रजपुत भामटा आणि जळगावातील तेली समाजाच्या भाषकांत दिसून आले आहे.पुराय-पोरीयो हे शब्द धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील पावरा समाजात दिसून येतात. या शब्दाचे ध्वन्यात्मक वैविध्य पुर्य-पुराय, पुराय-पुराई, पुरी-पुर इ. आढळले. हप्पा-निगरी हे शब्द रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील इंडियन ख्रिश्चन पोर्तुगीज मातृभाषा असलेल्या समाजात दिसून येतात. हप्पा किंवा रॅप्पा म्हणजे मुलगा आणि निगरी किंवा लिगरी म्हणजे मुलगी होय. या शब्दाचे र्हापा, रॅप्पा-लिगरी ध्वन्यात्मक वैविध्यही आढळते. ताराई, कुंजाई हे शब्द मुलगी या संकल्पनेसाठी अमरावती जिल्ह्यातील कोरकू समाजात मिळाले आहेत. भुरगे हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलगा या संकल्पनेसाठी मिळाला आहे. तसेच चिरंजीव हा शब्द रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आला आहे. बाय हा शब्द अतिशय तुरळक प्रमाणात मुलीसाठी वापरलेला दिसतो. बाय हा शब्द कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला आहे. बया हा शब्द रायगड जिल्ह्यातील ठाकूर समाजात तर बाई हा शब्द ठाणे जिल्ह्यातील वारली समाजात आढळला आहे. बायडी हा शब्द पालघर जिल्ह्यातील ठाकूर समाजात तर बाली हा शब्द चंद्रपूर जिल्ह्यात दिसून आला आहे.